आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवारी ख्रिसमस साजरा होत आहे. या दिवशी सुकामेवा व मसाल्यांचा सुगंध असलेला प्लम (आलूबुखारा) केक खाण्याची परंपरा आहे. हा केक मुळात युरोपातील. भारतात पहिल्यांदा १८८३ मध्ये केरळमधील थालास्सेरी येथे तयार झाला. ब्रह्मदेशातून (आता म्यानमार) आलेले व्यापारी ममबल्ली राजू यांनी दालचिनी पिकवणारे ब्रिटिश शेतकरी मर्डोक ब्राऊन यांच्या सल्ल्यानुसार हा केक बनवला. राजू यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून हा केक बनवत आहे. राजू यांचे नातू व ममबल्ली बेकरीचे मालक प्रकाश सांगतात, आजोबा ब्रिटिश सैनिकांसाठी दूध, चहा, ब्रेड ब्रह्मदेशातून इजिप्तला पाठवायचे. ते १८८० मध्ये थालास्सेरीला परतले व रॉयल बिस्किट फॅक्टरी बेकरी सुरू केली. त्या काळी इंग्रजांची गरज कोलकात्यातील एकमेव बेकरी भागवायची. यामुळे आजोबांचा कारखाना भारतीयाने स्थापन केलेली पहिली बेकरी होती, जी भारतीयांसाठीही होती.
प्रकाश आता १७ प्रकारचे प्लम केक बनवतात, तेही देशी चवीसह. ते सांगतात, ब्रह्मदेशात आजोबा बिस्कीट तयार करण्यात तरबेज झाले. ते ४० प्रकारची बिस्किटे, ब्रेड बनवू लागले. १८८३ चा ख्रिसमस येणार होता. आजोबांजवळ मर्डोक आले व इंग्लंडमधील प्लम केक दाखवून म्हणाले, असाच केक बनवा. मर्डोक यांनी साहित्य देऊन फ्रेंच ब्रँडी टाकायला सांगितले. आजोबांनी त्याऐवजी कोको, मनुका व सुकामेवा टाकला. मर्डोक यांनी भारतात तयार झालेला पहिला प्लम केक खाल्ला व खुश झाले. राजू यांचे नातेवाईक तिरुवनंतपुरममध्ये बेकरी चालवणारे प्रेमनाथ सांगतात, त्या काळी यीस्ट मिळायचे नाही म्हणून दारू टाकली जायची. आजही केक जुन्या पद्धतीने बनवला जातो. फक्त दारू ऐवजी यीस्टचा वापर करतात.
केरळ प्लम केकची मोठी बाजारपेठ; दावा : तेथेच सुरू झाली पहिली बेकरी
भारतात केरळ प्लम केकची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ममबल्ली कुटुंबच केरळमधील सर्वात मोठी बेकरी सांभाळते. कोचीन बेकरी (कोची), सांता बेकरी (तिरुवनंतपुरम), थालास्सेरीतील ममबल्ली बेकरीसारख्या अनेक बेकऱ्या या कुटंुबांच्याच आहेत. प्रत्येक बेकरीत मर्डोक ब्राऊन यांना राजू यांनी दिलेल्या पहिल्या केकचे चित्र आजही ग्राहकांचे स्वागत करते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.