आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टबिल्किस बानोवर गोध्रातील मुस्लीम मौन:ऑफ कॅमेरा म्हणाले - आम्ही BJP विरोधात, पण याने हिंदू एक होतील

लेखक: अक्षय वाजपेयी आणि राजू सोळंकी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे गोध्रा हे एका बदनाम ओळखीचा बळी आहे. 27 फेब्रुवारी 2002 रोजी अयोध्येहून गुजरातकडे येणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 कोचला गोध्रा रेल्वे स्थानकावर आग लावली गेली. यात 59 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 9 पुरुष, 25 मुले आणि 25 महिलांचा समावेश होता.

काही तासांतच गुजरातच्या अनेक भागांत हिंसाचार भडकल्याच्या बातम्या येऊ लागल्या. गुजरातच्या अनेक भागात सुमारे 5 दिवस हिंसाचार सुरू होता. अधिकृत नोंदीनुसार, 1,044 लोकांचा मृत्यू झाला.

दंगलग्रस्तांमध्ये बिल्किस बानो यांचाही समावेश होता. जंगलात दंगलखोरांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यांच्या 3 वर्षांच्या मुलीसह 15 जणांची हत्या केली. या प्रकरणात दोषी ठरलेल्या 11 जणांना गुजरात सरकारने 15 ऑगस्ट रोजी माफीच्या धोरणानुसार मुक्त केले आहे.

सरकारच्या या निर्णयावर टीका झाल्यावर भाजप नेते सीके राउलजी म्हणाले – बिल्किस बलात्कार प्रकरणातील काही दोषी ब्राह्मण आहेत. ज्यांचे संस्कार चांगले आहेत. राउलजी हे गोध्राचे आमदार आहेत. यावेळीही पक्षाने त्यांना तिकीट दिले आहे.

2017 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. राउलजी यांनी गोध्रा मतदारसंघातून 6 वेळा निवडणूक जिंकली आहे. सध्या हाच प्रश्न आहे की, बिल्किस प्रकरणाचा गोध्रा मतदारसंघावर काही परिणाम आहे का? 2002 च्या दंगलीची आठवण अजूनही उरली आहे का?

गोध्रा ट्रेनचा तो जळालेला डबा आठवतो का?

या प्रश्नांची उत्तरे शोधत, गोध्राला पोहोचल्यावर सर्वात आधी माझे मन तो जळालेला डबा शोधते, जिथून हे सर्व सुरू झाले. हाच शोध मला गोध्रा रेल्वे यार्डात घेऊन गेला. 20 वर्षांनंतरही हा डबा रेल्वे यार्डात तसाच उभा आहे. येथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफचे जवान 24 तास त्याच्या देखरेखीसाठी तैनात असतात. परवानगीशिवाय त्याच्या जवळ जाऊ दिले जात नाही. परवानगीही वैध कारण सांगितल्यावरच मिळते. डब्याचे काही फोटो आणि व्हिडीओ काढल्यानंतर लोकांचे मन जाणून घेण्यासाठी मी मुख्य बाजारपेठेकडे निघालो.

गोध्रामध्ये 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी जमावाने साबरमती एक्सप्रेसच्या डब्याला आग लावली होती. विशेष न्यायालयाने 2011 मध्ये हा कट करून केलेला हल्ला असल्याचे म्हटले होते.
गोध्रामध्ये 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी जमावाने साबरमती एक्सप्रेसच्या डब्याला आग लावली होती. विशेष न्यायालयाने 2011 मध्ये हा कट करून केलेला हल्ला असल्याचे म्हटले होते.

पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा येथे 2.83 लाख मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 65 हजार मुस्लीम आहेत. अनेक वर्षांपासून मुस्लीम काँग्रेसलाच मतदान करत आहेत. त्यामुळेच काँग्रेस येथून सातत्याने विजयी होत राहिली. मात्र यावेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमनेही आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे मुस्लीम मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिल्किस प्रकरणावर बोलले तर हिंदू संघटित होतील

बाजार परिसरातील लोकांसोबत थोडा वेळ घालवल्यानंतर एका गोष्टीचा अंदाज येतो की भलेही बोलले जात नसेल, तरी 2002 ची जखम भरून निघालेली नाही. विशेषत: अल्पसंख्याक लोक हे विसरलेले नाहीत.

