आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंडेप्थ:स्पेनमध्ये 'सेक्स'पूर्वी मुलीचा होकार आवश्यक, गप्प राहिली किंवा विरोध केला नाही तर रेप मानला जाईल

निकिता अग्रवालएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

7 जुलै 2016. स्पेनचे पॅम्प्लोना शहर, जिथे दरवर्षी बैलांची शर्यत आयोजित केली जाते. येथील एका 18 वर्षीय मुलीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्याचा व्हिडिओही केला. या व्हिडीओत तरुणी आक्षेप घेताना नव्हे तर शांत दिसते.

या व्हिडिओचा दाखला देत कोर्टाने हा बलात्कार असल्याचे मानण्यास नकार दिला. तरुणी बलात्काराचा कोणताही पुरावा सादर करू शकली नाही, तसेच तिने लैंगिक कृत्यावर स्पष्ट आक्षेपही घेतला नाही, असा तर्क यासाठी देण्यात आला. कोर्टाने पाचही आरोपींना बलात्कार नव्हे तर केवळ लैंगिक छळाप्रकरणी दोषी घोषित केले. त्याला वुल्फ पॅक प्रकरण म्हणून ओळखले गेले. कोर्टाच्या या न्यायदानावर देशभरात निदर्शने झाली.

6 वर्षांनंतर...

26 मे 2022. स्पेनच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने एक विधेयक पारित केले. या विधेयकानुसार स्पेनमध्ये पीडितेला तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध करण्याची गरज नाही. म्हणजे, तिने लैंगिक कृत्याला स्पष्टपणे परवानगी दिली नाही, तर तो बलात्कार मानला जाईल. विशेषतः शांत राहणे किंवा विरोध न करणेही लैंगिक संबंधांना तिचा नकार असल्याचे मानले जाईल. या विधेयकाला 'ओन्ली येस मीन्स येस' म्हटले जात आहे. हे विधेयक आता स्पेनच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे सीनेटमध्ये सादर केले जाईल.

दिव्य मराठी इंडेप्थमध्ये आपण संपूर्ण जगात स्पेनच्या 'ओन्ली येस मीन्स येस' या कायद्याची एवढी चर्चा का होत आहे? हे जाणून घेऊया..

'ओन्ली येस मीन्स येस' विधेयकात काय आहे?

26 मे रोजी स्पेनच्या कनिष्ठ सभागृहात द गॅरंटी ऑफ सेक्शुअल प्रीडम बिल पास झाले. त्याच्या समर्थनार्थ 201 तर विरोधात 140 मते पडली. आता हे विधेयक सीनेटमध्ये सादर होईल. तिथे पारित झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.

आम्ही तुम्हाला या विधेयकातील महत्वाच्या तरतुदींची माहिती देत आहोत...

 • या विधेयकानुसार महिलांच्या गुप्तांगाला नुकसान पोहोचवणे, जबरदस्ती लग्न करणे, लैंगिक छळ, लैंगिक शोषणासाठी तस्करी करणे आदी प्रकरणांत लैंगिक हिंसाचाराच्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.
 • डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणारा लैंगिक हिंसाचारावरही विशेष लक्ष दिले जाईल. यात लैंगिक हिंसेला प्रोत्साहन देणे, संमतीशिवाय अश्लील सामग्री तयार करणे, लैंगिक कृत्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन निमंत्रित करणे हा देखील गुन्हा आहे.
 • विधेयकातील तरतुदींनुसार, रेप व लैंगिक छळाच्या अन्य प्रकरणांना एकाच कक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यात एकसमान कारवाई होईल. विशेषतः लैंगिक कृत्य करण्यापूर्वी आरोपीने पीडितेला न सांगता तिला नशा किंवा अंमली पदार्थ दिले, तर तोही गुन्हा मानला जाईल.
 • विधेयकानुसार विनासहमती आक्षेपार्ह छायाचित्रे शेयर करणेही गुन्हा असेल. या विधेयकात असे म्हटले आहे की लैंगिक रूढी किंवा महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर मानल्या जातील. तसेच वेश्याव्यवसायाशी संबंधित सर्वच जाहिरातींवर बंदी घालण्यात येईल.
स्पेनच्या समानता मंत्री आयरिन मोंटेरो यांनी एका ट्विटद्वारे अखेरीस 'ओन्ली येस मीन्स येस' विधेयकाचे कायद्यात रुपांतर होत असल्याचे स्पष्ट केले आहे. महिलांकडे आता लैंगिक कृत्याशी संबंधित स्वातंत्र्याची हमी देणारा कायदा असेल, असे त्या म्हणाल्या.
स्पेनच्या समानता मंत्री आयरिन मोंटेरो यांनी एका ट्विटद्वारे अखेरीस 'ओन्ली येस मीन्स येस' विधेयकाचे कायद्यात रुपांतर होत असल्याचे स्पष्ट केले आहे. महिलांकडे आता लैंगिक कृत्याशी संबंधित स्वातंत्र्याची हमी देणारा कायदा असेल, असे त्या म्हणाल्या.

