आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरगहू महागण्याची चिन्हे!:गहू, पीठ, मैद्यावर निर्यातबंदी लावण्याची केंद्र सरकारवर वेळ

लेखक: नीरज सिंह/ अनुराग आनंद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा शेतकरी जगाचे पोट भरत आहे. इजिप्तने भारताकडून गहू आयातीला मंजुरी दिली आहे. जगाची वाढती मागणी लक्षात घेता आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गव्हाची निर्यात विक्रमी 100 लाख टनचा आकडा पार करू शकते.
15 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली. तेव्हा भारत विक्रमी पद्धतीने परदेशात गव्हाची विक्री करत होता, मात्र 4 महिन्यांनंतरच स्थिती इतकी बदलली आहे की शनिवारी भारत सरकारने गव्हाशिवाय पीठ, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवर बंदी घातली.
त्यामुळे या परिस्थितीत भारतात गव्हाच्या साठवणुकीची स्थिती काय आहे, देशात पीठाच्या टंचाईची कारणे काय आहेत? या वर्षी गहू आणि पिठाची किंमत वाढू शकते काय? हे दिव्य मराठीच्या एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया...
भारताने यावर्षी मार्चपर्यंत 70 लाख टन गहू दुसऱ्या देशांमध्ये विकला
2022 च्या सुरूवातीला रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्याने पुरवठा साखळी तुटली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. अनेक शेजारी देश भारताकडे बघू लागले.
जगातील वाढत्या किंमतींचा फायदा घेण्यासाठी भारताने यावर्षी मार्च पर्यंत सुमारे 70 लाख टन गहू निर्यात केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 215% जास्त आहे. एप्रिलमध्ये भारताने विक्रमी 14 लाख टन गव्हाची निर्यात केली होती, मात्र मे मध्ये देशातील गव्हाचे संकट बघता भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
आता पुढे जाण्यापूर्वी ग्राफिक्समधून भारताकडून परदेशात गहू विक्रीच्या स्थितीवर एक नजर टाकूया...​​​​​

देशात गव्हाचा साठा 14 वर्षांच्या निचांकी स्थितीवर

21 ऑगस्ट 2022 रोजीच्या लाईव्ह मिंटच्या अहवालातील दाव्यानुसार FCI कडे ऑगस्टमध्ये गेल्या 14 वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी साठा होता. यामुळे यावर्षी जुलैमध्ये गव्हाच्या किंमती 11.7 टक्क्यांनी वाढल्या होत्या.
तर ब्ल्युमबर्गच्या अहवालातील दाव्यानुसार भारतात गव्हाची टंचाई आणि जगभरात वाढत चाललेल्या किंमती बघता आता परदेशातून गव्हाच्या आयातीचा विचार सुरू आहे. हा अहवाल समोर येताच भारत सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले.
परदेशातून गहू खरेदीची कोणतीही योजना नसून देशात गव्हाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले होते.
देशातील गहू टंचाईची चिन्हे सांगणारी 4 कारणे
भारत सरकार गहू टंचाईच्या वृत्तांचा इन्कार करत असले तरी 4 कारणांमधून कळते की देशात गव्हाची टंचाई जाणवू शकते. पाहूया हीच कारणे...
पहिले कारण: मे 2022 मध्ये केंद्र सरकारने निर्यात धोरणात सुधारणा करून गहू निर्यातीचा प्रतिबंधित श्रेणीत समावेश केला होता.
दुसरे कारण: ब्ल्युमबर्गच्या अहवालातील दाव्यानुसार गव्हाची टंचाई आणि वाढत्या किंमती बघता परदेशातून गहू आयातीवर सरकारी अधिकाऱ्यांचा विचार सुरू आहे.
तिसरे कारण: अहवालात म्हटले होते की, गहू आयातीला चालना देण्यासाठी आयात शुल्क 40 टक्क्यांनी कमी करण्याविषयीही अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे.
चौथे कारण: 27 ऑगस्ट रोजी सरकारने केवळ गहूच नव्हे तर पीठ, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचाही निर्णय घेतला.
आता जरा देशातील गव्हाच्या उत्पन्नावर एक नजर टाकूया...

