आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:हसू केवढ्याला...?

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिजीत सोनवणे

पंधरा वर्षांपूर्वी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनण्याचं स्वप्न पाहणारा मी आज जगातल्या दिवाळखोरांच्या यादीत जाऊन बसलोय. आपल्याला यश मिळत असतं तेव्हा खूप लोकांना आपल्या सोबत यायचं असतं. अनेकांच्या डोळ्यांत ही उत्सुकता मी पाहिलीय. आज बाहेरचे काय तर आसपासचं कुणीही माझ्यासोबत येण्यास उत्सुक नाहीये. अपयश हे पोरक्याहूनही पोरकं असतं, हेच खरंय.

आज सकाळी उठलो तेव्हा मी आरशात पाहिलं. स्वतःहून स्वतःशीच हसण्याचा प्रयत्न केला. मला हसता आलं नाही. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालंय. काही वेळापूर्वी माझंच नाव अगदी सहज गुगलवर सर्च केलं, ‘अनिल अंबानी’. पहिलीच लिंक ‘अनिल अंबानी- विकिपीडिया’ असं दिसलं. त्याखाली असलेलं ‘US$82.5 million in assets against US$305 million in liabilities (February 2020)’ हे वाक्य वाचलं आणि चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू आणखीनच हरवल्यासारखं वाटलं. शेजारीच एका विंडोमधे डोक्याला हात लावलेला माझा फोटो दिसला आणि आरशातलं माझं प्रतिबिंब मला आरसा नसतानाही दिसू लागलं. निराशेनंच विकिपीडियावरच्या लिंकवर क्लिक केलं तर समोर माझाच पण हसऱ्या चेहऱ्यातला फोटो दिसला. किती मस्त हसलोय मी यात. हा फोटो नेमका केव्हाचा? स्वतःलाच मी प्रश्न विचारला. आठवलं.. आठवलं.. हा फोटो २०१२ मधलाय. ते वर्षं जेव्हा माझे पप्पा जाऊन बरोबर दहा वर्षं झाली होती. बाप रे... २००२ ते २०१२ या दहा वर्षांत किती काय काय बदललं. त्या पुढच्या आठ-दहा वर्षांत तर सगळंच... २००२ मध्ये पप्पा असे अचानक सोडून जातील, असं वाटलंही नव्हतं. ते सोबत होते, तेव्हा खरंच एक आधार होता. इतक्या मोठ्या व्यवसायात मी आणि मुकेश संचालक म्हणून रुजू झालो, तेव्हा पप्पांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा दबक्या आवाजात साहजिकच व्हायची. ती चर्चा अनेकदा माझ्या कानावर आलीय. तरुण, धडाडीनं निर्णय घेणारा म्हणून अनेकांच्या माझ्याकडून खूपच अपेक्षा होत्या. खरंतर मलाही आतून तसंच वाटत होतं. पप्पा गेले त्यांच्याकडे ७५ हजार कोटी रुपयांची संपत्ती होती. जगभरातल्या फोर्ब्सच्या अतिश्रीमंतांच्या यादीत त्यांचं स्थान १३८ वं स्थान होतं. ही इतकी मोठी जबाबदारी आपण सहज पेलू शकू असं वाटलं होतं. तेव्हा केवढा आत्मविश्वास होता माझ्यात... त्यातूनच आमच्या मुकेश आणि माझ्यात पप्पांच्या संपत्तीच्या विभागणीवरून वाद सुरू झाले. शेवटी आईनं मध्यस्थी करून योग्य तो तोडगा काढलाच. मला असं वाटत होतं, नव्या जमान्याच्या कंपन्या आपल्याकडे राहाव्यात. म्हणजे आपल्याला वेगात पुढं जाता येईल. का मी असा विचार करत होतो? कारण एकच. त्यावेळी ओठावर असलेलं हसू आणखी विस्तारता येईल. त्यातूनच माझ्या वाट्याला ‘रिलायन्स कम्युनिकेशन’, ‘रिलायन्स कॅपिटल’, ‘रिलायन्स एनर्जी’, ‘रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड’ आणि ‘रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड’ या कंपन्या आल्या. आणि मुकेशकडे काय होतं, तर ‘रिलायन्स इंडस्ट्रिज’, ‘रिलायन्स पेट्रोलियम’, ‘भारतीय पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या कंपन्या आल्या. या सगळ्या वादामुळं खूप विचित्र चर्चा जगभरात झाली. पण त्याकडे मी खूप दुर्लक्ष केलं. स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी पप्पा तर केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईत आले होते. त्यातून त्यांनी किती मोठं राज्य उभं केलं. विभागणीनंतर माझ्या वाट्याला ४२ बिलियन डॉलर (एक बिलियन म्हणजे शंभर कोटी) इतकी संपत्ती आली. पप्पांच्या ५०० रुपयांच्या कितीतरी पट... तेव्हा मी तर स्वतःलाच अभिमानानं सांगत होतो, की जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी मी सहावा आहे... लवकरच पहिला होईल. हे वाक्य स्वतःलाच ऐकवायचो, तेव्हा वाटायचं, हे अगदी उद्याच घडून यावं. धडपड तर तीच होती. त्यासाठी कितीतरी निर्णय घेतले. नवनव्या गोष्टी सुरू केल्या. आरकॉम हे मी पाहिलेलं देशासाठीचं एक स्वप्न. बघता बघता ही कंपनी भारतातली दुसरी मोठी टेलिकम्युनिकेशन कंपनी बनली. मात्र

