आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आम्ही पोहोचलो आहोत जगातील एक तृतीअंश लसी तयार करणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या फार्मा क्लस्टरमध्ये... अर्थात हैदराबादच्या जिनोम व्हॅलीत. जिनोम व्हॅली हे आज सर्वात महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे कारण येथे सुमारे तीन बड्या कंपन्यांत एक हजारहून अधिक शास्त्रज्ञ कोरोना लस निर्मितीवर दिवसरात्र काम करत आहेत. आम्ही येथे पोहोचल्यावर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की, जगात कुठेही कोरोना प्रतिबंधक लसीचा शोध लागो, जगातील निम्म्या लोकसंख्येला दिले जाणारे सुमारे ४०० कोटी डोस हैदराबादच्या या जिनोम व्हॅलीत एका वर्षात तयार होऊ शकतात. कारण, जगातील लस निर्मिती करणाऱ्या मोजक्या कंपन्यांत नाव असलेल्या भारत बायोटेक, बायोलॉजिकल ई आणि इंडियन इम्युनोलॉजिकल जगातील सुमारे एक डझन अव्वल कंपन्यांसोबत यावर संशोधन करत आहेत. केवळ या तीन कंपन्यांची लस तयार करण्याची वार्षिक क्षमता ४०० कोटी लसीची आहे. म्हणजेच या तीनपैकी कोणत्याही कंपनीने लस शोधून काढली तरी त्याची निर्मिती मात्र येथेच होईल. लस इतर कोणत्या कंपन्यांनी शोधली तरी त्याची निर्मिती मात्र येथेच होईल, अशी आशा आहे. कारण, येथील इतर कंपन्यांनाही यात सहभागी करून घेतले तर येथे वर्षाला ६०० कोटी लस तयार करण्याची क्षमता आहे.
दुसरे म्हणजे, एकाच प्रकारची लस सर्व लोकांवर गुणकारी ठरणार नाही, म्हणून या कंपन्या ८ प्रकारच्या लसीवर संशोधन करत आहेत. म्हणजे, लक्षणे पाहून प्रत्येकाला वेगळी लस दिली जाईल. तिसरे म्हणजे, अशा लसीसाठी आणखी किमान ८ महिने वाट पहावी लागणार आहे. एप्रिल २०२१ पूर्वी ही लस उपलब्ध होऊ शकणार नाही. भारत बायोटेक ३ प्रकारच्या, बायोलॉजिकल ई ३ तर इंडियन इम्युनॉजिकल २ प्रकारच्या लस तयार करत आहेत. यावर संशोधन सुरू असून जी सर्वोत्तम लस असेल ती सर्वात अगोदर बाजारात येईल. पूर्वी आलेल्या लस एकाच प्रकारे काम करतात. मात्र, कोविडच्या प्रत्येक लसचे तंत्र वेगळे असेल. काही लस दोन महिने, काही एक वर्ष तर काही जीवनभर या रोगापासून रक्षण करू शकतील. काही कंपन्यांचे संशोधन हे विषाणूचा पूर्ण नायनाट करण्यासाठी आहे, तर काहींचे काही वर्षे त्यापासून रक्षण करण्यासाठी आहे.
जिनोम व्हॅलीचे शास्त्रज्ञ डॉ. प्रभूकुमार चालानी कोरोना विषाणूशिवाय अँटिबॉडिजवरही संशोधन करत आहेत. त्यांच्या मते, काेरोनाची लस जगभरात सर्वत्र एकाच प्रकारची तयार होऊच शकत नाही. कारण, हे विषाणू १३०० प्रकारचे आहेत. मलेशियातील कोविड विषाणू तत्काळ मनुष्याच्या िजवाला धोका ठरणारा आहे. तर दुसरा विषाणू कृष्णवर्णीयांवर फारसे गंभीर परिणाम करत नाही. शिवाय जगभरात लोकांच्या वयोमानानुसार या विषाणूचे वेगवेगळे परिणाम असतील तर एकाच प्रकारची लस कशी तयार होऊ शकेल.
18 देशांचे शास्त्रज्ञ येथे करताहेत संशोधन
18 देशांच्या २०० कंपन्या जिनोम व्हॅलीमध्ये संशोधन करतात. या फार्मा क्लस्टरमध्ये १५ हजार शास्त्रज्ञ संशोधन करतात.
600 कोटी लसीचे डोस वर्षाला तयार करण्याची क्षमता. याला सिटी ऑफ व्हॅक्सिन म्हणता येईल.
14 हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल जिनोम व्हॅलीतून सरकारला प्राप्त होतो.
04 लाख नव्या नोकऱ्या या भागात येत्या १० वर्षांत निर्माण होतील. १०० अब्ज डॉलरचा उद्योग वाढेल. १९९९ मध्ये या व्हॅलीची स्थापना झाली होती.
तीन कंपन्या, सुमारे एक हजार शास्त्रज्ञ, १८-१८ तास काम...
भारत बायोटेकच्या एका कर्मचाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, की संशोधन सुरू असलेल्या भागात शास्त्रज्ञांशिवाय कुणालाही परवानगी नाही. भारत बायोटेकमध्ये १२० शास्त्रज्ञ आणि २०० सहकारी रोज सुमारे १८ तास काम करत आहेत. बायोलॉजिकल ईच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले, की आता आणखी एक शिफ्ट सुरू झाली आहे. पूर्वी ५ ते १० लोक थांबत. आता ३०० शास्त्रज्ञ थांबत आहेत. यानंतर आम्ही इंडियन इम्युनॉलॉजिकलच्या प्रकल्पावर पोहोचलो. तेथे एका अधिकाऱ्याने सांगितले, की त्यांची पहिल्या टप्प्यातील लसीची मानवी चाचणी सुरू झाली आहे.
लसीसाठी ४०० कोटी बाटल्या जमा करणे हे पण आव्हानच...
जिनोम व्हॅलीस्थित एमएन पार्कचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, की उद्योगमंत्री केटीआर यांच्याशी चर्चेदरम्यान बायोलॉजिकल ईच्या एमडी महिमा दातला यांचे म्हणणे हाेते की, लस तर तयार होईलच. परंतु, इतक्या मोठ्या प्रमाणात ही लस ठेवण्यासाठी बाटल्या (कंटेनर) कुठून आणणार? तेलंगण सरकारचे मुख्य सचिव जयेश रंजन यांनी सांगितले, की जिनोम व्हॅलीत कार्यरत कंपन्या आता आपली क्षमता वाढवणार आहेत. यामुळे संपूर्ण जगाला दिलासा मिळू शकेल. येथे जगभरातील लोकांसाठी सुमारे ४ अब्ज लसी तयार होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.