FCI कडे गव्हाचा साठा कमी का झाला ते आता जाणून घेऊया...
हिटवेव्हमुळे गव्हाच्या उत्पन्नात 25 टक्क्यांची घट
गव्हाचे उत्पादन कमी होण्यामागील सर्वात मोठे कारण आहे हवामान. मार्चपासूनच यंदा हिटवेव्ह सुरू झाली होती. या कालावधीत गव्हाला 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान चालत नाही, कारण यादरम्यान गव्हाच्या दाण्यात स्टार्च, प्रोटीन आणि इतर ड्राय मॅटर्स जमा होतात.
कमी तापमानामुळे गव्हाच्या दाण्यांचे वजन वाढण्यास मदत होते. यंदा मार्चमध्ये अनेकदा तापमान 40 अंशाच्या पुढे गेले होते. यामुळे गव्हाचे दाणे वेळेपूर्वीच परिपक्व झाले आणि वजनाने हलके राहिले. यामुळे गव्हाचे उत्पादन 25 टक्क्यांनी घटले.
यामुळे भारतात आधीच गव्हाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या. त्यामुळे पिठाच्या किंमती वाढणेही स्वाभाविकच होते.
तज्ज्ञांच्या मते यावर्षी गव्हाचे उत्पादन 11.13 कोटी टन राहण्याचा केंद्राचा अंदाज होता. हे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे, मात्र हवामानामुळे गव्हाचे उत्पादन घटून 10 कोटी टनांपेक्षाही कमी झाले.
सरकारी एजन्सींची गव्हाची खरेदी यावर्षी घटून 1.8 कोटी टनांवर आली आहे. गेल्या 15 वर्षांत हे सर्वात कमी आहे. 2021-22 मध्ये एकूण 4.33 कोटी टन गव्हाची सरकारने खरेदी केली होती.
हिटवेव्हच्या परिणामांवर ग्राफिक्समधून एक नजर टाकून समजून घ्या...

येत्या काळात पिठाच्या किंमती वाढण्यामागे दोन कारणे आहेत...
पहिले कारण: ऑगस्टमध्ये गव्हाचे दर 22 टक्क्यांनी वाढले, उत्सवाच्या काळात आणखीन वाढणार...
देशात आता सण-उत्सवांचा हंगाम सुरू झाला आहे. सामान्यपणे सणांच्या हंगामात गव्हापासून तयार होणाऱ्या पदार्थांची विक्री वाढते. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काही महिन्यांत गहू आणि पिठाच्या किंमती आणखी वाढू शकतात.
22 ऑगस्ट 2022 रोजी गव्हाचे दर 31.04 रुपये प्रतिकिलो होते. गेल्या वर्षी 22 ऑगस्ट रोजी हे दर 25.41 रुपये प्रतिकिलो इतके होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचे दर 22 टक्क्यांनी वाढले आहेत.
याच्या परिणामी पिठाचे दरही वाढलेले दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये पिठाचे दर 17 टक्क्यांनी वाढून 35.17 रुपये किलो झाले आहेत. गेल्यावर्षी हे दर 30.04 रुपये किलो इतके होते.
यामुळेच सरकारने मे मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता पिठ, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. वाढत्या किंमतींना आळा घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
दुसरे कारण: नवीन पिक येण्यास अजून 7 महिन्यांचा वेळ, त्यामुळे किंमती वाढणार
देशात आता नवीन गहू एप्रिल 2023 नंतरच येणार असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच नवीन गहू येण्यासाठी 7 महिन्यांचा वेळ आहे. त्यामुळे किंमती वाढणे निश्चित आहे. केंद्र सरकारच्या मोफत गहू योजनेवरही गव्हाचे दर अवलंबून असतील.
या योजनेत कोणतेही बदल झाले तर गव्हाच्या किंमती वेगाने वाढू शकतात. कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकार देशातील 80 कोटी गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे. यामुळे सरकारकडील धान्याच्या बफर स्टॉकमध्ये घट झाली आहे.
जगात गव्हाच्या उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर
जगात सर्वाधिक गहू उत्पादनात चीन पहिल्या आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गव्हाच्या निर्यात करणाऱ्या टॉप 10 देशांत भारताचा समावेश नाही. रशिया, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स आणि युक्रेन हे पाच देशच 65 टक्के गहू निर्यात करतात. यापैकी 30 टक्के निर्यात ही रशिया आणि युक्रेनमधून होते.
रशियाचा अर्धा गहू इजिप्त, तुर्की आणि बांग्लादेशकडून खरेदी केला जातो. तर युक्रेनकडून इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, तुर्की आणि ट्युनिशिया गहू खरेदी करतात. अशात जेव्हा दोन मोठ्या गहू निर्यातदारांमध्ये युद्ध सुरू असल्याने जगात गव्हाची टंचाई निर्माण होणे स्वाभाविक आहे. यामुळेच जगभरात गव्हाचे दर सातत्याने वाढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...