आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘ज्यांनी बिल्किसवर सामूहिक बलात्कार केला, माझ्या 3 वर्षांच्या मुलीला ठार मारले, माझ्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केली त्यांना सरकारने कसे सोडले. यावर आमचा विश्वासच बसत नाही. हा विचार करूनच मला भीती वाटतेय. या निर्णयाने बिल्किस खचून गेली आहे.’ बिल्किस बानो यांचे पती याकूब रसूल यांनी दैनिक दिव्य मराठी नेटवर्कला ही प्रतिक्रीया दिली.
2002 च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानो या 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या 11 जणांची गुजरात सरकारने सुटका केली आहे. हे सर्वजण 2004 पासून तुरुंगात होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 2008 मध्ये दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
दोषींच्या सुटकेच्या निर्णयाने बिल्किस बानोच्या कुटुंबीयांना जेवढा धक्का बसला आहे, तेवढेच ते घाबरले देखील आहेत. याकुब रसूलचे म्हणणे आहे की, बिल्कीस ही बाब समजल्यानंतर निराश झाली आहे. कोणाशी बोलत नाही. ती काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही.
याकुबने सांगितले की, त्यांना दोषींच्या सुटकेबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा प्रकार घडल्याचे माध्यमांकडून समजले. यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. जे घडले त्यामुळे आम्ही खूप घाबरलेलो आहोत.
पुढे काय होणार याची बिल्कीसला काळजी वाटते. मनात खूप भीती आहे. असे कसे जगायचे? असे होईल असे आम्हाला कधीच वाटलेही नव्हते. त्याचा अंदाजही नव्हता.
याकुबचे म्हणणे आहे की, त्या लोकांना कोणत्या आधारावर सोडण्यात आले, आमच्याकडे अद्याप अधिकृत माहिती नाही. सरकारने काय आणि कसे केले याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. आम्ही प्रथम कागदपत्रे पाहू, त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरवू.
याकुब म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रकरणात आमच्या कुटुंबातील सदस्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. माझ्या मुलीला मारले. एवढ्या मोठ्या गुन्ह्यातील दोषींना सरकारने कसे सोडले, याचा विचार आम्ही करत आहोत.
दंगलीपासून आमचे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत होते. आम्ही 15 पेक्षा जास्त वेळा घरे बदलली. आता भीती वाढली आहे. आम्ही भीतीने जगत असल्याचे आम्ही वेळोवेळी सांगितले आहे. पूर्वी ते (सर्व दोषी) पॅरोलवर बाहेर यायचे, तेव्हाच आम्हाला भीती वाटत होती. आता तर सरकारने त्यांची सुटकाच केली आहे.
2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला बिल्किस बानो यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश दिले होते. यावर याकूब म्हणाले की, आम्हाला सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार नुकसान भरपाई मिळाली.
या कुटुंबाला ना राजकीय पक्षांकडून मदत मिळाली, ना कोणी त्यांच्याकडे आले. माझ्या कुटुंबाने दीर्घ कायदेशीर लढा लढला आणि दोषींना शिक्षा झाली. देशाचे, संविधानाचे पालन करणारे आपणच आहोत. संविधानानेही आम्हाला न्याय दिला. सरकारच्या निर्णयाने सर्व काही एका झटक्यात संपले.
महिलांचा अपमान करू नये, असे पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून सांगितले होते. त्याच दिवशी आरोपींची सुटका करण्यात आली. मला जनतेला सांगायचे आहे की, जे बलात्कार्यांच्या सोबत आहेत, जे असे गुन्हे करणार्यांना सोडून देत आहेत, त्यांना प्रश्न विचारा. अत्याचार झालेल्या महिलांना साथ द्या. त्यांनी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे.
गुजरात दंगलीत 750 मुस्लिम मारले गेले
27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा येथे जमावाने साबरमती एक्स्प्रेसचा एक डबा जाळला. यामध्ये अयोध्येहून परतणाऱ्या 57 कारसेवकांच्या मृत्यूनंतर दंगल उसळली होती. या दंगलीत एक हजाराहून अधिक लोक मारले गेले. त्यात बहुसंख्य मुस्लिम होते. केंद्र सरकारने मे 2005 मध्ये राज्यसभेत सांगितले की गुजरात दंगलीत 254 हिंदू आणि 750 मुस्लिम मारले गेले.
हल्ला झाला तेव्हा बिल्किसचे कुटुंबीय शेतात लपून बसले होते
3 मार्च 2002 रोजी दाहोद जिल्ह्यातील रणधिकपूर गावात बिल्किस बानोच्या कुटुंबावर हल्ला झाला. दंगलीमुळे ती कुटुंबासह शेतात लपून बसली होती. तेव्हा बिल्किस 21 वर्षांची होती आणि ती 5 महिन्यांची गर्भवती होती. दंगलखोरांनी बिल्किसवर सामूहिक बलात्कार केला. तीची आई आणि इतर तीन महिलांवरही बलात्कार झाला. कुटुंबातील 7 जणांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात 17 पैकी 14 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 6 सापडले नाहीत. या हल्ल्यातून फक्त बिल्कीस, एक पुरुष आणि एक तीन वर्षांचा मुलगा बचावला होता.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली
2008 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने मे 2017 मध्ये निकाल कायम ठेवला होता आणि पुराव्याअभावी यापूर्वी सोडलेल्या सात जणांनाही दोषी ठरवले होते. या प्रकरणात 5 पोलिस कर्मचारी आणि दोन डॉक्टरांवरही निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.