आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकनाट्य:शुभ मंगल चरणी गण नाचला...

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या लोकसंस्कृती आणि परंपरेतील कुठलेही मंगल कार्य ईशस्तवनाशिवाय पूर्णत्वाकडे जात नाही. ही प्रथा लोकरंगभूमीवरही कटाक्षाने पाळली जाते. लोकनाट्य वा तमाशातून कला सादर करण्याआधी होणारा ‘गण’ हे विघ्नहर्त्याच्या आराधनेचे असेच प्रतीक आहे. आपल्या लोककलावंतांनी, शाहिरांनी गणेशवंदनाची ही परंपरा वर्षानुवर्षे केवळ जपलीच नाही, तर ती समृद्ध केली आहे.

ग णपतीचे नामस्मरण केल्याशिवाय कोणत्याही लोककलेचा प्रारंभ होत नाही. गणपती हे रिद्धीसिद्धीचे प्रतीक आणि विद्या, कलांचे दैवत. यक्षगण, दशावतारातही रिद्धीसिद्धीसमवेत गणपतीचे मुखवटाधारी रूप रंगमंचावर प्रकट होते. तीच परंपरा लोककला किंवा तमाशाच्या बोर्डावरसुद्धा पाहायला मिळते. फरक एवढाच, की तमाशात मुखवटाधारी गणपतीचे स्मरण करीत नाहीत, तर शब्द आणि टिपेतील गायकीने, तुणतुण्याच्या सुरावटीवर हलगी-ढोलकीच्या तालात गण गायला जातो. या गणातून गणेशाला वंदन केल्याशिवाय तमाशा पूर्णत्वाकडे जात नाही. अनेक प्रतिभावंत लोककलावंतांनी आणि शाहिरांनी तमाशाच्या रचना लिहिल्या. त्याप्रमाणे गण-गवळण, बतावणी, लावणी, कटाव, शिलकार, टाकण्या इत्यादी गायकीचे प्रकार वापरण्यात येतात. कलगी-तुऱ्याचा गण, भेदिक गण, दांगट चालीतील गण असे गणांचे अनेक प्रकार शाहिरांनी लिहिले. पूर्वीच्या काळी ज्या शाहिरांनी तमाशा रंगभूमीला नवा आयाम दिला, त्यात प्रामुख्याने शाहीर प्रभाकर, अनंत फंदी, राम जोशी, शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर परसराम, शाहीर सगनभाऊ, शाहीर सातू हिरू कवलापूरकर, शिवा संभा, शाहीर भाऊ फक्कड, शाहीर हरिभाऊ वडगावकर, शाहीर भाऊ बापू मांग नारायणगावकर या आणि अशा कित्येक प्रतिभावंत शाहिरांनी तमाशासाठी गणपतीच्या गणासाठी अनेक रचना लिहिल्या आहेत. सातू हिरू यांच्या तमाशाच्या फडातील साथीदार राऊ कांबळे यांनी उत्तम पद्धतीचे गण लिहिले आहेत, ते म्हणतात...

मी गणाचे नमन करतो पाच वेळेला। गणाचे नाव घेता उभा राहिला।। सरस्वती संगे घेऊनी सभेमध्ये आला। कानामध्ये कुंडल शोभती तयाला। कवलापूरमध्ये सातू हिरूने गण गाईला। सांगे राऊ अक्षरे कळू द्या सभेला।। राऊ कांबळे यांच्या दांगट चालीतून ज्या शाहिरांनी गण गायला, त्या गावाच्या आणि शाहिराच्या नावाचा उल्लेख या गणात केल्याचे दिसते. गणपतीच्या नमनामध्ये, ‘गणपतीराया आमच्या श्रद्धेपोटी तुम्ही विद्येची आराध्य दैवत सरस्वतीला घेऊन यावे, तसेच येताना साजशृंगार करून यावे. तुम्ही आलात म्हणून हे शब्द आम्ही तुमच्यासाठी गायले’, अशा पद्धतीने गणाच्या रचना सातू हिरूच्या तमाशात ऐकायला मिळतात. शाहीर शिवा संभा कवलापूरकर यांनी गणेश स्तवनाच्या रचना अगदी कमी प्रमाणात केल्या आहेत. ते विघ्नहर्ता गणेशाची स्तुती करताना आपल्या तमाशाच्या प्रारंभी म्हणतात... नमन वक्रतुंडा त्रिभुवनी तुझा झेंडा। मूर्ती तुमची आमच्या चित्ती सभा रंगणी द्यावी स्फूर्ती ।। अमृताचे बोल फुलती मुखातून तडातडा। ब्रह्मकन्या नाचत अंगणी थापेतून कडाकडा।।