या झाल्या विधेयकाच्या गोष्टी. आता या प्रकरणांतील गुन्हेगारांना काय शिक्षा होईल हे पाहू...

‘ओन्ली येस मीन्स येस’विधेयकांतर्गत सहमतीशिवाय शारिरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला 15 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. आरोपी अल्पवयीन असेल तर त्याला लैंगिक समानता प्रशिक्षण आणि लैंगिक शिक्षण दिले जाईल. डिजिटल क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यासह लैंगिक शिक्षण बंधनकारक केले जाईल. यामुळे सर्वांना लैंगिक स्वातंत्र्याचे महत्व मिळेल.

विधेयकांतर्गत अशा प्रकरणांतील पीडितांसाठी 24 तास कार्यरत असणारे क्रायसिस सेंटर्सही स्थापन केले जातील. यात पीडित व त्यांच्या कुटुंबियांची विशेष काळजी घेतली जाईल. विधेयकात स्पेनच्या सरकारने 2024 पर्यंत प्रत्येक राज्यांत किमान एक क्रायसिस सेंटर उघडण्याची ग्वाही दिली आहे.

पीरियड्समध्ये पगारी रजा देण्याचा निर्णय

17 मे 2022 रोजी स्पेनच्या सरकारने एक विधेयक पारित करुन मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना पगारी रजा देण्याची तरतूद केली. असे करणारा स्पेन युरोपातील पहिला देश बनला आहे. विधेयकानुसार, स्पेनमध्ये मासिक पाळीमुळे महिलेला वेदना सहन कराव्या लागल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. त्यात डॉक्टराने सुट्टी घेण्याचा सल्ला दिला तर महिलेला 3-5 दिवसांची पगारी रजा दिली जाईल.

हे विधेयक लवकरच सीनेटमध्ये सादर होईल. तिथे पारित झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. या विधेयक शाळांत गर्भनिरोधक औषधी व मासिक पाळीशी संबंधित सामग्री मोफत वाटण्याचीही तरतूद आहे. तसेच लैंगिक शिक्षणाची सक्तीही यात करण्यात आली आहे.

ही झाली स्पेनची गोष्ट. आता पाहुया जगभरातील कोणकोणत्या देशांत विनासहमती लैंगिक कृत्य रेप मानले जाते...

आता गोष्ट भारताची. भारतात याविषयी काय कायदेशीर स्थिती आहे हे पाहुया...

भादंवि कलम 375 अंतर्गत या स्थितीत प्रस्थापित करण्यात आलेले शारीरिक संबंध बलात्कार असेल -

 • महिलेच्या संमतीशिवाय
 • तिची सहमती, म्हणजे तिचा होकार असल्याशिवाय
 • जबरदस्ती, ताकदीच्या बळावर किंवा मारहाण करुन, धमकावून
 • खोटी ओळख सांगून
 • फसवणूक
 • महिला नशेत असताना किंवा तिला मादक पदार्थ दिल्याच्या स्थितीत
 • महिलेचे मानसिक आरोग्य चांगले नसताना

याशिवाय महिलेचे वय 18 वर्षांहून कमी असेल, म्हणजेच ती अल्पवयीन असेल, तर कोणत्याही परिस्थितीत विशेषतः तिच्या इच्छेने केलेले संबंधही बलात्कार ठरतील.

भादंवित 'संमती ' (सहमती) शब्दाचीही व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार, जेव्हा एखादी महिला स्पष्टपणे व स्वेच्छेने शब्द, हावभाव, बोलणे किंवा न बोलता शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हो म्हणते, तेव्हाच त्याला संमती मानले जाईल.

ही झाली स्पेनच्या विधेयकाची गोष्ट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या वुल्फ पॅक प्रकरणाचे पुढे काय झाले? तर जनतेच्या संतापानंतर 2019 मध्ये स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण बलात्काराचे माणून सर्वच आरोपींना 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.