आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येसाठी आरोग्य यंत्रणेसोबतच नागरिकांचा निष्काळजीपणादेखील कारणीभूत ठरू लागला आहे. मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात असतानाही या आवाहनाला नागरिकांकडून हरताळ फासला जाऊ लागला आहे. त्यामुळे हिंगोलीसारख्या छोट्या जिल्ह्यात रुग्णांनी गाठलेला तीन हजारांचा आकडा चिंतेचा विषय बनला आहे. हिंगोली येथे एक शासकीय रुग्णालय असून वसमत, कळमनुरी येथे उपजिल्हा रुग्णालय, तर औंढा नागनाथ व सेनगाव येथे ग्रामीण रुग्णालय आहेत. तसेच वसमत येथे एक महिला रुग्णालय आहे. याशिवाय २४ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १३२ आरोग्य उपकेंद्रे आहेत. हिंगोली जिल्ह्यात २ मार्च रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता.
प्रशासनाकडून नागरिकांना गर्दी टाळणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याबाबत आवाहन केले जात आहे. मात्र या आवाहनाकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असून बाजारांमध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत चांगलीच गर्दी होत आहे. विशेष म्हणजे अनेक जण मास्कचा वापर करीत नाहीत. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून जनजागृती करताना पालिका प्रशासन हतबल झाले आहे. भाजी मंडईमध्ये विक्रेत्यांकडूनही मास्क वापरला जात नाही. त्यामुळे नागरिकांकडूनही निष्काळजीपणा होत असल्याचे स्पष्ट आहे.
शासकीय रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी अद्यापही प्रयोगशाळा नाही
शासकीय रुग्णालयात अद्याप प्रयोगशाळा नसल्याने नांदेड किंवा औरंगाबाद येथील प्रयोगशाळेवरच हिंगोलीच्या रुग्णांचे अहवाल अवलंबून आहेत. प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होऊ लागली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. रॅपिड अँटिजन चाचण्या केल्या जात असल्या तरी रविवारी ही चाचणी करण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्यामुळे संशयित रुग्णांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
काय आहेत आव्हाने :
> शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळा तातडीने सुरू करणे
> रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होणे आवश्यक
> नागरिकांनीही जबाबदारीने वागावे.
> आजवरचे एकूण रुग्ण २७५९, बरे झालेले रुग्ण २४७६, एकूण मृत्यू ४०, अॅक्टिव्ह रुग्ण २४७, खाटा २२००, व्हेंटिलेटर १००
नागरिकांनी सूचनांचे पालन करणे गरजेचे :
ग्रामीण भागातील नागरीक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत. मास्कचा वापर केला जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात दहा दिवस थांबावे लागत असल्याने कोरोनाची लक्षणे असल्यानंतरही नागरिक चाचण्या करून घेत नाहीत. नागरिकांनी सूचनांचे पालन केले पाहिजे.डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.