आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Hathras Ground Report: Daughter Called Police Uncle Repeatedly Before Fathers Murder, Ground Report From Hathras

हाथरस येथून ग्राउंड रिपोर्ट:आरोपीला राजकारणात यायचे होते, म्हणूनच खटला परत घेण्यासाठी टाकत होता दबाव; वडिलांच्या हत्येपूर्वी मुलीने 'पोलिस अंकल'ला फोन केले, पण...

पूनम कौशलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलीची छेड काढणाऱ्याविरुद्ध खटला दाखल करणाऱ्या पित्याची हत्या

हाथरसच्या नौजरपूर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या भोवताली मजूर बटाटे गोळा करत आहेत. दूरवर पसरलेल्या या शेतांमध्ये ठिक-ठिकाणी बटाट्यांचा आणि त्यांनी भरलेल्या पोत्यांचा ढीग दिसत आहे. सोबतच बटाट्यांनी भरलेले ट्रॅक्टर सुद्धा आहेत. येथे छेडछाडीवरून हत्या कुठे झाली असे विचारले असता लोकांनी एका शेताच्या दिशेने हात दाखवला.

नौजरपूर गावातील याच शेतात सोमवारी अर्थात 1 मार्च रोजी अमरीश शर्माची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. छेडछाडीवरून सुरू झालेल्या वादात ही हत्या करण्यात आली. परिवार आणि गावातील लोकांनी सांगितले, की तीन वर्षांपूर्वी अमरीश शर्मा यांच्या मुलीची छेड काढण्यात आली होती. त्या प्रकरणी त्यांनी गौरव शर्माच्या विरोधात खटला दाखल केला होता. त्यात दोषी गौरवला कारावासाची शिक्षा झाली होती. गौरव वेळोवेळी अमरीश यांच्यावर खटला परत घेण्यासाठी दबाव टाकायचा. याच वादात गौरवने अमरीश यांचा खून केला.

घटनास्थळी पोहोचलो तेव्हा...
आम्ही घटना घडली त्या शेतात पोहोचलो. शेताच्या कडेला एक व्यक्ती दोन्ही हात डोक्याला लावून बसली होती. जवळ जाऊन संवाद साधला तेव्हा त्यांचे नाव जगदीश असून ते गेल्या 20 वर्षांपासून अमरीश यांच्यासोबत काम करत असल्याचे कळाले. अमरीश याच ठिकाणी बटाईने शेती करतात. त्यांनी येथे बटाट्याची लागवड केली होती. त्या दिवशीच्या घटनेबद्दल विचारताच जगदीश यांना अश्रू आवरले नाही. जड अंतःकरणातून ते म्हणाले, "अमरीश आमच्या भावाप्रमाणे होते. त्यांनी आमच्या भाऊ साहेबांना आमच्यासमोरच गोळ्या झाडून ठार मारले आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. बंदूकांसमोर कुदाळ आणि दांडूके काय करणार? ते बेछूट गोळीबार करत होते."

त्या दिवशी 70 मजूर शेतात होते...
अश्रू पुसताना जगदीश पुढे म्हणाले, "मजूरांकडे पाहून फायरिंग करताना त्यांनी धमकावले होते की कुणी साक्ष दिली तर त्याला देखील ठार मारले जाईल. त्या वेळी येथे 70 मजूर काम करत होते. पण, गोळीबार सुरू असल्याने ते सगळेच आपला जीव वाचवून पळाले." मजुरांना याबद्दल विचारले तेव्हा ते उघडपणे काहीच बोलण्यास तयार नव्हते. एकाने फक्त एवढेच सांगितले की नौजरपूरमध्ये अशी घटना यापूर्वी कधीच पाहिली नाही. अमरीश यांच्या शेतात 12 वर्षांपासून काम करणाऱ्या एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, की "मारणाऱ्यांपैकी कुणालाही कसलीच भीती वाटत नव्हती. ते लोक जीव घेण्यासाठीच आले होते. 'खटला परत घेतलाच नाही ना, आता घे, मर!' असे ते म्हणत होते. पळून जाताना सुद्धा त्यांनी गोळ्या झाडल्या."

ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो, तेव्हा आम्हाला सुकलेल्या रक्ताचे डाग दिसून आले. पोलिस या घटनास्थळावर पहारा देत आहेत. याच शेतात एका विहीरीच्या बाजूला झोपडीमध्ये आम्हाला जेवणाचा डबा दिसून आला. हा डबा त्या दिवशी अमरीशसाठी त्याच्या पत्नीने आणला होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, हल्लेखोरांनी त्यांच्या पत्नीला लक्ष्य करून सुद्धा गोळ्या झाडल्या. पण, त्या धावताना पडल्या आणि गोळ्या त्यांच्या अगदी जवळून निघून गेल्या.

अमरीश शर्मा यांच्या एका नातेवाइकाने सांगितले, की "पोलिस आले तेव्हा कुठे मजूर कामावर परतले आहेत. अमरीश शर्मा एकटेच सर्व भावांसाठी शेत सांभाळायचे. आता शेती कशी चालेल? अमरीश यांचे दोन्ही मोठे भाऊ शहरात नोकरी करतात. शेती करेल असे कुणीच नाही."

