आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Ground Zero Report Of Aurangbad Corona Virus Outbreak : The Spread Of The Corona Was Not Noticed, So The Health Service Went On A 'ventilator'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड झिरो रिपोर्ट:कोरोनाचा फैलाव लक्षातच घेतला नाही, म्हणून रुग्ण ‘सेवा’ गेली ‘व्हेंटिलेटर’वर; मराठवाडा, खान्देशच्या रुग्णांचा ओघ वाढताच यंत्रणा सुसज्ज करणे होते आवश्यक

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर, बेड, व्हेंटिलेटर अन् कर्मचाऱ्यांशिवाय कठीण युद्ध जिंकणे अशक्य

शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याच्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध आईची अचानक प्रकृती खालावली. कोविड सेंटरमध्ये अॉक्सिजन आणि व्हेटिंलेटरची सोय नव्हती. कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी आईला इतरत्र हलवण्याचा सल्ला दिला. पोलिस कर्मचाऱ्याने शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णांलयांमध्ये चौकशी केली. एकही बेड शिल्लक नसल्याचे त्याला कळाले. अखेर वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली. प्रसंग बाका होता. इकडे आई अत्यवस्थ. आईकडे पाहून मुलाचाही जीव कासावीस होत होता. वरिष्ठांनी फोनाफोनी केल्यानंतर अखेर जिल्हा रुग्णालयात एक बेड मिळाला खरा पण... ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावण्याचे सोपस्कर पूर्ण करून उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची ७० वर्षीय आई जग सोडून गेली. मन सुन्न करणारी ही घटना. पैसाअडका सर्व हाताशी असूनही आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेकडून ‘वैद्यकीय व्यवस्थापन’ होत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. साथ रोग हाताबाहेर गेलाय. कोरोनाविरुद्ध लढण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांनी निकराची तयारी तर केली,पण संकटाची फैलाव किती झपाट्याने होतोय हे लक्षातच घेतला नाही. नव्या अडचणींवर मात करण्याच्या योजना गतीने तयार केल्या नाहीत. बेड, व्हेंटिलेटर, डॉक्टर, कर्मचाऱ्यांशिवाय कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकणे अशक्य हे साधे सूत्रही अमलात आणण्यात उशीर झाला. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. रुग्णांच्या नातेेवाइकांना बेड शोधत फिरावे लागत असून दुसरीकडे कोरोनाचा फैलावही आटोक्यात आलेला नाही. कोरोनाने औरंगाबादेत पहिला बळी ५ एप्रिल रोजी घेतला. आतापर्यंत ८५० लोकांचे मृत्यू झाले. ३० हजार कोरोनाबाधित झाले. अनेकांचे प्राण डॉक्टरांनी वाचवले. तरीही नियोजन सातत्याने बिघडत आहे. ही वस्तुस्थिती आहे.

काय आहे आव्हान

मराठवाड्याच्या इतर शहरांतील कोविड सेंटरचे रूपांतर जिल्हास्तरीय कोरोना रुग्णालयात करणे. तेथे पुरेसे डॉक्टर, कर्मचारी, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे हे खरे आव्हान आहे. त्यात थेट आरोग्यमंत्र्यांनी निर्णय घेतले तरच आव्हान पेलता येईल. औरंगाबादेत खासगी डॉक्टरांची सेवा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना चर्चा आणि आक्रमकतेचा समन्वय साधावा लागेल.

सुपरस्पेशलिटीला सावत्र वागणूक :

औरंगाबादेतील २५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे राज्य सरकारसाठी सर्वात मोठा ऐवज होता. पण, तेथे डॉक्टर, कर्मचारीच दिले नाहीत. प्रसारमाध्यमांनी खूप आरडाओरड केल्यावर ५० बेडचे आयसीयू सुरू झाले.

काय आहेत चुका

१ मनपा, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे कोरोना संकटाशी लढत आहेत. राज्य सरकारही त्यांना संवेदनशीलपणे प्रतिसाद देत आहे, असे गेल्या सहा महिन्यांत दिसले नाही.

२ औरंगाबादमध्ये इतर शहरांतून रुग्ण येणार, याचा अंदाज येताच बेड वाढवून डॉक्टर नियुक्तीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न झाले नाहीत.

३ घाटी आणि जिल्हा रुग्णालयात अजूनही बेड संख्या कमीच.

४ नियोजनातील त्रुटी दूर करण्यात प्रदीर्घ काळ लागत आहे.

२५ हॉस्पिटल, १८०० बेडची तयारी

रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेसे बेड, डॉक्टर, कर्मचारी नसल्याचे सप्टेंबरच्या प्रारंभी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी २५ खासगी हॉस्पिटलला १८०० बेड वाढवण्याची सूचना केली. पण, डॉक्टरच नसल्याचे कारण पुढे करत हॉस्पिटल संचालकांनी त्याची पूर्ण अंमलबजावणी केली नाही. मग राज्याचे सचिव संजीवकुमार यांनी सरकारी रुग्णालयांसाठी होम आयसोलेशनचे धोरण ठरवा असे सांगितले. त्यावर रुग्णालयांसाठीचे धोरण तयार केले.

महिनाभरात परिस्थिती बदलेल : जिल्हाधिकारी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे औरंगाबादला मराठवाड्यासह जळगा,धुळे यासारख्या खान्देश आणि बुलडाणा सारख्या विदर्भाच्या जवळच्या जिल्ह्यांमधूनही रुग्ण येतील. त्यासाठी बेड, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी लागतील, याचा अंदाज वरिष्ठ पातळीवर घेतला गेला नाही. अगदी ऑक्सिजन सिलिंडर किती लागतील, याचा अभ्यास झाला नाही. औषधींची टंचाई तर पाचवीला पुजली आहे. यावरून काय ते समजून घ्यावे. दरम्यान, होम आयसोलेशन, खासगी डॉक्टरांची नियुक्ती आणि इतर जिल्ह्यांतील रुग्णालयांचा दर्जा वाढल्यावर म्हणजे महिनाभरात परिस्थिती बदलेल, असा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला.

होम आयसोलेशनचा पर्याय चांगला

रुग्णसंख्या आणि बेड यांचा ताळमेळ बसवणे कठीणच आहे. त्यामुळे होम आयसोलेशनचा पर्याय सर्वात चांगला आहे. यातून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल. डॉ. प्रवीण सूर्यवंशी, सीईओ, एमजीएम

बातम्या आणखी आहेत...