आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:टेलरिंगचे ठिगळ, जिद्दीच्या बळाने शिवले उसवलेेले आयुष्य

वऱ्हाडातून अजय डांगे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाळेबंदी झेलली, आता नजरा आकाशाकडे, पेरण्या सुरू पण दुबार पेरणीचे संकट

एक एकर शेतातून मिळालेलं १५ हजारांचं वार्षिक उत्पन्न लॉकडाऊनमध्ये उडून गेलं. कामंही थांबली. शेतीच्या ओढाताणीत आणखी एक खड्डा पडला. पण बाळापूरच्या गजानन आणि मंदा कानपुरेंनी आत्मविश्वासाने टेलरिंगच्या जोडधंद्याने स्वत:ला सावरले.

पावसाचा खंड पडलाय, दुबार पेरणीची शक्यता आहे, पण हतबल होऊन कसं चालेल?, गजानन कानपुरेंनी उत्तरादाखल प्रतिप्रश्नच केला. या प्रश्नातूनच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याची उभारी मिळाली आहे. …कामात व्यग्र राहिल्याने संकटांचा विसर पडतो अन् हातात चार पैसेही पडतात…हे सूत्र गवसल्याने त्यांनी शेतीसोबत टेेलरिंगचा जोडधंदा सुरू केलाय. अर्थात ग्रामीण भागातील अर्थकारणाची मूळ मदार शेतीवरच असल्याने पुन्हा पुढल्या पेरण्यांना लागले आहेत. एकावन्न वर्षांच्या गजानन कानपुरेंच्या पायात टेलरिंगचे काम करताना गोळे आले. मात्र, कामात खंड पाडला नाही. आलेले कपडे तयार करूनच ते दम घेत. टाळेबंदी-संचारबंदी जाहीर झाल्यानंतर कपडे शिवण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेने कमी झाले. मात्र, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि काही कपडे पदरात पडले. टाळेबंदीत ते कामी आले. काहींचे कपडे तयार आहेत, मात्र ग्राहकांकडे पैसे नसल्याने ते पडून आहेत, ते सांगतात.

बहीण शिकते, यातच आनंद

गजानन कानपुरे यांचा मुलगा विजय १० वीपर्यंत शिकला. एक मुलगी पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. मात्र, मुलाला पुढे शिक्षणात यश आले नाही. जीवन जगण्यासाठी जिथे संघर्ष करावा लागतो, तिथे शिकण्याचे प्रयोग करण्यासाठी पैसा कोठून आणणार? त्यामुळे त्यानेही मग गवंडीकामाला प्रारंभ केला. टाळेबंदीमध्ये कधी काम मिळायचे तर कधी नसायचे. आता मात्र नियमित काम मिळत आहे. मी नाही शिकलो तर काय झाले? परिवाराच्या घामाच्या पैशातून माझी बहीण शिकेल, याचेच समाधान त्याच्या चेह‍ऱ्यावर दिसून येत होते.

सकाळी ७ लाच घराबाहेर

शेतात पहिल्या पाळीसाठी गजानन, त्यांची पत्नी इतर शेतमजुरांसोबत सकाळी सात वाजताच घरातून बाहेर पडतात. दिवसाला २५० रुपये मजुरी मिळते. काडीकचरा जमा करण्यासह इतरही शेतीची कामे सुरू आहेत. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले; तुम्हालाही अडचणींमुळे तणाव आला नाही का, असा प्रश्न मंदा कानपुरे यांना केला असता त्यांनी ‘आम्ही मिळेल ते काम करीत राहतो, कामाच्या व्यग्रतेने संकटं केव्हा येतात, केव्हा गडप होतात, हेच कळत नाहीत आणि कामामुळे चार पैसेही मिळतात’, मंदा म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...