सीडीएमए तंत्रज्ञानासोबत चिकटून राहिलो आणि भविष्यातल्या जीएसएम तंत्रज्ञानाकडं दुर्लक्ष झालं. या सगळ्याची परिणती व्हायची तीच झाली. आरकॉम कंपनी दिवाळखोरीत निघाली. हे असं प्रत्येक क्षेत्रात होऊ लागलं आणि माझं हसू ओठांपासून दूर होऊ लागलं... मनोरंजन क्षेत्राचंही तसंच झालं. ॲडलॅब्स मल्टिप्लेक्सची चेन खरेदी केली आणि त्याचं रुपांतर बिग सिनेमाजमध्ये केलं. जगभरात त्याचं जाळं विस्तारलं. इतकंच नाही तर स्टिव्हन स्पीलबर्गच्या ड्रिमवर्क्स स्टुडिओसोबत करार करून काही चित्रपटांची निर्मितीही केली. मात्र त्यातही यश मिळालं नाहीच. २०१० पासून तर जी घसरण सुरू झाली, ती कधी वर आली नाही. गॅस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मनासारखा लागला नाही. त्यानंतर रिलायन्स पॉवरच्या एका शेअरची किंमत १००० रुपयांपर्यंत जाईल असं भाकित वर्तवलं जात होतं, त्याच शेअरच्या किमती इतक्या गडगडल्या की त्यानंतर जे व्हायचं होतं तेच झालं. इतक्या पुढं तर इतक्या अडचणी वाढत गेल्या की स्वतःचीच संपत्ती विकण्याशिवाय पर्यायच उरला नाही. चुकीच्या मनःस्थितीत घेतलेले निर्णयही अनेकदा चुकतात, तसा आणखी एक निर्णय चुकला. २०१५ मध्ये संरक्षण क्षेत्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. ते तर प्रकरण इतकं वादात सापडलं. की माझं हसू आता कुठच्या कुठं पळवून गेलंय. दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीसोबत ३० हजार कोटींचा करार का केला, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यांना काय सांगू? मी माझं हसू शोधत होतो ते? जगात जिंकणाऱ्यांच्या हसण्याला किंमत असते. हरणाऱ्यांच्या रडण्याला नाही. त्यामुळं मला काही ते सांगायचं नाही. आणि सांगितलंच तर काय काय आणि किती किती सांगू? आकड्यांच्या भाषेत बोलावं वाटतं, पण उताराचे आकडे उच्चारावे वाटत नाहीत. हे आकडे उच्चारण्याचं धाडसंही आता माझ्यात नाही. खरंतर हे सगळं असं होऊ शकतं हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. काटेकोर व्यवस्थापन, सरकारला पूरक असं धोरण, मीडिया मॅनेजमेंट आणि गुंतवणूकदारांना नेमका परतावा देणं हे पप्पांना उत्तम जमलं, तेच नेमकं मुकेशला जमलं आणि तो मला मागं टाकून कितीतरी पुढं गेला. खरंतर मुकेश आणि मी सोबतच व्यवसायाचे धडे घेतले. तरी इतकी महत्त्वाची गोष्ट माझ्याकडून कशी