तथापि, आता येथे 2002 पेक्षा मोठा मुद्दा आहे तो बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका. कॅमेऱ्यावर याबद्दल बोलण्यास प्रत्येकजण टाळतो. कोणी काही का बोलत नाही असे विचारल्यावर मला उत्तर मिळाले - विनाकारण अडचणीत पडायचे नाही.

याच दरम्यान चहाच्या दुकानावर मित्रांसोबत बसलेले आरिफ भेटले. गोध्रामध्येच वाढलेले आरिफ 2002 मध्ये 15 वर्षांचा होते. म्हणतात, साहेब इथे गोध्रा घटनेबद्दल कोणी बोलत नाही. ती खूप जूनी झाली आहे. आता बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेबद्दल आम्ही संतापलो आहोत. पण निवडणुकीत त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

मी विचारले असे का? तर ते म्हणाले, 'मुस्लीम समाजाने याआधीही भाजपला मत दिले नव्हते आणि या निर्णयानंतरही मतदान करणार नाही, त्यामुळे त्यांचे काहीही नुकसान नाही. मात्र या मुद्द्यावरून त्यांची हिंदू मते नक्कीच संघटित होतील. त्यामुळे आम्ही याविषयी जास्त बोलू इच्छित नाही.'

यावेळीही काँग्रेस-भाजपमध्येच लढत

आरिफ पुढे सांगतात की गोध्रामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत आहे. मात्र, आरिफसोबत बसलेल्या मेहबूब यांचे मत वेगळे आहे. ते म्हणतात की, चांगले कामे केल्यामुळे गोध्रामध्ये भाजपचा विजय होईल. बिल्किस बानो प्रकरणाचा कोणताही परिणाम होणार नाही.

बुजुर्ग मोहम्मद यांनी तर बिल्किस बानो प्रकरणावर बोलण्यासही नकार दिला. 5 तारखेला मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र लोकांमध्ये मतदानाचा उत्साह नाही. महागाई आहे, बेरोजगारी आहे, त्यावर कोणी बोलत नाही असे ते म्हणतात.

ओवैसींनी उमेदवार उभे केले, मतविभागणीची शक्यता

तेल व्यावसायिक आणि एकेकाळी पत्रकार राहिलेले इस्माईल जाबा आमच्यासोबत कॅमेऱ्यावर बिल्किस बानो केसविषयी बोलण्यास तयार झाले. म्हणाले, बिल्किस बानो प्रकरणात जे गुन्हेगार सुटले आहेत, त्याचा परिणाम मुस्लीम समाजात दिसत नाही. लोकांना हेच कळत नाहीये की काय झाले आहे. गोध्रा कांडही आता खूप जूने झाले आहे.

यावेळी ओवैसींनी येथे उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांची मते विभागली जाऊ शकतात. कारण काही लोक तरी त्यांच्यासोबत जातील. त्याचा थेट फायदा भाजपलाच होणार आहे. केवळ अल्पसंख्याकांच्या मतांमुळे काँग्रेस इथे जिंकायची. पण आमच्या समाजातील लोकांना ते तिकीट देत नाही.

यामुळेच मुस्लीम समाजात काँग्रेसविरोधात रोष आहे. तरीही पक्षाचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, कदाचित सर्व मते काँग्रेसलाही मिळू शकतील.

गेल्या वेळी भाजपला केवळ 258 मतांनी विजय मिळाला होता

गोध्रा शहराला भेट दिल्यानंतर आम्ही भाजपचे उमेदवार सीके राउलजी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलो. ते कार्यकर्त्यांची बैठक घेत होते. राउलजी गेल्या वेळी अवघ्या 258 मतांनी विजयी झाले होते. त्यांची मतांची टक्केवारी 42% आणि काँग्रेस उमेदवाराची 41% होती.

