आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एड्ससारख्या जीवघेण्या रोगाला ज्या महिलांनी प्रचंड प्रयत्नाने थोपवलं त्यांची कोरोना विषाणूसोबतच्या लढाईत चारही बाजूंनी कोंडी झाली. धंदा बंद, खाण्याचे हाल, पोरांना शाळा नाही.. आयुष्याशी दररोजच झुंजणाऱ्या सलोनीसारख्या अनेक महिला-मुलींच्या डोळ्यात सध्या फक्त पाणी पाहायला मिळतंय.
एरवी बोलण्याचीही उसंंत नसलेली एक सलोनी निवांंत होती. हा निवांतपणाच तिच्यासारख्या अनेकींना तीन महिन्यांपासून खायला उठला आहे. बुधवार पेठेतील ‘धंदा’ बंद आहे. मास्क लावला तर धास्तीने ग्राहक येत नाहीत आणि मास्क काढला तर त्याच्याकडूनच लागण होण्याची धास्ती. अाशियातील दुसऱ्या क्रमाकांचा वेश्याव्यवसाय चालणाऱ्या बुधवार पेठेतले हे वास्तव. शरीराची भूक भागवण्यासाठी हा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या पोटात खड्डा पडला. ‘आधीच आमच्याकडे वाईट नजरेने पाहिले जाते. कुणी इकडे चक्कर मारली तरी त्याचे नाव खराब होते. आमचं तर विचारूच नका. मुलांना बापाचे नाव नाही, आईचं नाव दिलं गेलं, पण मुलांना हिणवलं जातं. या नरकातून मुलांना बाहेर काढायचंय. रोजची संकटं कमी की काय आता कोरोनानं पोटावर पाय दिला,’ सलोनी सांगत होती. तिच्या दोन-तीन मैत्रिणीही जमल्या. प्रत्येकीची तीच कहाणी. संसर्ग न होताच कोविड त्यांच्यासाठी मरणयातना घेऊन आलाय. अनेक प्रश्न त्या साऱ्या जणींच्या डोक्याचा भुगा करीत आहेत.
थर्मल गन देण्याची मागणी
बुधवार पेठेत किमान ५ हजार महिला, मुली देहविक्री करतात. गेल्या तीन महिन्यांपासून महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे सगळे खर्च सुरूच आहेत. त्यासाठी शासनाने किमान मदत करावी अशी यांची मागणी आहे. तसंच पुन्हा धंदा सुरू केला तरी येणारा ग्राहक संसर्गित नसेल याची खात्री करावी लागणार आहे. सॅनिटायझरचा खर्च वाढणार आहे. किमान पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन मिळावी अशी त्यांना आशा आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मदतीसाठी पत्र लिहिले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.