आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मरणानंतरही यातना:कोरोना मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांची आबाळ; नियम तीन तासांचा, नातलगांना प्रतीक्षा 30 तासांची

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेल्यानंतरही यातनांना नाकर्ते सरकार जबाबदार : प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते

आधी बेड मिळवण्यासाठी धावपळ, नंतर ऑक्सिजन, औषधं किंवा व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी मेटाकुटीस येणं. राज्यातील कोरोना रुग्णांच्या या यातना मरणानंतरही थांबत नाहीत. मृत्यूनंतर तीन तासांत कोरोना संसर्गित मृतदेहाचा अंत्यविधी व्हावा या महत्त्वाच्या सूचनेस मुंबई शहर वगळता राज्यभर हरताळ फासण्यात आला आहे. परिणामी, मृतदेह ताब्यात मिळण्यास तब्बल ३० तास प्रतीक्षा करावी लागणे, असहाय अवस्थेत रुग्णालय ते शवागार, शवागार ते स्मशानभूमी चकरा माराव्या लागणे, आपल्या प्रियजनांच्या शेवटच्या मुखदर्शनासही मुकणे या यातना कोरोना रुग्णांच्या नातलगांना भोगाव्या लागत आहेत. राज्य शासनाने मात्र याबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवर लोटून हात वर केलेत. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या मरणोत्तर मरणकळा ना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचताहेत ना आरोग्यमंत्र्यांपर्यंत.

संसर्ग हाेऊ नये यासाठी काळजी, सूचनांचे पालन : राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्यमंत्री

याबाबत शासनाने काेणतीही हलगर्जी केलेली नाही. १५ मे २०२० राेजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. अनेकदा नातलगांना येण्यास विलंब हाेताे. मृतदेह नातलगांनी घरी नेऊ नये किंवा जतन करू नये याची रुग्णालय प्रशासनाला खात्री हवी असते. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. संसर्ग राेखण्यासाठी एवढी काळजी अत्यावश्यक आहे.

मेल्यानंतरही यातनांना नाकर्ते सरकार जबाबदार : प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते

रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातलगांना एक-दोन दिवस मृतदेहाची वाट बघावी लागणे हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे आणि उडालेल्या बोजवाऱ्याचे लक्षण आहे. मरणानंतरही कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रकार सरकारच्या नाकर्तेेपणामुळे सुरू आहे. मृतदेह लवकर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत, पण असंवेदनशील सरकारच्या कानापर्यंत काहीच पोहोचत नाही.

जागतिक निकष तीन तासांचे, प्रत्यक्ष लागतात ३० तास :

कोरोना मृतदेहांच्या विल्हेवाटीबाबत केंद्र शासनाचे निकष आणि राज्य शासनाची यंत्रणा यात गोंधळ आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील पूर्ततेसाठी अर्धा तास, नातलगांना कळविण्यासाठी अर्धा-एक तास, वाहतुकीसाठी अर्धा-एक तास आणि दहनासाठी एक तास अशा प्रकारे तीन तासात मृतदेहावर अंत्यविधी होणे अभिप्रेत आहे. आयसीएमआरच्या सूचनेनुसार अहवाल येईपर्यंत अंत्यविधी रोखल्यास त्यातच ६-८ तास लागतात. राज्य शासनाने स्थानिक यंत्रणांना हे अधिकार दिल्याने राज्यभर यात एकवाक्यता नाही. मुंबई शहरात लोकसंख्येचे आव्हान असतानाही तीन तासांत अंत्यविधी होतात, पण इतरत्र किमान ८ ते कमाल ४० तास प्रतीक्षा करावी लागते.

पुणे | ११ विद्युतदाहिनी, दररोज ५० कोरोना मृत्यू

पुणे शहरातील शवागारांमध्ये, शववाहिकांमध्ये साचलेल्या मृतदेहांच्या प्रश्नावर मनसे सरचिटणीस आणि कात्रजचे नगरसेवक वसंत मोरे यांनी आंदोलन केल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या आंदोलनानंतर महापालिका आयुक्तांनी लाकडांवरील अंत्यविधीस परवानगी दिली. त्यासाठी आंदोलन करण्याची, काचा फोडण्याची वेळ का आणावी लागली, असा मोरे यांचा प्रश्न आहे.

अहमदनगर | एकाच दाहिनीत दोन मृतदेहांचे दहन

जिल्हाभरातील रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर्समध्ये आणले जातात. त्यामुळे शहरातील नालेगाव अमरधाममध्ये दिवसाला ३०-४० कोरोना मृतदेह दाखल होतात. शववाहिनीत थप्पी रचून आणलेल्या मृतदेहांच्या विटंबनेचा प्रश्न “दिव्य मराठी’ने मांडल्यावर दुसरी विद्युतदाहिनी बसवली, पण आजही प्रश्न कायमच आहे. एका दाहिनीत एकाचवेळी दोन मृतदेह कोंबून अंत्यविधी सुरू आहे.

काचा फोडल्यावरच प्रश्न सुटणार का?

पुण्याचे माजी महापौर असलेल्या दत्ता एकबोटेंचा मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत १० तास शववाहिकेत पडून होता. शहराच्या माजी महापौरांच्या वाट्याला एवढी अवहेलना येत असेल तर प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे सामान्य नागरिकांचे काय हाल होत आहेत याची कल्पना करू शकतो. मी नगरसेवक असून माझ्या साडूच्या मृत्यूनंतर दोन किलोमीटर अंतरावरील स्मशानभूमीत वेळ मिळण्यासाठी सहा तास लागले. आंदोलन केल्यावर आयुक्तांनी लाकडांवरील अंत्यविधीस परवानगी दिली, ती आधीच का नाही दिली? - वसंत मोरे, मनसे गटनेते, पुणे

बापाच्या बॉडीचा पुकारा ऐकण्यासाठी ४० तास प्रतीक्षा

माझे वडील पहाटे ३ वाजता नगरच्या जिल्हा रुग्णालयात गेले. त्यांचा मृतदेह आम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री साडेआठ वाजता देेण्यात आला. आधी मनपाची गाडी उशिरा आली, मग दाहिनीचं दार तुटल्याचं सांगितलं गेलं. माझ्यासमोर ३० मृतदेहांची थप्पी पडली होती आणि मी वडिलांच्या शेवटच्या दर्शनासाठी गयावया करत होतो. शवागाराच्या दारातून नावाचा पुकारा होत होता, त्याकडे आशा लावून थांबलो होतो. ४० तासांनी त्यांच्यावर अंत्यविधी करू शकलो, पण त्यांचं शेवटचं दर्शनही घेऊ शकलो नाही ही सल आयुष्यभर राहणार. - वैभव शिरोळे, त्रस्त नातलग

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser