आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
घृृष्णेश्वर मंदीराबाहेर अनिल आव्हाड यांचे मूर्ती आणि देवाच्या फोटोचे जुने दुकान आहे. मंदीर परिसरातील विक्रेत्यांच्या शिवपार्वती संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. घरात आई-वडील, पत्नी आणि ४ मुले आहेत. चार वर्षांपूर्वी वहिनीचे तर दोन वर्षापूर्वी भावाचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या ३ मुलांचा सांभाळही अनिलच करतात. घरात पहिली ते आठवीत शिकणारे मुलं आहेत. वडीलांना अर्धंगवायूचा झटका आल्याने ते बेडवर असतात. यामुळे ११ जणांचे पोट भरण्याची जबाबदारी अनिल यांच्यावरच आहे. त्यासाठी अनिल यांच्याप्रमाणे अन्य विक्रेते मे-जून पासुन सुरू होणारा पर्यटनाचा हंगाम आणि श्रावणाची वाट बघतात. यंदा तो बुडालाय.
अनिल आव्हाड म्हणाले, मार्च-एप्रिल परीक्षेचा महिना असल्याने पर्यटक कमी असतात. मे-जून पासून गर्दी सुरू होते. सर्वात महत्त्वाचा श्रावणाचा महिना. बारावे आणि शेवटचे ज्योर्तिलिंग असल्याने श्रावणात वेरूळमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. याच्या तयारीसाठी व्यावसायिक मार्चपासूनच तयारीला लागतात. आव्हाड यांनी ६ लाख रूपयांच्या घृष्णेश्वराच्या पितळीच्या मूर्ती नाशिकहून आणून ठेवल्या. वेरूळातून दगडाची पिंड आणि फोटो फ्रेमचा स्टॉक केला. सर्व मिळून ७-८ लाख रूपये अडकले आहेत. लेणी बंद आहे. तर श्रावण तांेडावर आहे. त्यामुळे हा माल विकला जाण्याची शक्यता नाही. एकिकडे पैसे अडकलेय तर दुसरीकडे घर कसे चालवायचा हा प्रश्न पडलाय. कोरोनाच्या रूपात घृष्णेश्वर कोपलाय, असे आव्हाड म्हणाले.
एक वर्ष मागे
मकरंद आपटे म्हणाले, १ जुलैपासून लेणी सुरू होणार होती. आता कधी सुरू होणार याचा काहिच अंदाज नाही. ती सुरू झाली तरी पर्यटक येतील का? पर्यटन हे सर्वात शेवटची प्राथमिकता असणारे क्षेत्र आहे. पर्यटक आले तरी त्यांच्याकडे आधीप्रमाणे पैसा असेल का? लॉकडाऊनमुळे वेरूळ एक वर्ष मागे गेले आहे.
२.२५ कोटीची उलाढाल ठप्प :
किमान ४५०० ते ५००० लोकं लेणी आणि मंदीरावर अवलंबून आहेत. काही लोकं कामासाठी नजीकच्या खेड्यातूनही येतात. प्रत्येक जण सरासरी ५०० ते २००० रूपये कमवतो. यातून दररोज २ ते २.५ लाख रूपयांचा व्यवसाय होतो. महिन्याकाठी ७५ लाख तर तीन महिन्यात २.२५ कोटी रूपयांची उलाढाल होते. सीझनमध्ये यात वाढच असते. ३.५ महिन्यांपासून ही उलाढाल ठप्प झाल्याचे मकरंद आपटे यांनी सांगीतले. एका कुटूंबातील ५ प्रमाणे २५ हजार जणांना लॉकडाऊनचा फटका बसलाय.
सिझन चाललाय
पर्यटनामुळे वेरूळसह परिसरातील बेरोजगारांना व्यवसाय मिळाला आहे. मोठी गुंतवणूक करून सीझनची तयारी केली होती. लॉकडाऊनमध्ये सिझन चाललाय. मंदीर आणि लेणी बंद असल्याने विक्री नाही. खूप नुकसान होतंय. घर कसे चालवायचे, हा प्रश्न पडलाय. -अनिल आव्हाड, अध्यक्ष, शिवपार्वती संघटना
पॅकेज जाहीर करावं
कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय कोलमडलाय. बहुतांशी मध्यमवर्गीय लोकं या व्यवसायात आहेत. पर्यटक नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने नुकसानीचा पंचनामा करून खास पर्यटनासाठी पॅकेज जाहीर करावे. - मकरंद आपटे, अध्यक्ष, एलोरा केव्ह्ज शाॅपकीपर्स अॅण्ड हॉटेल ओनर्स असोसिएशन
पर्यटक कसे येणार?
मागण्यांचे निवेदन सरकारला एप्रिलमध्येच पाठवले. त्याचे उत्तर आलेले नाही. परदेशी पर्यटकाला नियमाप्रमाणे १४ दिवस क्वारेंटाईन रहावे लागेल. बाहेरच्या राज्यातून येण्यातही अडचणी आहेत. स्थानिक पर्यटकांवर अवलंबून रहावे लागेल. यंदा व्यवसाय पूर्ण बुडाला आहे. -मधुसुदन पाटील, गाईड, वेरूळ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.