आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Ground Report From Bulgadi Village In Hathras : The Media Forgot About The Death Of A Dalit Girl, But It Caused Great Damage To The Social Harmony Of The Entire Village

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाथरसमधील बुलगडी गावातून ग्राउंड रिपोर्ट:दलित तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा माध्यमांना विसर, मात्र पूर्ण गावाच्या सामाजिक सलोख्याची झाली मोठी हानी

एम. रियाज हाशमी | हाथरस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडितेच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बॅरिकेड्सवरून येथील कठोर बंदोबस्त दिसतो. - Divya Marathi
पीडितेच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बॅरिकेड्सवरून येथील कठोर बंदोबस्त दिसतो.
  • तीन तरुणांची लग्ने मोडली; मुलीकडचे म्हणाले, या गावात मुलगी देणार नाही
  • पीडिता व आरोपीचे कुटुंबच नव्हे, तर गावातही कटुता

उत्तर प्रदेशातील अलिगड-आग्रा महामार्गावरील चंदपा पोलिस ठाण्यापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर बुलगडी गाव आहे. काही दिवसांपूर्वी दलित तरुणीवरील कथित अत्याचार प्रकरण घडले होते. तेव्हा संतप्त झालेल्या जमावाला आणि माध्यमकर्मींना रोखण्यासाठी कठोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. सध्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच शंभरहून अधिक बॅरिकेड्स लावलेले आहेत. ते पाहता तत्कालीन परिस्थितीचा अंदाज येतो.

गावाच्या प्रवेशद्वारापासून तीव्र वळणदार अरुंद मात्र पक्का रस्ता दोन किलोमीटर आत बुलगडी गावापर्यंत जातो. रस्त्यावरून जाताना पीक कापणीमुळे शेतांमध्ये दूरपर्यंत हिरवळ दिसत नाही. यापैकीच एका शेतातील नुकतेच लावलेले तारेचे कुंपण आणि किनाऱ्यावर पडलेल्या पेंढांवरून १४ सप्टेंबरला रात्री घडलेल्या घटनेची आठवण होते. सुरुवातीला एसआयटी आणि आता सीबीआय याच घटनेचा तपास करत आहे. बुलगडीचे वातावरण आणि रचना सर्वसामान्य गावाप्रमाणेच आहे. बांधावरून होणारे वाद तर प्रत्येक गावात असतात. मात्र या एकाच मुद्द्याने बुलगडचे चित्रच पालटले आहे. गावातील वृद्ध नागरिक रामेश्वर सांगतात की, हिवाळा सुरू होताच शेतात आणि पारावर उन्हात सर्वच जण एकत्र येऊन बसायचे. मात्र या घटनेनंतर लोकांचे वर्तन बदलले आहे. समोरासमोर असलेल्या घरांतही मोठी दरी पडली आहे. सीबीआयचा तपास आणि न्यायालयात या प्रकरणाकडे दोन घरांमध्ये असलेला वाद म्हणून बघितले जात असेल. मात्र संपूर्ण गावाला या घटनेची झळ बसली आहे. गावात सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात एक आणि ऑक्टोबरमध्ये दोन लग्न होणार होते. मात्र, या घटनेनंतर तिन्ही लग्ने मोडल्याची चर्चा आहे. वृद्ध कृष्णदत्त शर्मा यांनी सामाजिक कारणांमुळे या कुटुंबांची ओळख उघड केली नाही. मात्र ते सांगतात, लॉकडाऊनमुळे तिन्ही मुलांच्या लग्नाला आधीच उशीर झाला होता. या घटनेनंतर त्यांचे लग्नच मोडले आहे. अलिगड आणि आग्र्याहून या मुलांसाठी स्थळ आले होते. एवढ्या बदनामीनंतर या गावात मुलगी देण्यासाठी कोण तयार होईल, असेही ते म्हणतात.

गावात शिरताच सर्वात पहिले घर मुख्य आरोपी संदीपचे आहे. याच घराच्या दरवाजातून वाहनाच्या आवाजानंतर एक किशोरवयीन मुलगी बाहेर बघते. येथून डावीकडे जाणारा रस्ता गावात जातो. दुसरीकडे पीडितेचे घर आहे. या दोन्ही घरांमध्ये सहा फूट रुंद रस्त्याचे अंतर आहे. या घटनेनंतर ते आणखी वाढले आहे. पीडितेच्या घराच्या सुरुवातीलाच सीआरपीएफचा टेंट असून आत जाणाऱ्या रस्त्यावर मेटल डिटेक्टर बसवण्यात आलेले आहे. येथे बाजूलाच वाळूच्या गोण्यांमागे एके-४७ रायफल आणि कार्बाइनने सज्ज कमांडो तैनात आहेत. काही घराच्या वर तर काही बाजूला आहेत. आजूबाजूला नजर टाकल्यास सहा नाइट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक रेडिओ कम्युनिकेशन टॉवरही दिसते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांप्रमाणेच अनोळखी माणसांवर गावकरीही लक्ष ठेवून असतात.

