आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी उमेद:अग्रदूत प्रकाशाचा

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी उमेद आध्यात्मिक उपदेश करत नाही. नवी उमेद आजच्या, कालच्या वा पुराणकाळच्या थोरामोठ्यांची जीवनविषयक वचनं समोर ठेवत नाही. नवी उमेद कसलंही ‘सेल्फ हेल्प’ पॅकेज, आत्मोन्नतीचे विविध मार्ग सांगत नाही. नवी उमेदचे पाय जमिनीवर आहेत. नवी उमेदची भाषा प्रचितीची आहे. नवी उमेदमध्ये तुम्हाला तुमच्यासारखेच लोक भेटतील. फरक इतकाच की त्यांना जग काळवंडलेलं वाटत नाही, त्यांना जगण्यात आशा दिसते. आणि ती आशा त्यांनी स्वप्रयत्नाने निर्माण केलेली असते.

रोज सकाळी उठून आपण चहा पीत पेपर वाचतो. जगात, देशात, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, हे जाणून घेतो. संपर्कसाधनं वाढत गेली आणि आपण नगराचे, राज्याचे, देशाचे करता करता साऱ्या जगाचे नागरीक होऊन गेलो. त्यामुळे अमेरिकेतल्या निवडणुकीतही आपल्याला रस असतो. शिवाय, दिवसेदिवस लहान होत चाललेल्या या जगात प्रत्येकाचं हित उरलेल्या सगळ्या लोकांशी बांधलं गेलं आहे. आपोआपच जगाची खबर घेण्याची आपल्याला सदा उत्सुकता असते. पण ही खबर अनेकदा मनाला उभारी देणारी नसते. जगभर, देशभर चाललेल्या गोष्टी अनेकदा उदास करणाऱ्या असतात. उद्याविषयी चिंता वाटावी, अशा असतात. म्हणून मग आपल्यातले काही जण अशी खबर घेणंच टाळतात. म्हणजे, पेपरातल्या बातम्या शक्यतो वाचत नाहीत. पण असं करणाऱ्यांच्या जगाचा परीघसुद्धा ‘मी आणि माझं कुटुंब’ इतका चिंचोळा नसतो. मित्रमंडळी असतात, आपल्या आवडीनिवडी जुळणारे लोक असतात. नातेवाइकांचं तर मोठं जाळं असतं. या सगळ्यांशी तर संबंध आपण राखून असतोच.

त्या संबंधाचं आजचं नाव आहे, सोशल मीडिया. फेसबुक. व्हॉट्सॲप. ट्विटर. इन्स्टाग्राम. या गोष्टी आपल्या जवळच्या असतात. बातमी देणाऱ्या वर्तमानपत्रातल्या बातमीतल्या घटनेचा संबंध वाचकाशी थेटपणे आहे की नाही, याच्याशी त्या वर्तमानपत्राला काही देणंघेणं नसतं. सोशल मीडियाला नक्कीच असतं! पण अलीकडच्या काळात सोशल मीडियासुद्धा गढूळ होऊन गेल्याचा अनुभव आपण घेत आहोत. तिथे माहिती, विचारांची देवाणघेवाण यांच्यापेक्षा भांडणं, उखाळ्यापाखाळ्या, अफवा, वितंडवाद यांना ऊत आलेला दिसतो.

मग काय करायचं? जग दिवसेदिवस बिघडत चाललं आहे आणि भविष्याविषयी आशा बाळगण्यासारखं काहीही कुठेही होत नाही, असं म्हणायचं? कायमचं उदास व्हायचं? निराश व्हायचं? आणि त्या निराशेचंच प्रक्षेपण आपल्या जवळच्या, आवडत्या, प्रेमाच्या माणसांमध्ये करायचं? त्यांनादेखील निराशेची लागण द्यायची? याला इलाज नाही?

आहे, याला इलाज आहे. त्या इलाजाचं नाव आहे, नवी उमेद. रोज सकाळी पेपर वाचल्यानंतर, सोशल मीडियावर नजर टाकल्यानंतर न चुकता ‘नवी उमेद’ या फेसबुक पेजवर जा. आणि जगण्याविषयी, उद्याविषयी आशेचा प्राणवायू छातीत भरून घ्या. रोज न विसरता नवी उमेदला भेट द्या. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि आता यूट्यूब, सगळीकडे नवी उमेद उपस्थित आहे. ही घ्या नवी उमेदची लिंक: https://naviumed.org नवी उमेद आध्यात्मिक उपदेश करत नाही. नवी उमेद आजच्या, कालच्या वा पुराणकाळच्या थोरामोठ्यांची जीवनविषयक वचनं समोर ठेवत नाही. नवी उमेद कसलंही ‘सेल्फ हेल्प’ पॅकेज – आत्मोन्नतीचे विविध मार्ग – सांगत नाही. नवी उमेदचे पाय जमिनीवर आहेत. नवी उमेदची भाषा प्रचितीची आहे. नवी उमेदमध्ये तुम्हाला तुमच्यासारखेच लोक भेटतील. फरक इतकाच की त्यांना जग काळवंडलेलं वाटत नाही, त्यांना जगण्यात आशा दिसते. आणि ती आशा त्यांनी स्वप्रयत्नाने निर्माण केलेली असते. कोणीतरी म्हटलं आहे, ‘तुम्हाला जगात बदल घडवून आणायचाय? मग तुम्ही स्वत:च बदल व्हा.’ सुरुवात स्वत:पासून, स्वत:च्या परिसरापासून करा. बदल घडेल. तो बदल आणखी कुणाला प्रेरणा देईल. असं करत हळूहळू जग बदलेल.

