आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवताल:छंद... थकवा, मळभ दूर सारणारे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला अनेक छंद आहेत, पण ते जोपासण्यासाठी मुळी वेळच नाही, अशी अनेकांची तक्रार असते. वाचन हा माझा लहानपणापासूनचा आवडीचा छंद. तो पूर्ण करण्यासाठी मी प्रवासात, बसची वाट पाहताना पुस्तकं वाचून काढतो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी म्हटलं आहे, की विमानतळावर हवाई प्रवासाची प्रतीक्षा करताना ते एक तर पुस्तक वाचतात किंवा काही लिखाण करतात. एखाद्या आवडीच्या छंदाची कशी जोपासना करावी, त्यासाठी वेळ कसा काढावा, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

आमच्या घरात एक छोटुलं बाळ आलं आहे अन् त्याच्या हरघडीच्या करामती नि हालचाली पाहण्यात मस्त वेळ जातो आहे. ही छोटुली या जगात आली तेव्हापासून तिला न्याहाळण्यात कितीतरी तास अन् दिवस गेले तरी आजही म्हणजे तिच्या जन्मानंतर काही महिन्यांनंतरही तिच्या नवनव्या लीळा कौतुकानं पाहण्यात अजिबात खंड पडला नाही. आता कालचीच गोष्ट घ्या ना.. काही दिवसांपूर्वी ती बसायला अन् नंतर आधार धरून उभं राहायला शिकली नि काल तिनं चक्क चार पावलं रांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रोजचा नवा दिवस अन् त्यातला प्रत्येक तास तिच्या नव्या छंदाचा असतो. तिला ते तसं करताना पाहायचं, हा आमचा जणू छंदच झाला आहे. काही महिन्यांपूर्वी जमिनीवर पडल्यापडल्या पायाचा पूर्ण अंगठा तोंडात घालण्याचा तिचा प्रयत्न असायचा. हल्ली हातात मिळेल ती नवी वस्तू पकडण्याचा नि तिला वेगवेगळ्या कोनांतून हाताळायचा उद्योग सुरू असतो. एकदा एखादी नवी गोष्ट केली की कंटाळा येईपर्यंत तेच करत राहायचं अन् आणखी काही नवीन शोध वा उद्योग मिळाला की मग तोच पुढं काही काळ चालू ठेवायचा, असा तिचा खेळ सुरू असतो. आपल्या आयुष्यात छंद असे बालपणी सुरू होतात आणि जीवनभर हा खेळ चालूच राहतो. आपल्या सर्वांना असे काही ना काही छंद असतातच. कुणाला पुस्तक वाचण्याचा, कुणाला काहीबाही लिहिण्याचा, कुणाला माणसं वाचण्याचा, तर कुणाला नवनव्या चवीचं खाण्यापिण्याचा शौक असतो. काही जण सकाळ-संध्याकाळ फिरायला जातात, आपल्या ग्रुपमधल्या लोकांशी दररोज नाना विषयांवर चर्चा करण्याचा, प्रसंगी वादविवाद करण्याचाही काहींना छंद असतो. असे छंद मनाला आनंद देतात. त्यात गुंतल्यावर वेळ कसा जातो, ते समजतही नाही. ते शरीराला आणि मनालासुद्धा ताजंतवानं करून जातात. एकमेकांना भेटण्या-पाहण्यातला आनंदही त्यातूनच मिळत राहतो, वाढत जातो. ‘हा छंद जिवाला लावी पिसे..’ हे मोहंमद रफींनी गायलेल्या गीतातले शब्द किती समर्पक आहेत, याची खात्री पटू लागते. तसं पाहिलं तर आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक गोष्टींची आवड असते, छंद असतो. मात्र, प्रत्येक जण हे छंद जोपासत नाही किंवा परिस्थितीमुळे छंदाच्या आवडीला मुरड घालावी लागते. कालानुरूप परिस्थिती बदलते आणि जुने छंद मग पुन्हा खुणावू लागतात. काही वर्षांपूर्वी थिएटरमध्ये जाऊन सिनेमे पाहण्याची प्रचंड क्रेझ होती. त्यातल्या त्यात थिएटरवर नवा चित्रपट लागल्यावर ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ पाहणे म्हणजे तरुणांसाठी अगदी प्रतिष्ठेचे! तीच गोष्ट गाणं ऐकण्याची, स्वत: गाण्याची, नृत्याची अन् ते पाहण्याची, पुस्तकं वाचण्याची नि स्वत: लिहिण्याची, भटकंती करण्याची, मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त भटकण्याची, गप्पा मारत बसण्याची...

वयोमानानुसार हे छंद आणि आवडीनिवडी बदलत जातात. बरं-वाईट काय याची समज आल्यावर मग परिपक्व होऊन काही मोजक्याच छंदांना खतपाणी मिळतं आणि मग त्यातून सुख-समाधान लाभत राहतं. काही छंद मात्र कधी व्यसनाचं रूप धारण करतील आणि त्या व्यक्तीच्या दृष्टीने हानिकारक ठरतील, हे सांगता येत नाही. मोबाइलमध्ये सतत डोकं घालून राहण्याचा असाच छंद आपल्यापैकी अनेकांचं व्यसन बनतो आणि त्यापायी दैनंदिन आणि खूप महत्त्वाची कामं पडून राहतात, हे आपण जगभर सगळीकडं पाहत आहोतच. काही वर्षांपूर्वी मुलांना काडीपेटी, पोस्टाची तिकिटे, विविध देशांची नाणी, थोरामोठांच्या स्वाक्षऱ्या गोळ्या करण्याचा छंद असायचा. मी पत्रकारितेच्या क्षेत्रात आलो तेव्हा सुरुवातीला जवळपास दहा वर्षे अन्य राज्यांतील, विदेशातील विविध भाषांमधील दैनिके आणि इतर नियतकालिके गोळा करण्याचा मला छंद जडला होता. दिल्ली आणि लखनौ येथे राहत असताना खूप दैनिके जमा केली. रशिया आणि बल्गेरियाच्या वास्तव्यात ब्लादिमीर लेनिन यांनी शतकापूर्वी सुरू केलेलं ‘प्रावदा’ हे दैनिक संग्रही ठेवण्यात एक वेगळीच भावना होती. असे संग्रह करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असे अनुभव कधी ना कधी येत असतातच. गेली अनेक वर्षे माझ्या कारमध्ये बॅडमिंटनची दोन रॅकेट्स आणि दोन-तीन शटलकॉक कायम असतात. सकाळी किंवा संध्याकाळी बागेत फिरायला गेलो आणि बॅडमिंटन खेळणारे कुणी दिसले की लगेच आमचा खेळ सुरू होतो. आणि या खेळासाठी मला कुठल्याही वयोगटाचा पार्टनर चालतो, मग तो शाळेत जाणारा मुलगा असो वा सॉफ्टवेअर क्षेत्रातला तिशी-चाळिशीतला कुणीही उत्साही इंजिनिअर.. बॅडमिंटन खेळण्याचा छंद मला काही वर्षांपूर्वी लागला आणि आजतागायत या छंदानं माझं शरीर आणि मन छान रमवलं आहे.

अनिल अवचट हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रिय साहित्यिक. व्यसनमुक्तीसारखे सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी अनेक छंद जोपासले. पुण्यातल्या पत्रकारनगरमधल्या त्यांच्या घरात मी गेलो तेव्हा त्यांचं बासरीवादन ऐकलं. त्यांच्या विविध विषयांवरच्या लेखमाला सत्तर-ऐंशीच्या दशकांत खूप वाचल्या गेल्या, त्यांची पुस्तके आजही वाचली जातात. कुठल्याही कार्यक्रमाला वा समारंभाला गेले, की आपल्या हातात छोटीशी उपकरणे घेऊन ते लाकडाच्या एखाद्या तुकड्याला आकार देत असत. बातमीदार असताना कुठल्याही कार्यक्रमात त्यांचे हे उद्योग चालू असत, पण त्या कार्यक्रमाची त्यांनी लिहिलेली बातमी तितकीच तंतोतंत, वस्तुनिष्ठ असे. अशा या छंदोनिष्ठ अवचटांनी ‘छंदाविषयी’ या शीर्षकाचं एक पुस्तकच लिहिलं आहे आणि त्यात आपल्या विविध छंदांविषयी विस्तृत माहिती दिली आहे. आयुष्यभर व्यसनमुक्तीच्या ध्येयासाठी स्वतःला वाहून घेतानाच आपले अनेक छंद जोपासणारे अनिल अवचट एक अवलियाच होते, असं म्हणता येईल.

‘महामहोपाध्याय’ अशी मोठी उपाधी लाभलेले दत्तो वामन पोतदार हे इतिहासाचे गाढे संशोधक आणि प्रभावी वक्ते होते. साठ- सत्तरच्या दशकांत आचार्य अत्रे, ना. सी फडके अशा विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींची व्याख्याने व्हायची, तेव्हा अध्यक्ष म्हणून दत्तो वामन पोतदार उपस्थित असायचे, इतका त्यांचा अनेक क्षेत्रांत मुक्त संचार असायचा. त्यांच्या आवडीच्या अशा अनेक छंदांमध्ये लग्नपत्रिकांचा संग्रह करण्याचा छंद होता. मात्र, लग्नपत्रिका गोळा करण्याचा हा छंद हसण्यावारी नेण्याचा प्रकार मुळीच नाही, कारण प्रत्येक काळातील आणि विविध प्रदेशांतील लग्नपत्रिकांतून विविध सामाजिक, धार्मिक प्रथांचं प्रतिबिंब पडत असतं. लग्नपत्रिकांचा संग्रह करण्याचा छंद असणारे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार स्वतः मात्र अविवाहित होते, हे पण इथं सांगायलाच हवं. आपल्याला अनेक छंद आहेत, पण ते जोपासण्यासाठी मुळी वेळच नाही, अशी अनेकांची तक्रार असते. वाचन हा माझा लहानपणापासूनचा आवडीचा छंद. तो पूर्ण करण्यासाठी मी प्रवासात असताना, बसची वाट पाहताना अनेक पुस्तकं वाचून काढतो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी म्हटलं आहे, की विमानतळावर हवाई प्रवासाची प्रतीक्षा करताना ते एक तर पुस्तक वाचतात किंवा काही लिखाण करतात. एखाद्या आवडीच्या छंदाची कशी जोपासना करावी, त्यासाठी वेळ कसा काढावा, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

दिवाळीच्या काळात समाज माध्यमावर एक फोटो आणि पोस्ट पाहिली. आजी-आजोबा दोन नातवंडांबरोबर रमले होते. एक मूल आजोबांच्या खांद्यांवर चढून गुजगोष्टी करत होतं, शेजारी एक मुलगी चित्र काढण्यात रमली होती आणि आजींनी लिहिलं होतं .. ‘आली दिवाळी! नातवंडांच्या सहवासापेक्षा मोठा सण कुठला!’ तर, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या या वयात नातवंडांबरोबर राहणे, त्यांच्या पोरखेळांत सामील होणं यासारखा आनंद देणारा दुसरा छंद, विरंगुळा असू शकत नाही. आई आपल्या नोकरीत आणि घरकामात गर्क असूनही ती आपल्या लहानग्या बाळाशी खेळण्यात, त्याचे लाड पुरवण्यात रमते, आपल्या बाळाच्या लीळा पाहण्याचा आणि कितीतरी लहानसहान हट्ट पुरवण्याचा छंद तिला अपार सुख देत असतो. कुठलाही छंद असाच निरामय आनंद अन् निखळ सुख देणारा असावा. त्यामुळं शरीराला आलेला थकवा नि मनावरचं मळभ क्षणात दूर जावं.

कामिल पारखे camilparkhe@gmail.com संपर्क : 9922419274

बातम्या आणखी आहेत...