आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिदिन विशेष:देदीप्यमान इतिहासाकडे दुर्लक्ष; सातारचे प्रतिसरकार स्मारक उभारण्यास प्रशासन उदासीन

विजय मांडके | साताराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील मिदनापूर, बलिया व पूर्वीचा सातारा या तीन जिल्ह्यांत इंग्रजांच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिसरकार स्थापन केले होते. स्मृतिशेष पंतप्रधान नरसिंह राव यांनी जाहीर केलेली स्मारके मिदनापूर, बलिया या ठिकाणी सुसज्ज पध्दतीने उभी राहिली. मात्र, सातारा येथील स्मारक उभे करण्याबाबत महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. काही स्वातंत्र्यसैनिकांच्या पुढाकाराने पाठपुरावा झाल्याने एक स्तंभ उभारण्यात आला आहे. बाकी उदासीनताच दिसत आहे. अयोध्येत राम मंदिर बांधकाम सुरू मात्र प्रतिसरकार सन्मानार्थ सातारला स्मारक उभारणीबाबत मात्र सगळीकडे उदासीनता.

इंग्रज सरकारला देशाबाहेर घालवून देण्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपले रक्त सांडले. कारावास भोगला. देशातील मिदनापूर , बलिया आणि सातारा या तीन जिल्ह्यांत प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते. या तीन जिल्ह्यांत तत्कालीन पंतप्रधान स्मृतिशेष नरसिंह राव यांनी प्रतिसरकारमधील सैनिकांच्या समानार्थ भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली आणि त्यासाठी काही रक्कमही जाहीर केली. मिदनापूर आणि बालिया या जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारची भव्य स्मारके उभी राहिली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील अशा प्रकारचे स्मारक उभे राहू शकले नाही ही खेदाची नव्हे तर संतापजनक बाब आहे. सातारा शहरात नवीन प्रशासकीय इमारतीच्या शेजारी प्रतिसरकारच्या चळवळीचे स्मारक सध्या महत्प्रयासाने उभे करण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत, परंतु प्रशासनाच्या पातळीवर त्यांना म्हणावा असा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही असेच म्हणावे लागेल.

पूर्वीच्या सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्य चळवळीचा दैदीप्यमान असा इतिहास आहे. (आताचा सातारा व सांगली जिल्हा). परंतु तो इतिहास पुसून टाकण्याचे काम काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक करीत आहेत. विशेष म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चळवळ सातारा जिल्ह्यात झाली होती. हे प्रतिसरकार बालिया व मिदनापूर येथील प्रतिसरकारच्या तुलनेत अधिक काळ चालले होते. स्वातंत्र्य दिल्याचे घोषित केले तरीही प्रतिसरकार काही गावातून सुरू होते अशी स्थिती असलेल्या सातारा जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी हे स्मारक उभे राहिले जात नाही हे वास्तव आहे. सातारा येथे तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व त्यानंतर स्मृतिशेष अभयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या स्मारकासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठका झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पुढे काहीच हालचाल झाली नाही. या प्रतिसरकारच्या चळवळीच्या स्मारकाच्या जागेवर सध्या शिल्प उभे करण्यात आले आहे व सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार नेमके कोणत्या भागात होते त्याचा नकाशाही त्या शिल्पावरील कोनशिलेवर काढण्यात आलेला आहे. मात्र सध्याची त्या स्मारकाच्या जागेची अवस्था बघितली तर गवताचे साम्राज्य येथे उभे राहिलेले आहे व या स्मारकाची दुर्दशा मात्र तेथे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करून राम मंदिर उभारणी सुद्धा सुरू झाली, मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले, रक्त सांडले, त्यांच्या चळवळीच्या स्मारकासाठी मात्र जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत याला काय म्हणावे? प्रतिसरकारच्या चळवळीचा देदीप्यमान इतिहास आपण जपणार आहोत की नाही हीच शंका येऊ लागली आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या मुलखात प्रतिसरकारच्या स्मारकाबाबत एवढे दुर्लक्ष का होते हे कळत नाही. प्रतिसरकारचा इतिहास नव्या पिढीपुढे जाऊ नये असे वाटत आहे का?

बातम्या आणखी आहेत...