आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Highly Educated Young Woman Leaves Aviation Course Due To Father's Accident And Doing Passenger Transport In Naxal affected Areas

दिव्य मराठी विशेष:वडिलांचा अपघात झाल्यामुळे एव्हिएशनचा कोर्स सोडून उच्चशिक्षित तरुणी नक्षलग्रस्त भागात करते प्रवासी वाहतूक

अतुल पेठकर | नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नक्षलग्रस्त रेंगुठातील किरण कुर्मावारच्या धाडसाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या तालुक्याच्या ठिकाणापासून ७० किमीवरील रेंगुठा हे नक्षलप्रभावित भागातील गाव. महामंडळाच्या एसटीचे दर्शन कधीतरी होते. कच्चे रस्ते, डोंगराळ भाग आणि नक्षल्यांची दहशत अशा भागात रेंगुठा ते सिरोंचादरम्यान किरण कुर्मावार ही उच्चविद्याविभूषित मुलगी चक्क बोलेरो जीप चालवते. दिल्लीत एव्हिएशनचा (ग्राउंड स्टाफसाठी) अभ्यासक्रम करत असलेल्या किरणने वडिलांच्या अपघातानंतर थेट जीपचे स्टिअरिंग हातात घेतले. तिच्या या धाडसाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही घेतली आहे.

आदिवासीबहुल रेंगुठात उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे किरणसह तिच्या दोन मोठ्या बहिणींनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. मोठ्या बहिणींपैकी एकीने रसायनशास्त्रात, तर दुसरीने बायोटेक्नाॅलाॅजीत पदवी घेतली. किरणने अर्थशास्त्रात एम. ए. केल्यानंतर दिल्लीत एव्हिएशनच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तिचे वडील रमेश कुर्मावार बोलेरो जीपमधून प्रवासी वाहतूक करायचे. पाच वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वडील यापुढे फारसे काम करू शकणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर किरणने एव्हिएशन सोडून सिरोंचा गाठले व बाेलेरोचे स्टिअरिंग हाती घेतले. आता ती रेंगुठा ते सिरोंचा अशी ७० किमी प्रवासी वाहतूक करते. प्रवासादरम्यान खूप गरीब प्रवासी असला तर ती त्याच्याकडून प्रवास भाडे घेत नाही. अपघातग्रस्तांच्या मदतीलाही धावून जाते. नक्षलवाद्यांच्या सावटात जीप चालवून आत्मनिर्भर झालेल्या किरणचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या किरणकडे तीन बोलेरो, संपूर्ण दिवसभरात होते एकच फेरी

किरणने सांगितले, ‘गेल्या दोन वर्षांत रस्ता खूपच उखडला आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. याशिवाय गावातून नेणाऱ्यांनाच परत आणायचे असल्याने फक्त एकच फेरी होते. तहसील, बँक वा शाळेच्या कामासाठी लोक सिरोंचाला जातात. सुरुवातीला तासभर लोकांना गोळा करण्यासाठी गावात फिरावे लागते. नंतर दोन तास प्रवासात जातात. सिरोंचाला लोक उतरले की कामे करून दुपारी २ ते २.३० पर्यंत परत येतात. नंतर परतीचा प्रवास सुरू होतो. आज माझ्याकडे तीन बोलेरो आहेत. एका बोलेरोत आतमध्ये १२ ते १४ आणि टपावर १० प्रवासी आम्ही नेतो. एका प्रवाशाकडून १२० रुपये घेतले जातात. ’

बातम्या आणखी आहेत...