आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Gaova Is The First Corona free State In The Country, The Chief Minister Himself Said That The Secret Of Success

दिव्य मराठी विशेष:गाेवा देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य, खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले यशाचे गमक

गोवा3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बरे करो...आमचे गोंय सुरक्षित असा!

(डॉ. प्रमोद सावंत)

भारतात गोवा हे पर्यटनाचे मोठे केंद्र आहे. जगभरातील पर्यटक वर्षभर गोव्यात ये-जा करत असतात. कोरोनाचा देशात प्रादुर्भाव वाढत असला तरी गोवा मात्र कोरोनापासून दूर आहे. इतकेच नाही तर कोरोनामुक्त होणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. गोव्याने असे नेमके काय केले, जे इतर राज्य करू शकले नाहीत. वाचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याच शब्दांत...

कोरोनाचा वेगाने प्रसार होतोय हे कळाल्यानंतर २० मार्चपासूनच आम्ही अलर्ट झालो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे १९ मार्च रोजी यासंदर्भात फोनवर बोलणे झाले. २२ मार्च रोजी गोव्याने इतर देशवासीयांसह जनता कर्फ्यू पाळला. राज्यात येणारे विदेशी पर्यटक पाहता आम्ही आधीच सतर्क होतो. त्यामुळे २३ व २४ मार्चलाही आम्ही गोवा संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. असा निर्णय घेणारा मी पहिला मुख्यमंत्री होतो. यानंतर देशभरात कर्फ्यू लावला गेला. तोपर्यंत आम्ही गोव्यातील जवळपास २ हजार पेक्षा जास्त पर्यटकांना होम क्वारंटाईन करून आरोग्य यंत्रणांना अधिक कार्यक्षम आणि सतर्क केले होते.

समाजात कोणतीही भीती न पसरता लोकांमध्ये जनजागृती करण्याचे मोठे आव्हान आमच्या पुढ्यात होते. त्यानुसार आम्ही प्लॅनिंग केले. प्रत्येक हॉटेल, निवास स्थानांवर लक्ष ठेवण्यात आले. चाचण्या करण्यात आल्या. क्वारंटाईन नंतर जे रुग्ण आम्हाला कोरोना पॉझिटिव्ह मिळत गेले, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या २०० पेक्षा अधिक लोकांना आम्ही इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले. यासह आमच्या कोविड हॉस्पिटल टिमच्या सहकार्याने सात पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आणि आम्ही शून्यावर आलो. यासाठी आम्ही स्वत:ची पॅथॉलॉजी लॅब सुरू केली. यामुळे टेस्टिंगची सुविधा आणि रुग्णालयाची सुविधा यासगळ्या माध्यमातून आणि महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या सहकार्यामुळे आमच्याकडे ३ एप्रिल पासून आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. आम्हाला खात्री आहे की आता गोव्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. आम्ही आमच्या आठही बॉर्डर सील केलेल्या आहेत. टेस्ट केल्याशिवाय कोणालाच राज्यात प्रवेश दिला जात नाहीये.

पुढचा अॅक्शन प्लॅन तयार..

कोरोनामुळे गोव्याची हानी झाली आहे. मात्र आम्ही हार मानलेली नाही. आम्ही एस्टिमेट कंट्रोल कमिटी (खर्चावर नियंत्रण सुचवण्यासाठी), इकॉनॉमिक रिव्हायवल कमिटी यासह विविध कमिट्यांची स्थापना केली आहे. यामध्ये मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि वित्त सचिवांचा समावेश आहे. त्यांचे कामही सुरू झाले आहे. त्याच्या पलीकडे केंद्राकडून काय गाइडलाइन येतीये यावरदेखील आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढे काय या अॅक्शन प्लॅनची घोषणा आम्ही लवकरच करणार आहोत... देव बरे करो.

गोव्यात सध्या ६०० विदेशी पर्यटक... :

२२ तारखेच्या जनता कर्फ्यूपर्यंत गोव्यात ७ हजारांपर्यंत विदेशी पर्यटक होते. त्यानंतर ३२ खासगी विमानांद्वारे त्यांना पाठवण्यात आले. तरी सध्या ६०० च्या जवळपास विदेशी पर्यटक गोव्यात असतील.

एकाच ठिकाणी कोरोनाचे रुग्ण

आमच्याकडे अॅपेक्स हॉस्पिटल म्हणजेच गोवा मेडिकल कॉलेज याठिकाणी आम्ही आयसोलेशन वॉर्ड तयार केला. कोरोनाची शक्यता असलेल्या नागरिकांची विभागणी करून अॅडमिट करत होतो. कोणतेही पेशंट आम्ही गोव्याच्या कोणत्याच रुग्णालयात ठेवत नव्हतो त्यांना थेट गोवा मेडिकल कॉलेज येथील आयसोलेशन विभागातच भरती करत होतो. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही त्यांना कोविड रुग्णालयात शिफ्ट केले, त्यासाठी आम्ही कोविड हॉस्पिटल स्थापन केले. २८ मार्च पासून टेस्टिंग सुविधा गोव्यातच उपलब्ध केल्याने आम्ही यावर मात केली. आमच्या डॉक्टरांच्या टिमने निष्ठेने काम केल्यामुळे हे शक्य झाले.

बातम्या आणखी आहेत...