आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपले शिक्षण म्हणजे अध्यापन, परीक्षा, मूल्यमापन हे सारे पदवी प्रमाणपत्रापुरते मर्यादित झाले आहे. आपण शाळा- कॉलेजात नेमके काय शिकलो, कोणकोणती कौशल्ये आत्मसात केली, कसे घडलो आणि काय करू शकतो याला काही महत्त्व उरले नाही. म्हणजे शिक्षणाचे खरे उद्दिष्टच बाजूला पडले आहे. नुकताच ११ नोव्हेंबरला ‘राष्ट्रीय शिक्षण दिन ’ साजरा झाला. त्या औचित्याने शिक्षण क्षेत्रापुढील समस्या आणि उपायांचा घेतलेला वेध...
दे शाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. यादरम्यान अनेक शैक्षणिक सुधारणा झाल्या. प्रयोग झाले. आयोग आले. अहवाल तयार झाले. नवीन धोरणे आली. या सरकारने तर २०२० पासून पूर्णपणे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाची गुणवत्ता किती, कशी वाढली हे तपासणे गरजेचे आहे. शैक्षणिक क्षेत्रात संख्यात्मक वाढ निश्चितच झाली. शाळा, कॉलेजबरोबरच इंजिनिअरिंग, मेडिकलची प्रवेश संख्या, खासगी कॉलेज, स्वायत्त विद्यापीठांची संख्या भरपूर वाढली. त्यातून शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आणि गुणवत्तेकडे मात्र पार दुर्लक्ष झाले. हे कटू सत्य, उघड गुपित आहे.
शिक्षण क्षेत्राच्या या वास्तवाला अनेक बाजू आहेत. शिक्षक, प्राध्यापक या पदाला जी गुणवत्ता लागते, जी ऊर्मी हवी असते, जी भावनिक गुंतवणूक आवश्यक असते, त्या दर्जाचे उमेदवार मिळतच नाहीत, ही त्यापैकी एक. दुसरी चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून शेवटचा पर्याय मानून या क्षेत्रात येणारेच जास्त आहेत. त्याचाही परिणाम विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर होतो. मुख्य म्हणजे, शिक्षणाचे मूळ उद्दिष्टच समजून घेतले जात नाही. पदवी प्रमाणपत्रासाठी अन् पर्यायाने नोकरीसाठी गरजेचे म्हणून शिक्षण घेतले जाते. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहिले. सगळे लक्ष गुण, श्रेणी, टक्केवारी याकडेच लागलेले. परीक्षांचे नियोजनही त्याच उद्दिष्टाने केलेले. विद्यार्थी काय आणि कसे शिकला, हे आपल्याकडच्या परीक्षा तपासत नाहीत. जे आणि जेवढे शिकवले, ते तो जसेच्या तसे शिकला की नाही यावर, म्हणजे केवळ पाठांतरावरच भर देणारी ही व्यवस्था आहे. एकाच प्रश्नाची वेगळी उत्तरे शोधण्याचा प्रयत्नच होत नाही. ठराविक प्रश्न, त्यांची ठराविक उत्तरे, ठराविक वेळात सांगितली तशीच ती लिहिणे म्हणजे आपली परीक्षा! त्यात ना कल्पनाशक्तीला वाव राहतो, ना वेगळ्या विचाराला स्थान मिळते.