शिवा संभाच्या या गणातून, ‘हे वक्रतुंडा, तू तिन्ही लोकांचा धनी आहेस. तुझा झेंडा सर्वत्र मिरवला आहे. तुझ्या चरणी आमची विनंती आहे, की हा तमाशा पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आम्हाला स्फूर्ती दे!’ असे गाऱ्हाणे घातले आहे. शिवा संभाप्रमाणेच भाऊ फक्कड ऊर्फ भाऊ मालोजी भंडारे या शाहिराची तमाशा करण्याची धाटणी काही वेगळीच होती. त्यांच्या गायकीत शास्त्रीय संगीताचा बाज दिसून यायचा... आज पुजूया गण अधिरंगणा। रंगणा भव भय भंगणा।। रिद्धी सिद्धीचा तू जगदाता सरस्वती शिणली गुण गाता। तालासुराचा सबळज्ञाता।। घिम घिम घिम घिम घिम कीट धा ता किट धा घिम ता कट कट गदिगण धा धा धिन धा।। तमाशाच्या बोर्डावर भेदिक कवन गाण्याची परंपरा खूप जुनी आहे. मुळात तमाशा अाख्यान लावणीच्या स्वरूपात लोकांच्या समोर सादर व्हायचे, पुढे तोच तमाशा विविध घटकांनी एकत्रित येऊन निखळ मनोरंजनासाठी सर्वांगसुंदर स्वरूपात साकारला. यात काही शाहीर कलगी पक्षाचे होते, तर काही शाहीर तुरा पक्षाचे होते. कलगी-तुऱ्याच्या या परंपरेत पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड हे एकमेकांना प्रतिस्पर्धी मानायचे. पठ्ठे बापूराव कलगी पक्षाचे, तर भाऊ फक्कड तुरा पक्षाचे. एकदा गणाच्या झडतीमध्ये पठ्ठे बापूरावांनी भाऊ फक्कड यांना एक प्रश्न विचारला. त्यात ते म्हणतात... गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर ठेवीला कोणासाठी। त्यांच्या या प्रश्नाला भाऊ फक्कडांनी तेवढ्याच शिताफीने उत्तर दिले, ते म्हणतात... गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहिला यक्षिणी प्रति।। तमाशाच्या उत्कर्षाच्या काळात उदयाला आलेले हे शाहीर एकमेकांवर अशा पद्धतीने प्रश्न-उत्तर टाकायचे.

तमाशा परंपरेत पठ्ठे बापूरावांनी सर्वात जास्त गणांच्या रचना केल्याचे आढळते. गणेशाला पारंपरिक पद्धतीने नमन केल्यावर विघ्न येऊ नये म्हणून त्याला आपल्या गणातून आवाहन करताना पठ्ठे बापूराव म्हणतात... लवकर यावे सिद्ध गणेशा। आतमध्ये कीर्तन वरून तमाशा।। माझा भरवसा तुम्हावर खासा। झेंडा मिरवीशी दाही दिशा।। पठ्ठे बापूरावांच्या गणात आविष्काराचा एक नावीन्यपूर्ण क्रम दिसतो. डौलदारपणा, लयबद्धता, नादमाधुर्यासोबतच शब्दांच्या जडणघडणीतून पठ्ठे बापूरावांनी तमाशात पूर्ण गण साकारले. गणातील डौलदारपणा हा बापूरावांचा हातखंडा होता. कलेचे सादरीकरण निर्विघ्न पार पडावे म्हणून गणेशाला वेगवेगळ्या उपमा देत ते गणाला निमंत्रित करतात, ते असे...

शुभ मंगल चरणी गण नाचला। नाचला कसा तरी पाहू चला।। गण वाकड्या सोंडेचा, गण हत्तीच्या पिंडाचा। पाऊल पडला त्याचा... छुम छुम छुम।। पठ्ठे बापूरावांची धाटी शुद्ध मराठी बालेघाटी। खबर आणली मग शंभर नंबरी वरवरची कोल्हापूरची। पंचगंगेला रस्ता मग पोचला । शुभमंगल चरणी गण नाचला।। शाहीर पठ्ठे बापूरावांप्रमाणेच इतर तमाशा कलावंतही प्रतिभावंत होते. त्यामध्ये भाऊ बापू नारायणगावकर यांच्या रचनांची छाप काही वेगळीच होती. त्यांच्या तमाशाच्या आरंभी गायला जाणारा गण विशेष असायचा. भाऊ बापूंनी रचलेल्या गणात शिवपार्वतीचा उल्लेखही आढळतो, ते म्हणतात... शिवपार्वतीचा बाळ आधी नाम घेती। मग वंदनी वेदमंत्रा।। एकूणच आपल्या लोकसंस्कृती आणि परंपरेतील कुठलेही मंगल कार्य ईशस्तवनाशिवाय पूर्णत्वाकडे जात नाही. शेतकरी धान्याची रास पूजल्याशिवाय धान्य उचलत नाहीत. व्यापारी पूजाअर्चा केल्याशिवाय दिवसाचे व्यवहार सुरू करीत नाहीत. हीच परंपरा लोकरंगभूमीवरही कटाक्षाने पाळली जाते. तमाशातून कला सादर करण्याआधी होणारा ‘गण’ हे गणेशाच्या आराधनेचेच प्रतीक आहे. आपल्या लोककलावंतांनी, शाहिरांनी गणेशवंदनाची ही परंपरा वर्षानुवर्षे केवळ जपलीच नाही, तर समृद्ध केली आहे.

डॉ. गणेश चंदनशिवे ganesh.chandan20@gmail.com संपर्क : 9820451716

बातम्या आणखी आहेत...