आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषयुती झाली, पुरंदरेंविषयी मतभेदाचे काय?:शिवसेना-संभाजी ब्रिगेडमध्ये 'लेखन' कळीचा मुद्दा, कोण फायद्यात?

विश्वास कोलते3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा शुक्रवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली. या युतीनंतर दोन्ही पक्षांमधील पुरंदरेंविषयीच्या मतभेदांचीच चर्चा ऐकायला येऊ लागली. कारण संभाजी ब्रिगेडकडून पुरंदरेंना प्रखर विरोध केला जातो आणि शिवसेना मात्र पुरंदरेंची समर्थक राहिली आहे. त्यामुळे वैचारिक मतभेद असणारी ही युती टिकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासोबतच या युतीचे राजकीय परिणाम काय असू शकतात याचाच आढावा घेणारा दिव्य मराठीचा हा खास एक्सप्लेनर वृत्तांत...

युतीच्या घोषणेसह पुढील सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे ही युती निवडणुकांच्या दृष्टीने खरंच फलदायी ठरणार का? याची चर्चा आता होत आहे. हे समजून घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वाटचालीवर एक नजर टाकूया...

संभाजी ब्रिगेडची वाटचाल

 • 1992 मध्ये मराठा सेवा संघाच्या युवा कक्षाची सुरूवात
 • 1997 मध्ये धुळ्याच्या अधिवेशनात संभाजी ब्रिगेड नावाची आणि संघटनेची घोषणा
 • तेव्हापासून संभाजी ब्रिगेडचे सामाजिक संघटना म्हणून काम सुरू
 • संभाजी ब्रिगेडकडून विशेषतः शिवाजी महाराजांवरील काही इतिहासकारांच्या लेखनावर आक्षेप
 • याच आक्षेपांवरून संभाजी ब्रिगेडची बहुतांश आंदोलने
 • जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाविरोधात 2004 मध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केला
 • दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचे सांगत पाठ्यपुस्तकातील हा उल्लेख काढण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली
 • यानंतर 2010 मध्ये पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आला
 • 2012 मध्ये रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी संभाजी ब्रिगेडने फोडली आणि पुतळा दरीत फेकला
 • 2017 मध्ये पुण्यातील संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने तोडून मुठा नदीत फेकला
 • बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास संभाजी ब्रिगेडचा कायम विरोध, त्यांच्यावर शाईफेकही केली
 • 2021 मध्ये संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाणाचा आरोप करत पत्रकार गिरीश कुबेरांवर शाईफेक

2016 मध्ये पक्ष म्हणून घोषणा
30 नोव्हेंबर 2016 मध्ये संभाजी ब्रिगेडची राजकीय पक्ष म्हणून घोषणा झाली. तेव्हा संघटनेचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे अध्यक्ष झाले आणि खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर सरचिटणीस झाले.

2016 मध्येच संघटनेत फूटही
याच वेळी संघटनेसोबत दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनी राजकीय प्रवेशास विरोध करत मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड नावाने वेगळी सामाजिक संघटना सुरू केली.

शिवसेनेची वाटचाल

 • 1966 मध्ये मराठी माणसांच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली
 • 1970 मध्ये हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत राजकीय वाटचाल पुढे नेली
 • 1971 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, पाच जागा लढवून शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही
 • 1980 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, यावेळी दोन जागा लढवून त्यांचा एकही उमेवार निवडून आला नाही
 • 1989 मध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजपसोबत युती, यावेळी शिवसेनेचा एक खासदार निवडून आला
 • 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले
 • 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार, या काळात शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री झाले
 • 2004 मध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख झाले
 • 2014 मध्ये भाजपसोबत युतीमध्ये शिवसेना पुन्हा राज्य सरकारमध्ये सत्तेत, यावेळी भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
 • 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचा प्रयोग करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले
 • 2022 मध्ये शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले

कुणाला होणार फायदा?
शिवसेनेची वाटचाल बघितली तर स्थापनेपासून आतापर्यंत शिवसेनेचा चांगलाच राजकीय प्रभाव राहिल्याचे दिसत आहे. तर संभाजी ब्रिगेडची गेल्या सुमारे तीन दशकांतील कारकीर्द ही मुख्यतः आंदोलनांपुरती मर्यादीत दिसते. संभाजी ब्रिगेडचे म्हणावा तेवढा राजकीय प्रभाव आतापर्यंत दिसलेला नाही. त्यामुळे या युतीचा शिवसेनेपेक्षा संभाजी ब्रिगेडलाच फायदा असल्याचे काही राजकीय विश्लेषकांना वाटते.

संभाजी ब्रिगेडचा राजकीय प्रभाव दिसत नसला तरी संघटनेचा राज्यभरातील विशेषतः मराठा तरुणांवर चांगला प्रभाव असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण याचे राजकीय परिणाम कितपत दिसतील याविषयी विश्लेषकांना शंका वाटते.

आमच्या लाखो शाखा
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांच्या दाव्यानुसार सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असून राज्यभरात गावपातळीवर लाखो शाखा आहेत. ब्रिगेडची 40 जणांची राज्य कार्यकारिणी आहे. प्रत्येक जिल्ह्याला दोन जिल्हाध्यक्ष, तालुक्याला तालुकाध्यक्ष याशिवाय विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचे वेगळे अध्यक्ष अशी संघटनेची रचना आहे. पक्ष म्हणून घोषणा झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने प्रयोग म्हणून ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या. भानुसे यांच्या दाव्यानुसार राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संभाजी ब्रिगेडचे 750 सदस्य आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने 40 उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांनी चांगली मते मिळवली असे भानुसेंचे म्हणणे आहे.

तरच युतीला अर्थ - विजय चोरमारे
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीच्या राजकीय परिणामांविषयी बोलण्याआधी नेमक्या कोणत्या संभाजी ब्रिगेडशी युती झाली हे तपासले पाहिजे. कारण संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या विचारसरणीत मुलभूत मतभेद आहे. संभाजी ब्रिगेडकडून मुख्यतः पुरंदरेंनी केलेल्या इतिहास लेखनाला प्रखर विरोध केला जातो. तर शिवसेना पुरंदरेंचे समर्थन करते. त्यामुळे या मुद्द्यावर त्यांनी चर्चा करून काही वैचारिक एकसंधतेचा निर्णय घेतला आहे का हे महत्त्वाचे आहे. अन्यथा या युतीला काही अर्थ नाही. केवळ उद्धव ठाकरेंच्या अडचणीच्या काळात एखादी संघटना त्यांच्यासोबत येते ही त्यांच्यासाठी एक चांगली बाब असेच याकडे बघावे लागेल असे चोरमारे यांना वाटते. संभाजी ब्रिगेडची राज्यात किती ताकद आहे हेही बघितले पाहिजे असेही चोरमारे म्हणाले.

भविष्यात कळतील फायदे-तोटे

त्यामुळे या युतीचा नेमका कुणाला फायदा होणार आणि याचे राजकीय परिणाम किती दिसणार हे सांगणे सध्याच्या परिस्थितीत तरी कठिणच असल्याचे विश्लेषकांना वाटते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच याबद्दल काही अंदाज लावला जाऊ शकतो असे विश्लेषक म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...