आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:श्रद्धा आहेच, थोडी सबुरीही दाखवा!

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात अचानक झालेल्या प्रचंड पावसामुळे शिर्डीची जी अवस्था झाली, त्यातून इतर गावांना काही गोष्टी शिकाव्या लागतील. राज्यातील बहुतांश तीर्थक्षेत्रे ही लहान किंवा मध्यम आकाराची गावे आहेत आणि त्यातील अनेक ठिकाणी अशा आपत्तीला तोंड देण्याची व्यवस्था नाही. उलट शहराचे अर्थकारण देवस्थानाभोवतीच एकवटल्याने तिथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे भविष्यातील अशी आपत्ती टाळायची असेल, तर शिर्डीमध्ये नेमकं काय बिघडलं याचा धांडोळा घ्यावा लागेल.

ज गाच्या कानाकोपऱ्यातून शिर्डीला येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात साईंविषयी अपार श्रद्धा असते. साईंबाबांच्या दर्शनासाठी तो अनेक हालअपेष्टा सहन करतो, चार-चार तास रांगेत उभा राहतो. ऊन-वारा-पावसाचीही तमा बाळगत नाही. कधी नुसत्या मुखदर्शनानेही तो अक्षरशः भरून पावतो. शिर्डीची पवित्र माती हीच त्याच्यासाठी उदी असते अन् गावात कुठेही मिळणारी न्याहरी आणि भोजन त्याच्यासाठी प्रसादासम असते. पण भाविकांचा नेमका हाच ‘श्रद्धानंद' गेल्या काही वर्षांत काही लोकांच्या आडमाप कमाईचे साधन कधी बनून गेला हे कळलंच नाही! नैसर्गिक ओढे-नाले बुजवून त्यावर उभारलेली पंचतारांकित हॉटेल्स, उंच-प्रशस्त इमारती, रेस्टॉरंट्स, हार-फुले, प्रसाद विक्रीची दुकानं आणि या सगळ्या विस्कळीत शहरीकरणाच्या आडून फोफावत चाललेली गुंडगिरी, ‘पॉलिश’वाल्यांची वाढती संख्या... अशा अनेक घटकांमुळे उभ्या राहिलेल्या प्रश्नांनी शिर्डीच्या ‘देवस्थान’ म्हणून असलेल्या माहात्म्याभोवती फेर धरला आहे. अगदी तसाच फेर जसा गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीनंतर या गावाभोवती पाण्याने धरला होता...

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा फटका बसतोच. तसाच पुराचा नैसर्गिक फटका शिर्डीला गेल्या आठवड्यात बसला. त्यामुळे मोठी वित्तहानी झाली; परंतु जीवितहानी मात्र झाली नाही हेच सुदैव. पूर्वी १९६९ सप्टेंबरमध्ये शिर्डीला पूर आला होता. त्यात काही दुकाने वाहून गेली होती. त्यानंतर तब्बल ५३ वर्षांनी बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ च्या रात्री अवघ्या अडीच तासांत तब्बल पाच इंच म्हणजे १२७ मिमी पाऊस झाला. यामुळं शहराच्या उत्तरेकडील पूर्व-पश्चिम भाग पूर्णपणे जलमय झाला. सरकारी विश्रामगृह, पोलिस स्टेशन, साईबाबा भोजनालय आणि साईनाथ रुग्णालय परिसराला तलावाचं रूप आलं. कनकुरी रोड, प्रसादालय रोड, शिर्डी-कोपरगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. लक्ष्मीनगर, सीतानगर, श्रीरामनगर आदी भागातील नागरी वसाहतीत पाणी शिरले. नव्यानं बांधण्यात आलेलं शिर्डी पोलिस स्टेशन आणि कर्मचारी निवासस्थाने पाण्यात बुडाली. प्रसादालयाला चहुबाजूंनी पाण्याने वेढा दिला. १५ एकरांवरील पार्किंगचा परिसर पूर्णपणे पाण्यात होता. गेल्या कित्येक वर्षांत शिर्डीने असा पाऊस आणि पूरस्थिती अनुभवली नव्हती. कमी अवधीत झालेल्या प्रचंड पावसामुळे शिर्डीची जी स्थिती झाली, त्यातून जसे अनेक प्रश्न उभे राहिले, तसे काही इशारेही आपल्याला मिळाले आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश तीर्थक्षेत्रे ही लहान किंवा मध्यम आकाराची गावे आहेत आणि तिथेही अशा आपत्तीला तोंड देण्याची व्यवस्था नाही. उलट त्या त्या ठिकाणच्या देवस्थानाभोवतीच तिथले सारे अर्थकारण एकवटल्याने प्रचंड प्रमाणात अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे. एका अर्थाने परवा शिर्डीला पाण्याचा वेढा पडला असला, तरी राज्यातील बहुतांश तीर्थस्थाने आणि बेसुमार वाढलेली सगळीच गावे अशा आपत्तीच्या काठावर आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे शिर्डीच्या अनुभवातून सगळ्याच गावांना, शहरांना काही गोष्टी शिकाव्या लागतील. त्यासाठी शिर्डीमध्ये नेमकं काय बिघडलं याचा धांडोळा घ्यावा लागेल.

