आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे स्वरुप, त्यामागचे नेमके कारण काय? या आंदोलनाचा खरेच उपयोग होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून जाणून घेतली.
औरंगाबादचे नामांतर फक्त एका राजकीय नेत्याच्या इच्छेसाठी करण्यात आले असल्याचा आरोप या वेळी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. तसे असेल तर माझीही इच्छा आहे की, मुंबईचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज महानगर', पुण्याचे नाव 'फुले नगरी' तर नागपूरचे नाव 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी' करा, अशी मागणी देखील त्यांनी या वेळी केली. वरील फोटोला क्लीक करुन पाहा खासदार इम्तियाज जलील यांची पूर्ण मुलाखत...
वाचा, काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील...
प्रश्न. : नामांतराच्या मुद्द्यावरून आंदोलनाचा निर्णय कसा घेतला?
उत्तर : लोकशाही मार्गाने आम्ही सुरुवातीपासूनच औरंगाबाद नामांतराला विरोध करत आहोत. केवळ मीच नाही तर औरंगाबाद शहरातल्या कित्येक नागरिकांची हीच मागणी आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण कोर्टात असताना केंद्र आणि राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कृतीतून हे स्पष्ट होते की, केंद्र व राज्य सरकार कोर्टाला देखील मानत नाही. आम्ही कोर्टापेक्षा मोठे असल्याची स्वतःची प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयाची वाट न बघता निर्णय घेणे चुकीचा आहे. शांतीपूर्ण व लोकशाही मार्गाने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करत आहोत. या आंदोलनात शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी तसेच विविध पक्षांनी एकत्रित यावे. एका विशिष्ट पक्षातील नेत्याला खुश करण्यासाठी औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचा मोठा इतिहास आहे, नागरिकांची भावनिक नाळ या शहराशी जोडलेली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे शहर असून मोठ्या कंपन्यांची येथे गुंतवणुकीचा मानस आहे. त्यातच हा निर्णय म्हणजे एका घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे, असे मला वाटते.
प्रश्न : या संपूर्ण आंदोलनाचा काही परिणाम होईल असे वाटते का?
उत्तर : केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या कृतीतून ही बाब स्पष्ट केली आहे की, या देशात लोकशाही आता संपुष्टात येत आहे. एक डिक्टेटर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आपल्याला बघायला मिळत आहे. डिक्टेटरशिप म्हणजेच हे सरकार कोणालाही महत्व देणार नाही, कोर्टाचे आदेशही मानणार नाही, ते जो निर्णय घेतील तोच अंतिम असल्याचे चित्र उभे राहत आहे. लोकशाहीने मला हा अधिकार दिला आहे की, कोणताही निर्णय मला मान्य नसेल तर त्याचा विरोध मी शांतीपूर्ण मार्गाने करू शकतो. याच आधारावर मी हे आंदोलन करणार आहे, त्याचा कितपत परिणाम होईल हे सांगणे अवघड आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मी रस्त्यावर उतरत असल्याचे समाधान मला राहील. मी लढलो ही बाब माझ्यासाठी अधिक महत्वपूर्ण आहे.
प्रश्न : संभाजी महाराजांचे नाव दिले असताना एमआयएम आंदोलन करत आहे, यामुळे ध्रुवीकरण होईल असे वाटत नाही का?
उत्तर : काही माध्यमे व राजकीय पक्ष हे आंदोलन म्हणजे 'एमआयएम' पक्षाचे आंदोलन असल्याचे भासवत आहे. परंतु हे आंदोलन मी कोणत्याही पक्षाच्या नावाखाली करत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच आम्ही 'औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समिती' स्थापन केली आहे. या समितीत सर्वच जाती धर्म आणि राजकीय पक्षातील मंडळींचा समावेश आहे. एक सामान्य औरंगाबादकर म्हणून मी इम्तियाज जलील हे आंदोलन करणार आहे.
प्रश्न : मनपा निवडणुकीच्या तोंडावर निर्णय झाला असे वाटते का?
उत्तर : शिवसेना गेली 30 वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर महानगरपालिका निवडणूका लढत आली. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करणार हाच तो भावनिक मुद्दा होता. त्यामुळे आता कोणता नवीन भावनिक मुद्दा शिवसेना उपस्थित करणार याकडे लक्ष आहे.
प्रश्न : आंदोलन किती दिवस चालणार आहे?
