आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्च महिना सुरू झाला तेव्हा थोडीशी थंडी बाकी होती, पण होळीच्या सुमारास अचानक पारा गगनाला भिडू लागला. मार्चमध्ये एवढं ऊन पडलं आहे की 121 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. जेव्हापासून भारतात हवामानाच्या नोंदी ठेवल्या जात आहेत, तेव्हापासून मार्च महिन्यात एवढी उष्णता कधीच नोंदली नव्हती.
उत्तर भारतातील राजस्थान, हरियाणा, दिल्ली या राज्यांव्यतिरिक्त मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे किनारपट्टी आणि हिमाचलच्या पायथ्याशीही तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामनी आणि स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्याशी आम्ही या तीव्र उष्णतेबद्दल बोललो. ते म्हणतात की, मार्चमध्ये तापमानात एवढी वाढ होणे ही सामान्य घटना नाही. मार्चमध्ये असे कोरडे हवामान असणे खूप विचित्र आहे. आम्ही तज्ज्ञांकडून या असामान्य उष्णतेचे कारण आणि भविष्यातील अंदाज समजून घेतला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देखील दुजोरा दिला आहे की 1901 नंतर आतापर्यंत मार्च महिन्यात एवढे तापमान दिसले नव्हते. मार्च 2022 मध्ये देशात कमाल सरासरी 33.10 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. त्याच वेळी मार्च 2010 मध्ये, कमाल सरासरी तापमान 33.09 डिग्री सेल्सियस होते.
स्कायमेट या हवामानाची माहिती देणाऱ्या संस्थेचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणतात, “आतापर्यंत दिल्लीसाठी मार्चचा हा चौथा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. गेल्या 10 वर्षांतील सरासरी किमान तापमानदेखील दिल्लीमध्ये सर्वाधिक 17.6 इतके आहे, हेदेखील एक्स्ट्रीम वेदरची कंडिशन दर्शवते."
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामनी म्हणतात, “जेव्हा कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 6.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते, तेव्हा ती तीव्र उष्णतेची लाट मानली जाते. त्याच वेळी, जेव्हा ते 4.5 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते, तेव्हा ते उष्णतेच्या लाटेच्या श्रेणीमध्ये येते.
एका दिवसापूर्वीच आम्ही राजस्थान, दिल्ली, दक्षिण हरियाणामध्ये 42-43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले आहे. तर या भागांचे तापमान साधारणपणे 36-37 अंश राहते. या भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू असल्याचे स्पष्ट होत असून ते ऐतिहासिकही आहे."
पृथ्वीचे तापमान वाढण्यामागे कोणती कारणे आहेत?
स्कायमेटचे महेश पलावत यांच्या मते, साधारणपणे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (पश्चिम विक्षोभ - पश्चिमेकडून येणारे वारे) मार्चच्या हवामानात थोडासा ओलावा असतो, परंतु यावेळी पाकिस्तानकडून येणारे वारे खूप कोरडे (शुष्क) राहिले. त्यामुळे राजस्थान, गुजरात, हरियाणामध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. या उष्णतेमागे एल-निनो किंवा ला-निनाचा विशेष प्रभाव नाही.
IMDचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामनी म्हणतात की, जेव्हा पाकिस्तानातून येणारे वारे राजस्थानच्या वाळवंटातून होऊन आले, तेव्हा ते पूर्णपणे कोरडे झाले आणि जेव्हा हे कोरडे वारे पुढे सरकले, त्यामुळे तापमान सामान्यपेक्षा जास्त झाले. हा प्रकार अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे.
आम्ही तज्ज्ञांना विचारले की, यावर्षी उष्णतेच्या वाढीमागे हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचाही हात असू शकतो का? यावर महेश पलावत म्हणतात की, 'गेल्या काही वर्षांत पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे आपण पाहिले आहे आणि वातावरणातील बदलामुळे पृथ्वी सतत गरम होत आहे, यात शंका नाही. पण मार्च महिन्यात तापमान वाढण्यामागे वातावरणातील बदलच आहे, हे ठाम सांगता येणार नाही.'
त्याचवेळी हवामान खात्याचे शास्त्रज्ञ जेनामनी म्हणाले की, मार्च महिन्यातील असामान्य उष्णतेमागील हवामान बदलाची भूमिका यावर आम्ही डेटा स्टडी करणार आहोत."
कोणत्या भागात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम?
राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला आहे. या राज्यांमध्ये मार्च महिन्यात सामान्य तापमानापेक्षा खूप जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम राजस्थान, ईशान्य मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर गुजरात आणि मराठवाड्यात 41 ते 43 अंश सेल्सियस तापमान राहील, असे हवामान खात्याने 4 एप्रिल रोजी सांगितले.
मध्यप्रदेशचा उर्वरित भाग, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, दिल्ली, झारखंड, ओडिशा, तेलंगणा येथे 40-42 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. जम्मू आणि हिमाचलच्या अनेक भागांत तापमान सामान्यपेक्षा 6-8 अंश सेल्सियस जास्त आहे.
एप्रिलचा अंदाज काय आहे?
हवामानात फारसा बदल दिसत नसल्यामुळे येत्या 10-15 दिवसांत अशीच उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्याचवेळी 15 एप्रिलपर्यंत उन्हाचा तडाखा असाच राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील 2 आठवडे पावसाची शक्यता नाही आणि उष्मा सतत वाढण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.