खरं तर शिर्डीचं पावित्र्य आणि मांगल्य इथल्या ग्रामस्थांच्या अनेक पिढ्यांनी जिवापाड जपलं. पण जसजसा काळ पुढे सरकू लागला तसं शिर्डीचं व्यापारीकरण वाढलं. भाविकांच्या श्रद्धेचं ‘मूल्यां'कन होऊ लागलं. सरासरी ५०० कोटी वार्षिक उत्पन्न असलेलं शिर्डी देवस्थान देशभरातील श्रीमंत देवस्थानांत गणलं जाऊ लागलं. शिवाय भरभक्कम आर्थिक कमाईचं ठिकाण म्हणूनही व्यावसायिकांमध्ये शिर्डीची ओळख झाली. आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांसारख्या राज्यांतून हॉटेल व्यावसायिकांनी शिर्डीमध्ये आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली राहण्याची व्यवस्था हवी म्हणून लॉज व्यवसायिकांनीही मोठी गुंतवणूक करत आपल्या ब्रँडची पंचतारांकित हॉटेल शिर्डीमध्ये उभी केली. साधारणतः वीस-पंचवीस वर्षांपूर्वी जी शिर्डी सर्वसामान्यांची आणि खऱ्याखुऱ्या भाविकांची होती तीच आता श्रीमंतांची शिर्डी म्हणून ओळखली जाऊ लागली. तिथल्या एक चौरस फूट जमिनीला लाखोंचा भाव आला. इथे ‘पॉलिश’वाले तासा-दोन तासांत हजार-दीड हजाराची कमाई करतात. बाकी व्यावसायिकांचं तर विचारायलाच नको! या सगळ्या बदलांमध्ये शिर्डी गुन्हेगारांसाठी जणू नंदनवन ठरू लागली. एकीकडे ‘श्रद्धे’चा असा बाजार मांडला जात असताना दुसरीकडे ‘सबुरी’ मात्र केविलवाणी, अगदी असहाय झाल्याचे दिसते आहे. आपल्या गावाची, साईबाबांच्या या शिर्डीची अशी दयनीय अवस्था जुन्या-जाणत्या ग्रामस्थांना पाहवत नसेल. रुचत नसेल. पण त्याविषयी बोलायचं कुठं आणि कुणाला, असा प्रश्न त्यांनाही पडत असावा.