उत्तर : आंदोलन बेमुदत असेल. औरंगाबादचे नामांतर हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ईच्छा असल्याचे लोक म्हणतात. मुळात बाळासाहेब ठाकरे हे कोणत्याही संविधानिक पदावर नव्हते. ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख होते. मग त्यांच्या भावनेचा आदर होत असेल, तर मी सुद्धा एका संविधानिक पदावर कार्यरत असणारा खासदार आहे. या नात्याने माझ्या भावनांचे काहीच महत्व नाही का? नियम सर्वांसाठी सारखे असावे. जे माझ्या हृदयात आहे, तेच माझ्या ओठांवर आहे. ते सर्वांना मान्य असो अथवा नसो. दिल्लीत राजाने निर्णय घेतला म्हणजे तो होत नाही. मी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे गुलाम नाही. मला एखादा निर्णय न पटल्यास त्याला विरोध करण्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे.
प्रश्न : खासदार इम्तियाज जलील यांचा संभाजी महाराजांच्या नावाला विरोध आहे का?
उत्तर : मी अनेकदा सांगितले आहे, आणि आता तुमच्या माध्यमातून पुन्हा सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, हे लोक यासाठी मोठे झाले नाही की, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर एखाद्या शहराला त्यांचे नाव दिले जाईल. हे सर्व महान व्यक्ती त्यांच्या कार्यामुळे मोठे झाले आहेत. त्यांना मानणारे लोक या महापुरुषांना वाटून घेत आहेत. मराठा समाजाला वाटते की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आमचेच आहेत. दलित समाजाला असे वाटते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर केवळ आमचा अधिकार आहे. ओबीसी समाजाला वाटते की, अमूक नेता आमचा आहे. वास्तविक असे काही नाही. आपण रंगाचे देखील वाटप केले आहे. मी संभाजी महाराजांचा आदर करत नाही असे कधी म्हणालो नाही. मी सर्वांचा आदर करतो. मात्र, त्यांच्या नावाचा वापर मी राजकारणासाठी केला नाही. किंवा करणार देखील नाही. त्यांच्या नावाचा वापर करणे घाणेरडे राजकारण आहे.
इतर कोणीही विरोध केला तर कोणी विचारणार नाही. मात्र, मी विरोध केला तर इम्तियाज जलील विरोध करतोय, असा प्रश्न पडतो. त्याचे कारण आहे इम्तियाज जलीलची एक जात आहे. अशावेळी जातीला पुढे केले जाते. मी मुसलमान असल्यामुळेच विरोध करतोय असे, सांगितले जाते. माझा धर्म मुसलमान आहे, मी जातीने मुसलमान आहे. पण मी एक भारतीय आहे. सर्वात आधी मी एक भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. त्याच बरोबरच मी एक मराठी माणूस आहे, एक महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करणे आणि संभाजीनगर नावाला विरोध करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व मानतात तर मुंबईला 'छत्रपती शिवाजी राजे महानगर' असे नाव देण्यात यावे अशी मागणी मी करतो. पुण्याचे ‘फुले नगरी’ तर नागपूरचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी’ करा, अशीही माझी इच्छा आहे.
प्रश्न : नामांतरविरोधी कायदेशीर लढाई कशी लढणार आहात?
उत्तर : न्यायालयामध्ये याविषयी सुनावणी सुरू आहे. शहराचे नाव बदलण्यासाठी काही नियम आहेत. हे सर्व नियम डावलून तुम्ही भावनिक मुद्द्यांवर शहराचे नाव बदलले. भावनिक मुद्द्यावर कोणत्याही शहराचे नाव बदलता येत नाही, असा हा नियम आहे. असे असताना सर्व नियम बाजूला ठेवत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराच्या नावाचा तुम्हाला आक्षेप आहे. मात्र, बिहारमध्ये औरंगाबाद शहर आहे. त्या शहराच्या नावावर तुम्हाला आक्षेप नाही. विशेष म्हणजे बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार हे भाजपचे आहेत. अशी तुटप्पी भूमिका योग्य नाही.
जिल्ह्याचा पाणी प्रश्न, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रश्न, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, केवळ राजकारणासाठी शहराचे नाव बदलण्यात आले आहे.
या विषयी आणखी बातम्या वाचा..
इम्तियाज जलील यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू:औरंगाबाद नामांतराचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरोध
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला अधिकृत परवानगी दिल्यानंतर या निर्णयाविरोधात खासदार इम्तियाज जलील आजपासून बेमुदत साखळी उपोषण करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होत आहे. पूर्ण बातमी वाचा..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.