काय निसटली, हेच आता पुन्हा पुन्हा जाणवतंय. मार्केटचा नेमका अंदाज कुणाला तर अनिल अंबानीला, असं जे समजलं जायचं त्याचं आतल्या आत काय झालं. हेच मला समजेनासं झालं. मागच्या आठवड्यात लंडनमध्ये कोर्टात मला ‘माझ्याकडे कमाईचं दुसरं कोणतंही साधन नसून माझा खर्च माझी पत्नी आणि घरचेच उचलतात’ हे वाक्य उच्चारताना मला कितीतरी त्रास झाला. वकिलाला फी देण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळं घरातले दागिने विकावे लागले. चीनच्या तीन बँकांचं मिळून ५ हजार २८१ कोटी रुपये कर्ज १२ जून २०२० पर्यंत फेडायचं होतं. पण... जाऊ दे.. सारखं काय तेच तेच बोलत राहायचं. स्वतःशी. दिवसाचा प्रत्येक क्षण याचाच विचार करण्यात जातोय. पंधरा वर्षांपूर्वी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनण्याचं स्वप्न पाहणारा मी आज जगातल्या दिवाळखोरांच्या यादीत जाऊन बसलोय. आपल्याला यश मिळत असतं तेव्हा खूप लोकांना आपल्या सोबत यायचं असतं. अनेकांच्या डोळ्यांत ही उत्सुकता मी पाहिलीय. आज बाहेरचे काय तर आसपासचं कुणीही माझ्यासोबत येण्यास उत्सुक नाहीये. अपयश हे पोरक्याहूनही पोरकं असतं, हेच खरंय. किती किती विचार करायचा. आणि करून तरी काय उपयोग आहे? जाऊ दे... माझं वय सध्या ६१ वर्षं आहे. म्हणजे तब्बल २२ हजार दिवसांचं आयुष्य मला मिळालं. जे काही घडलंय ते शेवटच्या साडेतीन हजार दिवसांत घडलंय. काय कमावलं मी १८-१९ हजार दिवसांत आणि काय गमावलं मी साडेतीन हजार दिवसांत? असा प्रश्न मला सारखा पडतोय. रिलायन्स या शब्दाचा अर्थ फार मस्त आहे. रिलायन्स म्हणजे विश्वास. आपला दुसऱ्यावर दुसऱ्याचा आपल्यावर. याच अर्थानं तर पप्पांनी व्यवसायात पाय घट्ट रोवले. या शब्दातला अर्थ इतक्या सहजासहजी मी कसा विसरलो? माझा कुणावर विश्वास नव्हता की कुणाचा माझ्यावर विश्वास नव्हता? माझा माझ्यावर तरी विश्वास आहे का? माहीत नाही. खरंतर मला कुठलीच उत्तरं नकोय. कोणते प्रश्नही नकोयंत. मला फक्त मनसोक्त हसायचंय. एकदा तरी. सहज खिडकीतून बाहेर पाहिलं, तर एक अगदी सामान्य माणूस मस्त हसताना दिसला. केवढ्याला असतं हे हसू? जे त्याच्याजवळ आहे. पण माझ्याजवळ नाही? तो का हसतोय पण? त्याचं तो हसतोय, की तो माझ्यावरच हसतोय?

हे प्रश्न माझी पाठ सोडत का नाहीयेत?

abhi.pratibimb@gmail.com संपर्क- 8888895226

बातम्या आणखी आहेत...