शिर्डीकरांवर ही वेळ का आली? साईबाबांची शिर्डी अशी अचानक पाण्याखाली का गेली? या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधावी लागतील. कारण हे संकट नैसर्गिक तर आहेच; पण त्याहीपेक्षा अधिक ते ‘मानवनिर्मित' आहे. अतिश्रीमंती आणि पैशांच्या हव्यासापोटी शहरातील ओढे - नाले बुजवून त्यावर उंच इमारती उभ्या करण्याचा अट्टहास गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे, त्याचाच हा परिपाक होता. आणि विशेष म्हणजे अशी बेकायदा बांधकामे होऊ नयेत यासाठी त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे तिनेही त्याकडे गेली वीस-पंचवीस वर्षे कानाडोळाच केला. शिर्डीतील मूळ नाला गोदावरीपर्यंत २० किलोमीटरचा होता. याच लेंडी नाल्यामध्ये नांदुर्खी, कोऱ्हाळे, डोऱ्हाळे येथून पाणी येतं. पूर्वी १९७२ पर्यंत तो बारमाही होता. २०१६, २०१९ मध्येही पावसाचं पाणी शहरात घुसलं होतं. शिर्डीत हा ओढा रुंद आहे, मात्र निघोज - शिर्डी - शीव, रुई - शिर्डी शिवारात काही हॉटेल व्यावसायिकांनी या ओढ्यावर अतिक्रमणे केली. ते पाणी भुयारी पाइपलाइनने काढून दिले. रुई - शिंगवे हद्दीत तर शेतकऱ्यांनी हा ओढाच गायब केल्याचं पाहायला मिळतं. त्याचाच फटका लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, श्रीरामनगर, पूनमनगर, सीतानगर भागाला बसला. कनकुरी भागात ओव्हरफ्लोचे पाणी चक्क पाटाखालून साईनाथ रुग्णालयात आले. दुसरीकडे शिर्डी विमानतळ परिसरातील काकडीपासून उमंग पावणारा नाला पुढे नांदुर्खी मार्गे शिर्डी आणि पुढे शिंगवे मार्गे गोदावरीपर्यंत जातो. मात्र, विमानतळ ते शिर्डीपर्यंत नाल्याचे अस्तित्वच राहिले नसल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह शिर्डीत दाखल होतो. आता प्रशासनाने शिर्डी ते गोदावरी पात्रापर्यंत ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विमानतळ ते शिर्डी या नाल्याचं काय, हा प्रश्न कायम आहे.

संस्थान वगळता उर्वरित शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या प्रक्रियेत शिर्डीकरांना पूर्णपणे नगरपंचायत आणि राज्य शासनावर अवलंबून राहावं लागतं. शिर्डी नगरपंचायतीचं वार्षिक अंदाजपत्रक ८० कोटी रुपयांचं आहे. त्यात ५० कोटी रुपयांचा उत्पन्नाचा भाग. नाही म्हणायला शिर्डी शहरातील २४ रस्त्यांच्या विकासासाठी संस्थानने २०२० च्या मार्चमध्ये नगरपंचायतीला ८.९८ कोटी निधी उपलब्ध करून दिला. शिर्डी बसस्थानक आणि भक्त निवासात अग्निशमन यंत्रणाही संस्थाननेच बसवली आहे. संस्थानचा निधी स्थानिक विकासकामांसाठी वापरण्यामध्येही बऱ्याच कायदेशीर अडचणी आहेत. त्यातून काही मार्ग काढता येतो का, याचा विचार आता करावाच लागेल. शिर्डी नगरपंचायतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करतानाच आवश्यक तेवढा तांत्रिक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याकडेही राज्य सरकारला लक्ष द्यावे लागेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवरील बेलगाम राजकारणालाही वेसण घालावी लागेल. राज्य सरकार, साई संस्थान आणि नगरपंचायत या तिन्हींमध्ये योग्य तो समन्वय असायलाच हवा. त्यासाठीच ‘शिर्डी विकास प्राधिकरणा’ची एक संकल्पना काही वर्षांपूर्वी चर्चेत होती. परंतु, तीसुद्धा लालफितीत अडकल्याचे दिसते. अशा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून योग्य तो समन्वय ठेवून पुढच्या चाळीस ते पन्नास वर्षांसाठी नगर नियोजन केले तर भविष्यातील अशा आपत्ती टाळता येतील. त्यासाठी हितसंबंध बाजूला ठेवून राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती मात्र दाखवावी लागेल. तीर्थस्थानाविषयी असलेल्या श्रद्धेच्या बरोबरीने अर्थार्जनाबाबत थोडी सबुरी ठेवली, तर प्रत्येकाच्या आयुष्यात संपन्नता येईल. साईबाबांनी तरी याशिवाय दुसरी कोणती शिकवण दिली आहे?

अनिरुद्ध देवचक्के aniruddha.devchakke @dbcorp.in संपर्क : 9890664779

बातम्या आणखी आहेत...