आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनमध्ये डोकेदुखी ठरताहेत ‘हॅकर्स’

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओटीपी, पासवर्ड अनोळखींना शेअर करू नका; गुगलवर खरी लिंक पाहावी

काहीही करून समोरच्याला आपल्या जाळ्यात अडकवणे यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या कल्पना लढवतात. तंत्रज्ञानात नागरिकांपेक्षा दहा पावले पुढे असणारे हॅकर्स नागरिकांना गंडवण्यातही माहिर असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून ‘रिकामटेकडे हॅकर्स’ अधिक ‘अॅक्टिव्ह’ झाल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या तर एखादी इन्शुरन्स कंपनी, बँक, फूड सप्लायर कंपनी, ऑनलाइन गेम्सच्या नावाने फेक मेसेज लिंक करून फसवणूक केली जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात शहरात सुरू असणाऱ्या सायबर गुन्ह्यांकडे सायबर पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे. यापूर्वीदेखील विभागाच्या वतीने नागरिकांना व्हॉट्सअॅप आणि पर्सनल मेसेजद्वारे येणाऱ्या कुठल्याही लिंकला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. परंतु प्रशासनाने वेळीच या घटनेची दखल घेऊन तातडीने सोशल माध्यमातून नागरिकांना आपले व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होऊ नये यासाठी कुठली काळजी घ्यावी याविषयी सूचना देण्यात आल्या. सध्या ऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री तसेच सतत मेसेज करून त्यातील बनावट लिंकच्या आधारे नागरिकांचे बँक डिटेल्स मिळवण्याचे काम ‘हॅकर्स’ करत आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना सायबर तज्ज्ञ अॅड. गौरव जाचक म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियातून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आणि त्यांमुळे फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे. या काळात हॅकर्स मोठ्या संख्येने अॅक्टिव्ह झाले आहेत. नागरिक मात्र काळजी घेत नाहीत. आपल्याला बँकेच्या अथवा एखाद्या कंपनीच्या नावाने आलेली लिंक ते तपासून घेत नाहीत. त्यावर क्लिक करून फसवणूक करून घेतात. गुगलवर संबंधित लिंक खरी अथवा खोटी हे तपासता येणे शक्य आहे. त्याचा उपयोग करावा.

नागरिकांनी काळजी घ्यावी : पोलिस उपायुक्त

फेक मेसेजद्वारे नागरिकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी माहित देऊ नये. यात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर शाखा संभाजी कदम यांनी केले आहे.

दारूच्या दुकानाच्या नावाने फेक वेबसाइट

वाइन शॉप बंद आहे तर ऑनलाइन दारू मिळेल, असे फेक मेसेज सुरुवातीला लोकांना येऊ लागले. यामुळे अनेकांना फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नव्हे, तर त्या त्या भागातील दुकानाच्या नावाने लिंक ग्राहकांना पाठवण्यात आली. दारूच्या दुकानांचे फेक पोर्टल्स तयार केल्याचे दिसून आले. हे काम हॅकर्सचे होते. अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे अॅड. जाचक यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...