आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंडेप्थकाँग्रेसला हतबल होण्याची गरज नाही:राहुल गांधींमुळे पक्षात नवा विश्वास; 'ग्रँड ओल्ड पार्टी'ला गतवैभव मिळेल, पण कसे?

भाग्यदर्शी लोखंडे| औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई, जीएसटी, बेरोजगारी, इंधन दरवाढ, सरकारी यंत्रणांचा कथित गैरवापर आदी मुद्यांवर काँग्रेसने देशभरात रान पेटवले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे सुपुत्र राहुल व कन्या प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे जवळपास सर्वच ज्येष्ठ नेते रस्त्यांवर उतरेलत. त्यांनी स्वतःला अटक करवून घेण्याची...प्रसंगी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाण्याचीही तयारी दर्शविली आहे. पण प्रश्न हा आहे की, नेमस्त राजकारण करणाऱ्या काँग्रेसवर असे करण्याची वेळ का आली?

त्यामुळे आजच्या दिव्य मराठी इंडेप्थमध्ये आपण पाहुया स्वतंत्र भारताहून जुन्या असलेल्या काँग्रेसचे गतवैभव कोणत्या कारणांमुळे लयास गेले? काँग्रेसवर ही वेळ केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या धूर्त राजकारणामुळे आली? की हा पक्ष स्वतःच्याच दरबारी राजकारणाला बळी पडला? या सर्व प्रश्नांची उत्तरे...

गतवैभव मिळवण्यासाठी संघर्ष

काँग्रेस सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे खचला आहे. सोनिया विशेषतः राहुल गांधी या पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत आहेत. पण त्यांना राज्य पातळीवरून हवी तशी साथ मिळताना दिसून येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढता प्रभाव, भाजप विरोधात हुकमी एक्का ठरणारे जातीयवादाचे राजकारण सध्या फारसे चालत नाही. यामुळेही पारंपरिक राजकारण करणाऱ्या काँग्रेसची अडचण झाली आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न गांधींची टीम करताना दिसून येत आहे. पण रस्त्यांवर ठाण मांडून बसलेले राहुल एकीकडे व स्वतःच्या कपड्यांची इस्त्री मोडू न देणारे इतर नेते दुसरीकडे, अशा विचित्र स्थितीत काँग्रेस सापडली आहे.

राहुल यांनी नवी दिल्लीत सरकारविरोधात रस्त्यावर असे ठाण मांडले होते.
राहुल यांनी नवी दिल्लीत सरकारविरोधात रस्त्यावर असे ठाण मांडले होते.

काँग्रेसला उभारी घेण्याची संधी

काँग्रेसच्या काही नेत्यांनी गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित केला आहे. पण ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांना या स्थितीतही काँग्रेसला उभारी घेण्याची नामी संधी दिसत आहे. ते म्हणतात -'गांधी कुटुंबावर नेतृत्व सोडण्यासाठी दबाव असला तरी त्यांनी तसे करण्याची काहीच गरज नाही. कारण, या पक्षाची रचनाच अशी आहे की, या पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते दुसऱ्या नेत्यांना मान्यता देतील असे वाटत नाही. पण धोरणीपणे विचार केला तर काँग्रेसने राज्यस्तरीय नेत्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले तर काँग्रेसला गतवैभव मिळणे फारसे अवघड नाही. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे आहे. गहलोत यांनी भाजपच्या सर्वच कट कारस्थानांना मात दिली.'

प्रशांत दीक्षित पुढे सांगतात की, 'काँग्रेसकडे अजून 15 ते 18 टक्के मतदार आहेत. पण एवढ्या मताधिक्याने सत्ता मिळणार नाही. यासाठी त्यांना किमान 30 टक्के मतदारांचा विश्वास जिंकावा लागेल. यासाठी कोणती रणनीती आखायची? याचा निर्णय स्वतः राहुल गांधींना घ्यावा लागेल. सद्यस्थितीत दलित व मुस्लिम मतदार भाजपकडे झुकला आहे. त्यामुळे आता केवळ मुस्लिमांचे लांगुलचालन करुन भागणार नाही. कारण, भाजपने मुस्लिम उमेदवार न देताही निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला तुष्टीकरणाच्या राजकारणापुढील विचार करावा लागेल. यासाठी त्यांना मध्यमवर्गियांना आपल्याकडे आकर्षित करावे लागेल. 2009 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ही किमया करुन दाखवली होती. तेव्हा काँग्रेसला शहरी भागांत चांगले मतदान मिळाले होते. पण सध्या हा मेळ कसा साधायचा हा यक्ष प्रश्न काँग्रेसपुढे आ वासून उभा आहे.'

दीक्षित म्हणतात -'या समस्येवरही राहुल यांनाच तोडगा काढता येईल. पण यासाठी त्यांना प्रादेशिक पातळीवरील नेत्यांना स्वातंत्र्य देण्याचे औदार्य दाखवावे लागेल. अन्यथा त्यांची गत सध्याहून वाईट होईल. काँग्रेसचा अलीकडच्या काळात सातत्याने पराभव होत आहे. पण काँग्रेसच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग अजूनही अस्तित्वात आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकांचे योग्य व्यवस्थापन व स्थानिक नेत्यांना मोठे करण्याची रणनिती आखली तर निश्चितच त्यांना यश मिळेल.'

