आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादसारखा मुंबईतही दिसेल अमित शहांचा करिष्मा?:महापालिका निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती! दौऱ्यामधून काय साधणार, वाचा...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. शहा यांचा हा दौरा 'मिशन मुंबई' म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह माध्यमांतून रंगत आहे. मुंबई महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यांत घोषित होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर शहा यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

हैदराबादमध्ये शहांचे डावपेच यशस्वी
शहा यांची राजकीय डावपेचांची हतोटी आणि इतिहास बघता मुंबई महापालिका निवडणुकीचे मैदान भाजपच्या दृष्टीने अनुकूल बनवण्यासाठीच त्यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. हे समजून घ्यायचे असेल तर सुमारे दोन वर्षांपूर्वी शहांनी हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी केलेल्या दौऱ्यांकडे बघितले पाहिजे. यावेळी पार पडलेल्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. यासाठी शहांनी हैदराबादला खास दौरा करून रोड शोही केला होता. शहा यांच्या या दौऱ्यांची परिणीती निवडणुकीत बघायला मिळाली आणि भाजपने या निवडणुकीत पहिल्यांदाच दणदणीत विजय संपादन केला.

हैदराबादमध्ये भाजपची मुसंडी
हैदराबाद महानगरपालिकेत भाजपने 4 वरून थेट 48 नगरसेवकांपर्यंत मजल मारली ही शहा यांच्याच दौऱ्याची फलनिष्पत्ती मानली जाते. यामुळे हैदराबाद महापालिकेत तेव्हापर्यंत खिजगणतीत नसलेला भाजप थेट दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला.

टीआरएसला फटका
हैदराबादमधील भाजपच्या सरशीचा सर्वात मोठा फटका तेलंगाणा राष्ट्रीय समितीला बसला. टीआरएसच्या नगरसेवकांची संख्या गेल्यावेळच्या 99 वरून 56 वर घसरली. टीआरएसचे 43 नगरसेवक 2020 मध्ये कमी झाले. तर एमआयएम मात्र 44 जागा कायम ठेवण्यात यशस्वी ठरली. भाजपने 4 नगरसेवकांवरून थेट 48 नगरसेवकांवर मजल मारली.

मुंबईत फक्त अखेरचा घाव

हैदराबादमध्ये आपली ताकद आणि रणनीती वापरून भाजपने मिळवलेले यश बघितले तर सध्या मुंबईतही भाजपला असेच यश मिळवणे शक्य असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांच्या मते, हैदराबादमध्ये जवळपास अस्तित्व नसताना भाजपने ताकद पणाला लावून दुसरा मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली. मुंबईत तर आधीपासूनच भाजपचे अस्तित्व आहे. गेल्या निवडणुकीत तर भाजपने जवळपास शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवत मोठी मजलही मारली आहे. त्यामुळे या वेळेस भाजपला सत्तेसाठी केवळ अखेरचा घाव घालायचा आहे असे राजेंद्र साठे यांचे मत आहे. त्यामुळेच शहा यांचा मुंबई दौरा हा अतिशय महत्वाचा समजला जात आहे.

मुंबई महापालिकेतील सद्यस्थिती
227 जागा असलेल्या मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेत शिवसेनेचे 84, भाजपचे 82, काँग्रेसचे 31, राष्ट्रवादीचे 9 तर एमआयएमचे 2 नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे याआधीच्या निवडणुकीत महापालिकेत भाजपचे केवळ 31 नगरसेवक होते. म्हणजेच 2017 मध्ये भाजपने 51 जास्तीच्या जागा मिळवत 82 जागांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळेच महापालिकेवर आपला झेंडा फडकावण्याच्या दृष्टीने सध्या तरी भाजपसाठी अनुकूल स्थिती असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बहुमताचा आकडा 119
नव्या प्रभागरचनेनुसार मुंबईतील वॉर्डांची संख्या 236 इतकी झाली आहे, त्यामुळे बहुमताचा आकडा 119 इतका असणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश. त्यानंतर सातत्याने राबवली जाणारी रणनीती आणि शिंदे गटाचे सध्याचे बंड याचा राजकीय लाभ बघितला तर मुंबई महापालिकेसाठी मैदान भाजपसाठी अनुकूल असल्याचे विश्लेषकांना वाटते. त्यामुळे आता या श्रृंखलेत भाजपकडून पुढचा डाव काय टाकला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...