आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Ganesh Festival 2020 | This Year's Ganeshotsav Will Be A Health Festival! Emphasis Will Be Placed On Online Viewing To Avoid Crowds

कोरोनातील गणेशोत्सव:यंदाचा गणेशोत्सव ठरणार आरोग्योत्सव! गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन दर्शनावर भर राहणार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बहुतांश मंडळे घेणार प्लाझ्मा, रक्तदान शिबिर; निर्जंतुकीकरणावर यंदा राहणार भर

आबालवृद्धांपासून सारेच ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या गणेशाचे आगमन २२ आॅगस्टला होणार आहे. गणेशोत्सव म्हटला की प्रायोजक, नेत्रदीपक रोषणाई, भव्य िदव्य देखावे, लाखोंची गर्दी...असे दृश्य हमखास असते. या गणेशोत्सवात ते दिसणार नाही. असोसिएटेड चेंबर आॅफ काॅमर्स अॅँड इंडस्ट्री आॅफ इंडियाने (असोचेम) २०१५ मध्ये केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात देशातील गणेशोत्सवाची दहा दिवसांची उलाढाल सुमारे २० हजार कोटींची असल्याचे नमूद केले होते. यात वार्षिक ३० टक्के वाढ होत असल्याचे निरीक्षणही नोंदवले होते. मंडप आणि डेकोरेटर्स, फूल भांडार आणि सजावट, पूजा साहित्य विक्री, पुरोहित, सुरक्षा व्यवस्था, ढोल-ताशे, वाद्यपथके, विविध शहरांतील प्रसिद्ध बँडबाजा पथके, लेझीम -झांज पथके, विविध सजावटीचे साहित्य िवक्रेते, मिठाई विक्रेते आदी व्यवसायांवर कोरोनाची गडद छाया आहे. यंदा या व्यवसायाची उलाढाल नक्कीच घटणार आहे. कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणा आणि विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांनी साजरा होणार आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला तो उद्देश कोरोनामुळे साध्य होत आहे. त्याचा हा घेतलेला वेध...

मुंबई : गणेशमूर्तींच्या विमा संरक्षणाची १००० कोटींची उलाढाल ठप्प होणार

अशोक अडसूळ | मुंबई 

मुंबईतील गणेश मंडळे यंदा आरोग्योत्सव साजरा करणार आहेत. मुंबईत अडीच लाख गणेशमूर्तींची घरगुती प्रतिष्ठापना होते. सार्वजनिक मंडळांच्या ८०० मूर्ती ११ ते १९ फूट, तर २००० मूर्ती ६ ते १० फुटांपर्यंत असतात. यंदा गणेशमूर्तीवर ४ फूट उंचीची मर्यादा घातल्याने ५०० मूर्तिकारांना किमान १०० कोटींचा फटका बसला आहे. वडाळाच्या जीएसबी मंडळाची मूर्ती सोने व चांदीने सुशोभित असते. २०१८ मध्ये या मंडळाने २६४ कोटींचा विमा काढला होता. या काळात विम्याची उलाढाल १००० कोटींच्या आसपास होते. लालबागच्या राजाची यंदा प्रतिष्ठापना होणार नाही. बहुतांश मंडळे दहा दिवस प्लाझ्मा दान, रक्तदान शिबिरे घेणार आहेत.

पुणे : पाचही मानाच्या मंडळांचा चार फूट गणेशमूर्तीच्या अटीला विरोध

मंगेश फल्ले | पुणे

या वर्षी काेरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांची गणेशमूर्ती चार फुटांची असावी अशी सूचना शासनाने केली आहे, परंतु पुण्यातील मानाची सर्व गणेश मंडळे या नियमाच्या विराेधात आहेत. राज्यभराकरिता मंडळांसाठी चार फूट गणेशमूर्तीचा नियम लागू असला तरी पुणे शहराबाबत शासनाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. यंदा आॅनलाइन दर्शनाची सुविधा राहणार आहे. काेराेनाची जनजागृती करणे, रक्तदान शिबिर आदी उपक्रम यादरम्यान राबवण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : झगमगाट टाळत आरोग्यविषयक उपक्रमांवर भर

महेश जोशी | औरंगाबाद

येथील सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतक महोत्सवी वर्ष असले तरी कोरोनामुळे ते साधेपणाने साजरे केले जाणार आहे. प्रामुख्याने शहरातच देखावे केले जातात. यंदा लोकांच्या खिशात पैसा नाही, व्यापारी वर्ग त्रस्त आहे. यामुळे नेहमीच्या तुलनेत ५० टक्के वर्गणीही गोळा होणार नाही. मंडळांची नोंदणीही ५० टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष देणार असून झगमगाट टाळून सॅनिटायझेशन, थर्मल गन, सॅनिटायझरवर खर्च करण्यावर आमचा भर राहील, असे औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघाचे संस्थापक पृथ्वीराज पवार यांनी सांगितले.

नाशिक : उत्सव रद्द झाल्याने पाच कोटींची उलाढाल ठप्प

दीप्ती राऊत | नाशिक

मंडप आणि डेकोरेटर्स, फूल भांडार आणि सजावट, पूजा साहित्य विक्री, पुरोहित, सुरक्षा व्यवस्था, ढोल-ताशे आणि वाद्य पथके अशी गणेशोत्सवाच्या काळात होणारी तब्बल ५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असल्याची माहिती शहरातील संबंधित व्यावसायिक संघटनांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशोत्सव साधेपणाने होणार असून ३ फुटांच्या आतील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शिवाय कोरोना जनजागृतीवर भर राहणारअसल्याचे नाशिक शहर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी सांगितले. शहरातील मोठी मंडळे दरवर्षी प्रत्येकी सरासरी १० ते १५ लाख खर्च करतात.

नागपूर : काेरोना जागृती, चीन विराेधावर भर देणारे देखावे

अतुल पेठकर | नागपूर

यंदा कोरोनाविषयक जागृती, मास्क, सॅनिटायझरचे वाटप, वृक्षारोपण, रक्तदान व आरोग्य शिबिरे हे कार्यक्रम गणेशोत्सवात राहतील, असे संती गणेशोत्सव मंडळाचे संजय चिंचोले यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांचे हिलटाॅप येथील एकता गणेशोत्सव मंडळ प्रसिद्ध आहे. २१ फूट गणेशमूर्ती व अष्टविनायक देखावा हे वैशिष्ट्य. पण यावर्षी पीपीई किटमधील डाॅक्टरांच्या वेशातील गणेशमूर्ती राहणार आहे. आॅनलाइन दर्शन राहील. तात्या टोपेनगर गणेशोत्सव मंडळ “बायकाॅट चायना आत्ननिर्भर भारत’ प्रदर्शनी लावणार आहे. बहुतांश मंडळांचा भर संपूर्ण परिसर निर्जंतुक करणे, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमावर आहे.