पक्ष नेतृत्वात बदल करण्याची गरज

राजकीय विश्लेषकांनी काँग्रेसमध्ये तरुणांना फारशी संधी मिळत नसल्याचीही खंत व्यक्त केली आहे. वेळ पडली तर काँग्रेसने पक्षाचे नेतृत्व दुसऱ्या नेत्यांकडे सोपवावे अशीही त्यांची भावना आहे. यासंबंधी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणतात -'गांधींना पक्ष नेतृत्वाची धूरा अन्य एखाद्या सक्षम नेत्यांकडे सोपवावी लागेल. जनहिताशी निगडीत सातत्यपूर्ण कार्यक्रम हाती घ्यावे लागतील. त्यांचा पाठपुरावा करून ते तडीस न्यावे लागतील. एखादी गोष्ट केवळ काँग्रेसच करू शकते, हे लोकांना पटवून द्यावी लागेल. सत्ताधाऱ्यांचे कच्चे दुवे ओळखून त्यावर प्रहार करावा लागेल. थोडक्यात जनमत आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसला सर्वोतपरी प्रयत्न करावे लागतील.'

पक्ष संघटनेत तरुणांना संधी मिळावी

विश्लेषकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी राजकीय आडाखे बांधण्यात कमी पडत असल्याचेही निरिक्षण नोंदवले आहे. साठे म्हणतात -'राहुल यांनी जुन्या नेत्यांची कोणतीही तमा बाळगू नये. त्यांनी अधिकाधिक तरुणांना संधी द्यावी. मोदींनी अडवाणींना बाजूला सारले. पक्ष बांधणीसाठी असे करावेच लागते. मागे हटून चालत नाही. ठोस निर्णय घ्यावे लागतात. मोदी सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय आहेत. त्या तुलनेत राहुल यांच्याकडे राजकीय धूर्तपणाचा अभाव असल्यामुळेही त्यांची गोची झाली आहे. पण संघटनेच्या बाबतीत ठोस निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिले तर त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल. पण यासाठी त्यांना स्वतः घाम गाळावा लागेल. त्यांच्या सहकाऱ्यांनाही त्यांची साथ द्यावी लागेल. आम्ही काँग्रेसचे लोक विरुद्ध भाजपचे हुकूमशाही वृत्तीचे लोक असे वातावरण त्यांना करावे लागेल.'

महाराष्ट्रातील गटातटांचे राजकारण धोक्याचे

'महाराष्ट्र काँग्रेस गटातटांत विखुरली गेली आहे. राज्यात पक्षाचा सर्वमान्य असा कोणताही चेहरा नाही. जे कुणी आहेत, ते आपापले जिल्हे सुरक्षित ठेवण्यात गुंतलेत. म्हणजे महाराष्ट्रात चेहरा व संघटना या दोन्ही पातळ्यांवर आनंदीआनंद आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी हा प्रश्न सोडवला तर निश्चितच काँग्रेसला सुगीचे दिवस येतील,' असेही विश्लेषकांना वाटते.

काँग्रेस अन् दरबारी राजकारण

'काँग्रेसमध्ये आतापर्यंत दरबारी राजकारणच यशस्वी ठरले. काँग्रेस नेते स्वतः मास लिडर होते. इंदिरा गांधींची जनतेत अफाट लोकप्रियता होती. ही लोकप्रियता राजीव गांधी यांना लाभली. पण आता गांधी घराण्याचा करिश्मा अंधूक झाला आहे. आता तेच दरबारी झालेत आणि त्यांच्या भोवतीही दरबारी राजकारण्यांचाच गोतावळा तयार झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाला या राजकारणाची चौकट उलांडून जनतेत मिसळावे लागेल. स्वतःचे नेतृत्व सिद्ध करावे लागेल,' असेही त्यांना वाटते.

हतबल होण्याची गरज नाही

विश्लेषकांच्या मते, 'काँग्रेसने हतबल व्हावे अशी स्थिती मुळीच नाही. पण त्यांना स्थानिक नेतृत्वाला अधिकाधिक वाव द्यावा लागेल, संघटनेची उत्कृष्ट बांधणी करणाऱ्या नेत्यांना संधी द्यावी लागेल. स्वतःची विचारधारा अधिक सर्वसमावेश करताना ती हिंदूविरोधी होणार नाही किंवा त्यातून एखाद्या विशिष्ट वर्गाचे लांगुलचालन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. काँग्रेसशिवाय तरणोपाय नाही असा विश्वास लोकांत पेरावा लागेल. असे झाले तर काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल यात कोणतीही शंका नाही.'

येत्या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. काँग्रेसलाही डिसेंबरमध्ये 137 वर्षे पूर्ण होतील. एखाद्या व्यक्तीसाठी 75 वर्षांचा अवधी म्हणजे त्याचे अख्खे आयुष्य. पण विचारांसाठी अवघा एक क्षण. भारताच्या 75 वर्षांची वाटचाल जशी मोजक्या शब्दांत मांडता येत नाही, तशी काँग्रेसचीही वाटचालही सांगता येत नाही. पण काँग्रेसकडे तरुण नेतृत्व आहे. ही त्यांच्यासाठी अत्यंत जमेची गोष्ट आहे. या नेतृत्वाच्या जोरावरच काँग्रेसला चांगले दिवस येतील, असा विश्वासही या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...