खरंच? बघा ना; बालपणी पोलिओ झाल्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या तांदुळजा गावच्या मीरा कदम यांचे पाय गेले आणि त्या अधू झाल्या. घरची परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि जि. प. शाळेत शिक्षिका झाल्या. पण त्यांनी स्वत:ला स्वत:च्या पायांवर उभं केलं, इतपतच त्यांचा मोठेपणा नाही. दुष्काळात त्यांनी पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं समुपदेशन केलं. त्यांना जगण्याची आशा दिली. याच्या पुढे जाऊन हिंगोलीत त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केलं. कोविडकाळातही त्या मुलांच्या शिक्षणात मीरा कदम यांनी खंड पडू दिला नाही. जगात सगळीकडे वाईटच घडत नसतं. कुठेतरी मीरा कदम स्वत:च्या अपंगत्वातून इतरांना मदत करण्याची प्रेरणा घेत असतात. नवी उमेदमधून तुमची मीरा कदम यांच्याशी ओळख होते.

नंदुरबार हा प्रामुख्याने आदिवासी जिल्हा. तिथल्या धडगाव तालुक्यातल्या निगदी गावातली गोष्ट. गणेश पराडगे यांनी गावातल्या १५ जणांची ‘सामूहिक वनव्यवस्थापन समिती’ स्थापन केली. १५ जणांच्यात पाच महिला. सामुदायिक वनाधिकारात गावाला ७०० हेक्टर जमीन मिळाली होती. त्यातल्या ५० हेक्टर जमिनीवर रोजगार हमी योजनेतून वृक्षलागवड करण्यात आली. कुऱ्हाड आणि चराई यांना दोन वर्षं बंदी घालण्यात आली. वृक्षसंवर्धनासाठी वनविभागाची मदत मिळाली. परिणाम? ‘‘येणाऱ्या तीन वर्षांत बांबू आणि फळं यांच्या विक्रीतून गावाला काही लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल,’’ असं गणेश म्हणतात! निगदीकडून प्रेरणा घेऊन आसपासच्या सहा गावांनी त्यांच्या परिसरात बांबू, निंब, आंबा, मोह अशा स्थानिक स्थितीत वाढणाऱ्या झाडांची लागवड केली आहे. आता तिथे तापमानात घट झाली आहे, गावांचं उत्पन्न वाढलं आहे आणि काही कुटुंबांना उदरनिर्वाहाचं साधनही मिळालं आहे!

आहे ना प्रेरणादायक? अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांना प्रसिद्धी देणं, हेच काम नवी उमेद करत आहे. गेली पाच वर्षं! दररोज किमान एक स्टोरी. घडलेली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गावात. साध्यासुध्या माणसांकडून. जग यांचंसुद्धा आहे. जगावर यांचासुद्धा हक्क आहे. तुम्ही केवळ यांचा ‘पक्ष’ जवळ करायचा आहे!

असलं काही करण्यासाठी माणसं जमवण्याची, सरकारी योजनांचा उपयोग करण्याची गरज आहेच, असं नाही. औरंगाबादचे डॉ. चंद्रशेखर बिडवई २०११ पासून त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ गरजू व्यक्ती-संस्था यांना मदत करत असतात. त्यालाच ते वर्षश्राद्ध समजतात. गेल्या वर्षी कोविडचा जोर असताना त्यांनी औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाला २५ पीपीइ किट्स देणगी दिले! त्यासाठी अर्थातच अगोदर विविध नमुने तपासून सर्वोत्तम नमुन्याची निवड केली. याचा फायदा किती रुग्णांना झाला असेल! धार्मिक विधी करण्यापेक्षा रक्तदान शिबिराचं आयोजन, अपंग विद्यार्थ्यांना मदत, वृद्धाश्रमाला देणगी अशा गोष्टी डॉ. बिडवई करत असतात.

अशा घटना घडत असतात. अशी माणसं काहीतरी करत असतात. एकदा करण्याचं ठरवलं की काय करणं शक्य आहे, याचा विचार करता येतो. पण महत्त्वाची गोष्ट अशी, की हे होत असतं! असे लोक निराशेचा, हमरीतुमरीचा अंधार दाटू देत नाहीत. आणि गेल्या पाच वर्षांमध्ये नवी उमेदने अशा अनेकानेक व्यक्ती, संस्था, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या कामाला प्रकाशात आणलं आहे. २०१६ च्या २६ एप्रिलपासून सुरू झालेला हा उपक्रम आजही चालू आहे. प्रकाशाकडे तोंड केलं की अंधार दिसेनासा होतो. नवी उमेद या प्रकाशाकडे या, तुम्हालाही याचा अनुभव येईल!

हेमंत कर्णिक
hemant@sampark.net.in

बातम्या आणखी आहेत...