आपल्या विद्यापीठांतील संशोधन हाच खरे तर एक संशोधनाचा विषय! त्यात कट-पेस्ट, उचलेगिरीच जास्त. नवा विचार, नवी संकल्पना, नवे प्रयोग, नवी दिशा या अपेक्षित गोष्टींची वानवा असते. रिसर्च पेपरचे प्रकाशन हादेखील एक बाजार झाला आहे. कुणीही, कुठेही ‘आंतरराष्ट्रीय परिषद’ आयोजित करतो. तिथे सुमार निबंधाचे वाचन, प्रकाशन होते. ते संशोधन म्हणून गणले जाते. सगळाच विनोद! यातही आर्थिक व्यवहार. त्यात सारे हातात हात घालून सामील. अनेकदा माध्यमांकडून अशा अनिष्ट गोष्टींचे स्टिंग ऑपरेशन होते, तरीही कुणाला काहीच वाटत नाही. या संशोधनात नावीन्य तर फारसे नसतेच, पण त्याचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग काय, हा विचारही नसतो. संशोधनाचा समाजाला काही उपयोग होणार नसेल, तर ते फक्त ग्रंथालयाच्या कपाटात धूळ खात पडून राहते. आपल्याकडे बहुतांशी असेच होते. सरकारही विद्यापीठांना संशोधनासाठी पुरेसा निधी देत नाही. सरकारी अनुदान पगारातच खर्च होते. त्यामुळे विद्यापीठांकडे सुसज्ज प्रयोगशाळा, परिपूर्ण ग्रंथालये, अद्ययावत यंत्रणा उपलब्ध नसतात. चार-पाच टक्के प्रामाणिक प्राध्यापक, संशोधक आपल्या परीने काहीतरी करतात. पण, एवढ्या मोठ्या देशासाठी शिक्षणात, त्यातही उच्च शिक्षणात मानांकन मिळवण्यासाठी ते पुरेसे नाही.
ही परिस्थिती बदलण्यासाठी... { शाळांचे, कॉलेज-विद्यापीठांचे अभ्यासक्रम तातडीने बदलावे लागतील. त्यात शिकवण्याऐवजी शिकण्यावर भर हवा. सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. { कृतीवर अधिक भर हवा. वाचन, लेखन पुरेसे नसते. त्यातले काय, किती समजले हे जास्त महत्त्वाचे. जे शिकतो ते कशासाठी? त्याचा कुठे, काय उपयोग होऊ शकतो, हे कृतीतून समजायला हवे. कौशल्ये विकसित व्हायला हवीत. मातृभाषा नीट यायलाच हवी, इतर भाषांचेही ज्ञान हवे. { मूल्यमापन पद्धत मुळापासून बदलायला हवी. विद्यार्थ्यांचे सातत्याने, कळत नकळत मूल्यमापन व्हायला हवे. सुधारणेला वाव, प्रोत्साहन मिळावे. चुका करत शिकण्याचे स्वातंत्र्य असावे. { दर्जाच्या, गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड नको. शिथिलता नको. भेदाभेद तर अजिबात नको. { शिक्षण, संशोधनाच्या क्षेत्रात सरकारची लुडबुड नको. सरकारने फक्त अनुदान देण्याचे, प्रोत्साहन देण्याचे काम करावे. { पदवी अन् नोकरी या गोष्टी डी लिंक कराव्यात. नोकरीत संबंधित व्यावसायिक कौशल्य, चारित्र्य, जिद्द, महत्त्वाकांक्षा हे सारे महत्त्वाचे असते. संशोधन केवळ पदवीसाठी नव्हे, तर ज्ञानवृद्धीसाठी, समाजासाठी, विकासासाठीच करायचे असते ही भूमिका हवी. { मातृभाषेतून सर्व ज्ञानशाखांच्या उत्कृष्ट ग्रंथांचे अनुवाद, तसेच नव्या, सुलभ पुस्तकांची तातडीने निर्मिती व्हावी. { शिक्षण, संशोधन, मूल्यमापन, अध्यापन या सर्व प्रक्रिया आनंददायी असाव्यात. त्यात कुठेही ताण-तणाव नसावेत. { व्यावसायिक नीतिमत्ता, चारित्र्यसंपन्नता, राष्ट्रीयत्व, कायद्याविषयी आदर, समाजभान यांवर शिक्षणात भर हवा. जात, धर्म, लिंग भेद न करता सर्वांना समान न्याय, समान संधी देणारी प्रक्रिया प्रत्येक पावलावर काटेकोरपणे राबवावी.
(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.) डॉ. विजय पांढरीपांडे vijaympande@yahoo.com संपर्क : ७६५९०८४५५५
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.