आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राची राजकीय दिशा ठरवणारे 3 दसरा मेळावे:शिवसेनेसह मुंडे आणि संघाच्या दसरा मेळाव्याचेही महत्व, वाचा सविस्तर...

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दसऱ्याला अजून महिनाभर वेळ असला तरी राज्यात आतापासूनच दसऱ्याची चर्चा सुरू आहे. याचे कारण आहे दसऱ्याला परंपरेनुसार होणारा शिवसेनेचा मेळावा. शिवसेनेत फूट पडल्यामुळे यंदा शिवतीर्थावर कोण दसरा मेळावा घेणार याकडे राज्यासह देशाच्या नजरा लागून आहेत. शिंदे गटाकडून दसरा मेळावा घेण्याची चर्चा होत असल्याने या पार्श्वभूमीवर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे.

दसऱ्याला राजकीय आयोजने

खरंतर दसरा हा आपल्या संस्कृतीतील पारंपरिक सण. पण महाराष्ट्रात हा सण राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा राहिला आहे. कारण दसऱ्याला होणारे राजकीय मेळावे आणि आयोजने. महाराष्ट्रात प्रामुख्याने तीन महत्त्वाचे दसरा मेळावे होतात. पहिला शिवसेनेचा, दुसरा बीडच्या भगवानगडावरील आणि तिसरा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा. याशिवाय इतर राजकीय पक्षांकडूनही दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आयोजने होत असतात. त्यामुळे दसरा हा सण अलिकडील काळात राजकीय झाल्याचेच चित्र आहे. दसऱ्याची ही राजकीय वाटचाल पाहूया तीन महत्त्वाच्या मेळाव्यांच्या माध्यमातून...
शिवसेनेचा दसरा मेळावा

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला 3० ऑक्टोबर १९६६ रोजी. तेव्हापासून ते आतापर्यंत काही अपवाद वगळले तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे. दसरा मेळाव्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या खास शैलीतील भाषणाकडे देशातील राजकीय क्षेत्रासह माध्यमांचे खास लक्ष असायचे. मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याची शिवसैनिकांना उत्सुकता राहायची. दसरा मेळाव्यातील भाषणाचे पडसाद देशाच्या राजकारणात दिसायचे. त्यामुळेच हा मेळावा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. स्थापनेपासून ते मृत्यूपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाषण केले. २०१२ मध्ये मृत्यूपूर्वीच्या दसरा मेळाव्याला संबोधित करताना बाळासाहेब ठाकरेंनी केलेले 'माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या' हे आवाहन आजही शिवसैनिकांच्या स्मरणात आहे.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. २०१3 मध्ये उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम दसरा मेळाव्याला संबोधित केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे हेच दसरा मेळाव्याला संबोधित करत आहेत. कोरोनाच्या कालखंडातील अपवाद वगळता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच झाला आहे.
यंदा मात्र शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
मुंडे कुटुंबीयांचा दसरा मेळावा

याशिवाय दुसरा महत्त्वाचा दसरा मेळावा आहे मुंडे कुटुंबीयांचा बीडमध्ये होणारा मेळावा. बीडच्या भगवानगडावर परंपरेनुसार होणाऱ्या दसरा मेळाव्यात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी १९९3 मध्ये सर्वप्रथम भाषण केले. तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत गोपीनाथ मुंडे भगवानगडावरील दसरा मेळाव्यात सहभागी होत होते. २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाल्यानंतर भगवान गडावरील मेळावा रद्द करण्यात आला होता. यानंतर २०१५ मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडेंनी गडावरील दसरा मेळाव्यात भाषण केले. यानंतर पंकजा मुंडे आणि गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यात मतभेद झाले. नामदेव महाराज शास्त्रींनी दसरा मेळाव्यात राजकारण नको अशी भूमिका घेतल्याने २०१६ मध्ये पंकजा मुंडेंनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला. तर २०१७ पासून त्या भगवान बाबांचे गाव सावरगाव घाट इथे दसरा मेळावा घेत आहेत.
१९५१ पासून भगवानगडावर मेळावा
बीडमधील राजकीय अभ्यासक दादासाहेब मुंडे यांच्या सांगण्यानुसार, वास्तविक भगवानगडावर १९५१ पासून दसरा मेळाव्याला सुरूवात झाली होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मेळाव्याची सुरूवात झाली असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्या त्या कालखंडातील महत्त्वाचे नेते या मेळाव्यात येत गेले. १९९3 पासून गोपीनाथ मुंडे या मेळाव्यात यायचे. अजूनही भगवान गडावरील हा मेळावा सुरू आहे. हा मेळावा म्हणजे मुळात धार्मिक उत्सव असतो असे ते म्हणतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच म्हणजेच २७ सप्टेंबर १९२५ पासूनच संघाचा दसरा उत्सव दरवर्षी न चुकता संघाच्या नागपुरातील रेशीमबागेतील मुख्यालयात होत असतो. शस्त्रपूजन, स्वयंसेवकांकडून कवायतींचे सादरीकरण आणि सरसंघचालकांचे मार्गदर्शन असे या उत्सवाचे स्वरूप असते. संघाच्या राजकीय प्रभावामुळे या उत्सवातील सरसंघचालकांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष असते. या उत्सवात संघाकडून दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावले जाते. प्रमुख पाहूण्यांच्या भाषणानंतर सरसंघचालक मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना संघासोबत जोडणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जाते. कोरोना काळातील अपवाद वगळता संघाचा हा दसरा उत्सव अखंडपणे सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...