आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉक:पोटभर भांडण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रे डिओवर ‘जीवनसंध्या’ कार्यक्रमात प्रभाकरराव आणि त्यांची पत्नी सरोज यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम प्रसारित झाला. आताच्या पिढीला आदर्श, संस्कार, प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव, त्यांचा संघर्ष, दृष्टिकोन या कार्यक्रमातून मुलाखतीद्वारे मांडण्यात येत होते. आज हा कार्यक्रम ज्यांनी ऐकला, त्या अनेकांचे सकाळपासून त्या दोघांना फोन येऊ लागले. दोघेही अत्यंत नम्रपणे, आनंदाने अभिप्राय स्वीकारण्यात हरवून गेले होते. सातत्याने कॉल सुरू होते. अधेमधे रिकामा वेळ मिळाला, तर त्या दोघांमध्ये आढावात्मक संवाद सुरू असायचे. जेवणाची वेळ झाली आणि दोघांच्याही लक्षात आलं, की स्वयंपाक करणाऱ्या बाई अजून आल्या नाहीत. सरोजकाकूंनी त्यांना फोन केला, “अगं मालू, कुठं आहे तुझा पत्ता? किती वेळ झाला? होय, तू मुलाखत ऐकलीस ते बरोबर आहे, पण ती तू काय एकटीनेच ऐकलीस असं नाही. अंss.. काय म्हणालीस? आमच्या मुलाखतीचा तुला आनंद झाला म्हणून सुटी घेतलीस? छान! अगं, पण सांगण्याची काही पद्धत? सलग माझा फोन बिझी लागत होता म्हणून सांगतीस. अगं मग बिझी नव्हता तेव्हा करायचास ना तू कॉल? आता आमच्या पोटाची व्यवस्था काय? काय..? हे तुझं तूच ठरवलंस का? शहाणीच आहेस..’ जो संवाद कानावर पडला त्यावरून प्रभाकरकाकांनी ओळखले, की आज स्वयंपाक करणाऱ्या बाई येणार नाहीत. तरीही संसारी रिवाजाप्रमाणे त्यांनी बायकोला विचारले, ‘कुणाचा फोन होता अन् काय दिला आहे अभिप्राय?’ नवरोबांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचा केवळ आविर्भाव आणून विचारलेला हा प्रश्न आहे, हे बायकोच्या लक्षात आले. सरोजकाकू आत्मविश्वासाने म्हणाल्या, ‘मी किचनमध्ये बोललेलं हॉलमध्ये ओळखणारे तुम्ही इथल्या इथं काहीच कळलं नसल्याचा आव कशाला आणताय? मी बोलत होते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले ना मी.. काही कळल्याशिवाय का कळा बदलत होत्या चेहऱ्यावरच्या?’ आता मुलाखतीचा तो मुखवटा उतरवून दोघेही घरी मूळ रूपात आले होते. काका-काकू दोघेही सेवानिवृत्त. त्यांना दोन मुले. ती वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या संसारात रमली होती. काका-काकूंनी आतापर्यंत अगदी प्रेमाने, एकमेकांच्या भावना जपून हसतमुखाने गोडीगुलाबीने संसार केला. कधी दोघांच्यात साधी कुरबुरही नव्हती. आता दोघांची पेन्शन अधिक मुलं पाठवत असलेले पैसे, त्यामुळे आर्थिक चिंता मुळीच नव्हती. घराला माणसांशिवाय शोभा नाही आणि आता त्याचाच अभाव होता. अमर्याद शांतता म्हणजे मनात वादळ आणि प्रश्नांच्या लाटा. कामात असलेल्या माणसाला दिवस पुरत नाही, पण रिकाम्या माणसाला तो सरता सरत नाही. दोघांचीही अवस्था तीच होती. काही केल्या वेळ जात नव्हता. ध्यानधारणा, वाचन, टीव्ही बघणे, फिरायला जाणे, ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला जाणे हे सगळे सुरू असले, तरी घरात त्यांना खूप एकटे एकटे वाटायचे. सोबत असून रोज बोलायचं तरी काय? आणि दोघांनी अगदी शांतच बसायचं झालं तर ती कसली कडक शिक्षा? एके दिवशी काकूंनी हेतुपुरस्सर काकांना खडे बोल ऐकवले, “मी तुमच्या बरोबरीने मिळवती असूनही आयुष्यभर तुमचंच सगळं ऐकत आले. कधी माझ्या मताला विचारात घेतले नाही की काडीचीही किंमत दिली नाहीत.’ काकांना काहीच कळेना. ते आ वासून फक्त बघत राहिले. असे शब्द आणि तेही इतक्या मोठ्या आवाजात त्यांनी कधीच ऐकले नव्हते. त्यामुळे त्यांना हा धक्का सहन करणे अशक्य झाले. तेही त्वेषाने म्हणाले, “कुणाला बोलतेस? काय बोलतेस, कळतंय का तुला? संसाराची सगळी सूत्रे पूर्ण स्वातंत्र्यासहित तुझ्या हातात. मी कधी काही बोललोच नाही, तर माझं तू ऐकलंस म्हणायचा प्रश्न येतोच कुठे?’ अंदाजानं दागिना सिलेक्ट करावा अन् तो एक तोळ्याचा निघावा, असा आनंद काकूंना मनातल्या मनात झाला, पण तो दाखवून द्यायचा नव्हता. घरातलं हे हिवाळी अधिवेशन त्यांना पुढं सुरू ठेवायचं होतं. त्यामुळं त्या तळमळीने म्हणाल्या, “म्हणे स्वातंत्र्य.. अहो, जबाबदारी झटकायचं काम केलं तुम्ही. घरात कधी काही आणायचं माहिती नाही तुम्हाला. तुला हवं ते घे म्हणून तुम्ही मोकळेच. बोललो नाही म्हणालात, हे आता कसं बोललात? मी काय तुमचे तोंड बांधले नव्हते.. तुम्ही मला बोलावं असं मी काही वागले नाही, हे मोठ्या मनाने कबूल करा.’ रेडिओवर प्रसारित झालेल्या मुलाखतीत.. ‘आम्ही दोघे वेगळे असे नाहीच आहोत. श्वास, ध्यास, विचार, आचार, कृती, प्रकृती सगळे काही एकच.’ असं शांतपणे सांगणारी बायको इथं अशी वीज कोसळावी तशी कडाडली. काकांना काही कळेना. तथ्य नसलेल्या या आरोपांच्या फैरी झेलण्याऐवजी परतून लावल्या नाहीत, तर त्यांच्या स्वाभिमानाचा पराजय होणार होता. मग त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, “अगं, माझं मन मोठं म्हणून तर समानतेचं सूत्र मी आनंदानं स्वीकारलं. कुकर तू लावतेस, शिट्या मी मोजतो. गॅसवर ठेवलेलं दूध तू उतू घालवतेस, किचन कट्टा मी साफ करतो. फुलं तू तोडतेस, झाडांना पाणी मी घालतो. कोंडाळ्यात केरकचरा तू टाकायचा, मी लोटून काढायचं. भाजी तू आणतेस, ती नीट निवडतो मी. अशी घरातल्या सगळ्या कामात बिनबोभाट मदत करायची अन् सगळी कामं मी एकटी करते, हे श्रेय सर्वांसमोर तू घेत आलीस. मी संकुचित मनाचा असतो, तर हे शक्य नव्हते. थोडी तरी जाणीव ठेव आणि मग बोल.’ काकांच्या शब्दागणिक काकूंच्या रागाचा पारा वरच्या दिशेनं जात होता. ऐकत असतानाच पुढं त्यांना काय बोलायचं, याची मनातल्या मनात जय्यत तयारी होत होती. काहीही झाले तरी चालेल, पण चर्चासत्र निकाली करायच्या निर्धाराने काकू म्हणाल्या, “हे केले, ते केले म्हणून उगाळायची गरज नाही. स्वतःच्या घरासाठी, संसारासाठी केले ते काही उपकार केलेत का माझ्यावर? घरातले काम करण्यात कमीपणा न वाटणं म्हणजे मनाचा मोठेपणा नव्हे. संसारी माणसाचं कर्तव्य आहे ते पार पाडले. वर समानता सांभाळली असा मोठेपणा घेताय. महाशय, भांडण करून पोट भरणार नाही. खायची व्यवस्था काय करायची ती बघा. बाहेरून काही पार्सल घेऊन या..’ काही न बोलता काकांनी मानेने होकार दर्शवला. दारावरची बेल वाजली काकांनी दार उघडले, तर खाद्यपदार्थांचं पार्सल घेऊन दारात मालू उभी. काकांनी स्मितहास्य करीत तिचे आभार मानले, तर काकू आश्चर्यानं बघत राहिल्या. मालू किचनमध्ये आली. पार्सल डायनिंग टेबलवर ठेवत म्हणाली, “साहेबांचा फोन आला होता. मुलाखतीचे व्यवस्थित झाले, आता ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळाव्यात आम्हाला दोघांना इस्कीट सादर करायचंय, त्याची तयारी याच मूडमध्ये आज करून घेतो. तू तिघांचं पार्सल घेऊन जेवायलाच इकडे ये. कसलं नाटक करणारंय? मी येणारंय हं बघायला. झाली का तयारी?’ काकूंकडे बघून काका मनापासून हसले अन् म्हणाले, “खरं तर घरातील काही काम आपल्याला करावे लागत नाही, पण शब्दाला शब्द जुळत गेले. स्क्रिप्ट तयार झाली. त्यात वास्तवाचा भावदेखील आला. तुला मी सरप्राइज दिले. आता त्याचं तरी क्रेडिट मला देशील ना?’ आपल्याला यातलं काहीच माहिती नसल्यासारखं दाखवत काकू म्हणाल्या, “नक्की क्रेडिट तुम्हाला आहे आणलेल्या या पार्सलचे. पण मालूच्या फोनवरून मला माहीत होते, की आज आपल्याला स्किटचा विचार करायचा आहे. दोन बायका एकमेकींना सांगितल्याशिवाय राहतील का? उगाच नाहीत शब्दाला शब्द जुळले? वाटलं की नाही अगदी खरंखुरं भांडण?’ काका काकूंना टाळी देत म्हणाले, “आता या स्किटचं बारसं घाला. छान नाव सुचवा..’ मालू डायनिंग टेबलवर डिश ठेवत हसत म्हणाली, “इस्किटचं नाव.. ‘पोटभर भांडण’ ठेवा की!’

दोघंही मालूकडं आपला पहिला प्रेक्षक या नजरेनं पाहत राहिले.

नितीन कुलकर्णी knitinvinayak@gmail.com संपर्क : 9922631831

बातम्या आणखी आहेत...