दोन मुलींचे वडील राहिलेले अमरीश यांचे गावात सर्वांकडून कौतुक केले जाते. ते सर्वांनाच मदत करायचे. जगदीश यांनी सांगितले, की त्यांच्या मुलीचे लग्न अमरीश यांच्याच हस्ते पार पडले होते. माझे एकाकडून पैसे येणार होते. पण, लग्नात वेळेवर ते मिळाले नव्हते. "भाऊंच्या (अमरीश) शेतात गेलो तेव्हा त्यांनी माझ्या चेहऱ्यावरूनच मी किती चिंतेत आहे हे समजून घेतले. लग्नात 25 हजार रुपये कमी पडत आहेत असे मी त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी वेळीच आपल्या पत्नीला सांगितले, की याला 50 हजार रुपये द्या."

नेत्यांकडून फक्त राजकारण
अमरीश यांचे घर शेतापासून 300 ते 400 मीटर दूर आहे. सर्वच पक्षाचे नेते आता अमरीश यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत. अंगणात नेते मंडळी बसलेली असताना अमरीश यांच्या नात्यातील एक महिला नेत्यांकडे पाहून म्हणाली, जितके शुभ्र पांढरे कपडे घालतात तितकेच मनातून काळे...'

एका मुलीने आपल्या मोबाईलमध्ये माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे ट्विटर हँडल उघडून दाखवले, की पाहा हे लोक फक्त आपले राजकारण चमकवत आहेत. थोडीशी संवेदनशीलता असती तर आमच्या बहिणीचा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी तिचा चेहरा झाकला असता. तिने आपल्या वडिलांना गमवले. उभे आयुष्य तिच्यासमोर आहे.

पत्नीची अवस्था न सांगण्यासारखी
आत एका खोलीमध्ये अमरीश यांच्या पत्नी बेशुद्ध पडल्या आहेत. पतीच्या हत्येनंतर त्यांची अवस्था न सांगण्यासारखी आहे. मुलगी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करते, पण स्वतःचे अश्रू आवरू शकत नाही. त्यात मध्येच अमरीश यांच्या फोनची रिंगटोन वाजते. त्यावर पत्नी डोळे उघडून अचानक मुलीला सांगते, की 'बघ ह्यांचा फोन वाजतोय, जा बरं त्यांना देऊन ये.' काही बडबडल्यासारखे करत त्या पुन्हा बेशुद्ध पडतात. त्यांची ही अवस्था सभोवतालच्या महिलांना पाहावत नाही. अमरीश यांची हत्या झाली तेव्हापासून त्या असेच करत आहेत.

आरोपीची राजकारणात उतरण्याची होती तयारी
मुलीने सांगितले, की "गौरव माझ्या मागे लागला आहे. लग्नासाठी दबाव टाकतो आणि नेहमीच माझी छेड काढतो. यालाच कंटाळून आम्ही खटला दाखल केला होता. त्यानंतर खटला परत घेण्यासाठी तो दबाव टाकू लागला. कारण, त्याला राजकारणात उतरायचे होते. फेब्रुवारी 2019 मध्ये सुद्धा त्यांना वडिलांना धमकावले होते. तसेच शेतात हल्ल्याचा प्रयत्न केला होता. आपल्या मावशीच्या गावात येऊन तो वेळोवेळी धमक्या द्यायचा. कित्येक वेळा आम्हाला पोलिसांना बोलवावे लागले होते."

अमरीश शर्मा यांच्या हत्येचा आरोपी गौरव शर्मा नौजरपूर गावाचा रहिवासी नाही. तो मूळचा बहराइच येथील आहे. पण, हाथरसच्या नौजरपूर गावात त्याची मावशी राहते. या बहाण्याने तो महिना-महिना याच गावात राहायचा. गौरवच्या मावशीचे घर गावाच्या सुरुवातीलाच आहे. गौरवसह त्याचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सुद्धा आरोपी आहेत. त्या सर्वांच्या घरांवर सध्या कुलूप आहेत.

हाथरसचा आरोपी गौरव शर्मा
हाथरसचा आरोपी गौरव शर्मा

गौरव आणि अमरीश यांच्या कुटुंबांमध्ये अनेकवेळा वाद व्हायचे. गौरवकडून होणारी छेडछाड याचे मुख्य कारण होते. अमरीश यांच्या मुलीने आपल्या मोबाईलमध्ये गावातील एका पोलिसाचा मोबाइल नंबर 'पोलिस अंकल' नावाने सेव्ह केला होता. पारुल सांगते, "त्या दिवशी सकाळी पुन्हा वाद झाला. गौरवच्या घरातील महिलांनी सांगितले होते की तुझ्या बापाचा आज मुडदा पाडणार. आम्ही यासंदर्भात पोलिस अंकलला फोन केला होता. पण, त्यांनी पोहोचण्यास उशीर होईल असे सांगितले होते. तोपर्यंत 112 वर फोन लावा असा सल्ला त्यांनी दिला. पण, त्यावर फोन करून सुद्धा पोलिस आलेच नाही."

अमरीश यांना दोन मुली आहेत. त्यातील दुसऱ्या मुलीचे आधीच लग्न झाले आहे. ती सध्या गर्भवती आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी ती माहेरची होती. याच दरम्यान तिच्या वडिलांचा खून झाला. ज्या ठिकाणी तिच्या वडिलांची हत्या झाली त्या ठिकाणी ती रोज जाऊन आपल्या मनातील वेदनांना वाट मोकळी करून देते.

बातम्या आणखी आहेत...