राउलजी म्हणतात, 2017 मध्ये आमचे लोक अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यांनी आमची 18 हजारांहून अधिक मते घेतली. त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी त्यांना मतदान केले. यावेळी तसे काही नाही.

मुस्लीम समाजाची 65 हजार मते असल्याबद्दल म्हणतात, मुस्लीम समाजातील पाच जण निवडणूक लढवत आहेत. ओवैसी यांचाही पक्ष आहे. अशा परिस्थितीत त्यांचीच मते विभागली जातील. ज्याला आम आदमी पक्षाने तिकीट दिले आहे, त्याचे तर अस्तित्वच नाही. पंचायत निवडणुकीतही त्यांना दोनशेहून अधिक मते मिळाली नाही.

न्यायालयाच्या निर्णयावर काहीही बोलायचे नाही

बिल्किस बानोच्या दोषींच्या सुटकेबाबत दिलेल्या विधानावर राउलजींना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, मी याबद्दल काहीही बोलणार नाही. त्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. याचा काहीही परिणाम होणार नाही असे बोलले जात आहे, कारण 2.82 लाख मतदारांपैकी फक्त 65 हजार मुस्लीम आहेत. बाकीचे सर्व हिंदू आहेत, जे भाजपलाच मतदान करतील.

मात्र, बिल्किस बानो प्रकरणाच्या परिणामामुळे संपूर्ण मुस्लीम मते काँग्रेसकडेच जातील, असे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अजितसिंह भाटी यांना वाटते. यासोबतच एससी-एसटी, आदिवासींची मतेही मिळतील, कारण महागाई आणि 27 वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीमुळे जनता त्रस्त आहे.

सुरुवातीपासून ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथून काँग्रेस पुन्हा विजयी होईल. मुस्लीम समाजातील कोणालाही तिकीट न दिल्याबद्दल ते म्हणतात, तसे केल्यास पराभव होईल.

पालिका निवडणुकीत ओवैसींच्या पक्षाने 7 जागा जिंकल्या

गोध्रा महानगरपालिकेच्या निवडणुकीत ओवैसींच्या पक्षाने 8 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 7 उमेदवार विजयी झाले होते. एआयएमआयएमचे नेते ताहिर म्हणतात की, आम्ही काँग्रेसची मते विभागत नाही, पण काँग्रेस आमची मते कमी करू शकते, कारण मुस्लीम समाज तर आमच्या पाठिशी आहे.

ताहिर यांच्या मते, हिंदूंची काही मते मिळतील आणि आमचा उमेदवार विजयी होईल कारण काँग्रेस आमचा व्होट बँक म्हणून वापर करत आहे. 2002 च्या दंगलीप्रकरणी आमचे 30 लोक अजूनही तुरुंगात आहेत. 11 जणांवर फाशीची टांगती तलवार आहे.

बिल्किस गँगरेपच्या दोषींच्या सुटकेचा मुद्दा

बिल्किस बानो प्रकरणाचा परिणाम गोध्राच्या निवडणूक समीकरणावर होऊ शकतो. 28 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी दाहोदच्या रंधिकपूर गावातील लोक दंगलखोरांच्या भीतीने शेतात आणि जंगलातून पळत होते. त्यापैकी 5 महिन्यांची गर्भवती बिल्किस बानो, 9 महिन्यांची गरोदर शमीम, 7 वर्षीय सद्दाम आणि तिची आई अमीना शेतात आणि जंगलात धावत राहिले. 3 मार्च 2002 रोजी त्यांना पाथलपाणीच्या जंगलात जमावाने घेरले. बिल्किससह 6 महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 15 जणांची हत्या झाली. या प्रकरणात 11 दोषींची 15 ऑगस्ट रोजी सुटका करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...