कमांडरच्या आदेशानंतर दोन जवान टेंटमधून बाहेर येत टेबलवर ठेवलेल्या रजिस्टरमध्ये घरी येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, संपर्क क्रमांक, भेटण्याचा हेतू इत्यादी माहिती लिहून घेतात. या रजिस्टरमध्ये दिवसातून तीन ते चार वेळा गुप्तचर अधिकाऱ्यांची एंट्री लिहिलेली दिसते. यावरून या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात येते. सुमारे दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर पीडितेचे वडील, भाऊ आणि आत्या कमांडोंच्या सुरक्षेत बाहेर येतात. ते स्वत:हून काहीही बोलत नाहीत. केवळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. पीडितेच्या घरातून एखादी अनोळखी व्यक्ती बाहेर पडल्यास पुढे थोड्याच अंतरावर आरोपींचे नातेवाईक बसलेले दिसतात. ते कुणालाही अडवत नाहीत.

मात्र राम-राम म्हणून त्यांच्याकडे लक्ष वेधून घेतात. सुरुवातीला कुठल्याही प्रश्नाचे सरळ उत्तर देत नाहीत. मात्र थोड्या वेळातच त्यांचे तर्क मांडायला लागतात. ग्रामस्थ या दोन्हीही कुटुंबांपासून आणि माध्यमांपासून हात राखून आहेत. ६०० लोकसंख्या असलेल्या या गावात ३५० हून जास्त ठाकूर, ५० ब्राह्मण आणि इतर दलित आहेत. ग्रामस्थांची शांतता रहस्यमय आहे. या ग्रामस्थांची शांतता बरेच काही सांगून जाणारी आहे. काही प्रश्नांची उत्तरे वेळच देईल.

पीडितेचे वडील म्हणाले, काय बोलू? सारे काही संपले आहे...

सीबीआय चौकशीची मागणी पूर्ण झाल्याच्या प्रश्नावर पीडितेचे वडील सांगतात, आता बोलण्यासाठी काय उरले आहे? मुलीसोबत सर्व काही संपले. न्याय मिळेल किंवा नाही, मात्र आमचा विश्वास कायम आहे. मुलगी तर परत येणार नाही. तिच्यावर अंत्यसंस्कार तरी करू द्यायला हवे होते. चारही आरोपींना ब्रेन मॅपिंग आणि पॉलिग्राफ टेस्टसाठी सीबीआय गांधीनगर येथे घेऊन गेल्याचे पीडितेच्या वडिलांना सांगितल्यावर ते दीर्घ श्वास घेऊन म्हणाले, जेव्हा मुलीला न्याय मिळेल, तेव्हाच समाधान होईल. राजकीय पक्षांची सक्रियता कुटुंबीयांच्या चांगल्यासाठी असल्याचे ते सांगतात. कुटुंबावर संशय घेतला जात असल्याच्या प्रश्नावर ते प्रतिक्रिया देत नाहीत. मात्र, मुलगी तर गेली आहे, आता आमची उरलीसुरली अब्रू घालवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असल्याचे सांगायला ते विसरत नाहीत. पीडितेच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी रामपूर सीआरपीएफ सेंटरची एक कंपनी (१२५ जवान) तैनात आहेत.

आरोपीचे आजोबा म्हणाले, आमचीही मुलगी, मृत्यूची चौकशी व्हावी...

संदीपचे आजोबा राकेश सिंह म्हणाले की, आरोपींची बाजू कोण ऐकेल? आमच्या मुलांना फाशींपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था तुम्ही लोकांनी केली आहे. ती आमचीही मुलगी होती. तिच्या मृत्यूची चौकशी व्हावी. तिचे कुटुंबीय घटनेच्या वेळी शेतात असताना त्यांनी विरोध का केला नाही? काका-पुतण्या मिळून वाईट कृत्य करू शकतात का? सुरुवातीला एकट्या संदीपचे नाव टाकले, नंतर आणखी तीन नावे वाढवली. मुलगी पायी चालून गाडीवर बसली, पोलिस स्टेशनमध्ये गेली. नंतर टेम्पोमधून रुग्णालयातही गेली. मग पाठीचा कणा कसा मोडला? जीभ कशी कापली? जबाब कसे दिले? असे अनेक प्रश्न राकेश सिंह यांनी विचारले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser