आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • In Ten Days, 150 Suspects Were Chased, But Accused Was Not Found Who Attacked On Priyasharan Maharaj ; Increasing Pressure On Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट भाग 1:दहा दिवसांत 150 संशयितांची चाैकशी, पण प्रियशरण महाराजांवरील हल्लेखाेर सापडेनात; पाेलिसांवर वाढतोय दबाव

मंदार जोशी / सुमीत डोळे |औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराजांचा आश्रम व निवासस्थान. इन्सेट : प्रियशरण महाराज - Divya Marathi
महाराजांचा आश्रम व निवासस्थान. इन्सेट : प्रियशरण महाराज
  • साताळा परिसरातील अनेकांवर ‘थर्ड डिग्री’चा प्रयाेग, पण काहीच निष्पन्न हाेईना
  • अनेक बडे अधिकारी फुलंब्री ठाण्यात तळ ठोकून, स्थानिक ग्रामस्थ भयभीत

औरंगाबाद जिल्ह्यातील चौका शिवारापासून जवळच असलेल्या साताळा येथील प्रियशरण महाराज ऊर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर (६१) यांच्यावर येथील आश्रमात घुसून हल्ला करणारे आराेपी शाेधण्यात पाेलिसांना दहा दिवसांनंतरही यश आलेले नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात तपासाचा पाेलिसांवर प्रचंड दबाव असल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळे एक पोलिस उपाधीक्षकासह तीन पोलिस निरीक्षक गेल्या दहा दिवसांपासून फुलंब्री पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत. सातारा गाव परिसरातील १५० जणांची आतापर्यंत चाैकशी करण्यात आली, काहींना ‘पाेलिसी खाक्या’ही दाखवला, मात्र यापैकी एकाविराेधातही पाेलिसांना पुरावे सापडू शकले नाहीत.

११ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास प्रियशरण महाराजांना आठ ते दहा अज्ञात लोकांनी मारहाण केली. बाहेर झाेपलेल्या साधकांना उठवून महाराजांची खाेली विचारत या आराेपींनी खाेलीत घुसून मारहाण केली. यात महाराज गंभीर जखमी झाले हाेते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिवसरात्र पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिस उपाधीक्षक विशाल नेहूल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, फुलंब्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदिराज आणि करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्यासह त्यांचे पथक या घटनेचा तपास करीत आहे. या प्रकरणात कलम ३२४ (घातक शस्त्रांनी मारहाण करणे) १४३ (सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे) १४७ (दंगा करणे) १४८ (घातक शस्त्र घेऊन दंगा करणे) १४९ (समान उद्देश साधण्यासाठी एकत्र येऊन गुन्हा करणे) ४५२ (दुसऱ्याच्या हद्दीत शिरून हल्ल्याची पूर्वतयारी करून दुखापत करणे) ही कलमे या प्रकरणात लावण्यात आली आहेत.

आश्रमाचे गूढ कायम

फुलंब्री तालुक्यातील चौका गावापासून चार किलोमीटर अंतरावर सांजूळचा तलाव आहे. आजूबाजूला डोंगर, झाडे, निसर्गरम्य असा निर्मनुष्य परिसर आहे. तलावाच्या समोरील टेकडीवर प्रियशरण महाराजांचा आलिशान आश्रम आहे. महाराजांचे राजस्थान व इतर राज्यांत माेठ्या प्रमाणावर भक्तगण आहेत. २००७ मध्ये साताळा येथे आश्रम सुरू झाला. सुरुवातीला अर्धा एकर जमीन असलेल्या या आश्रमाची जागा आता सुमारे ४० एकरापर्यंत आहे. राधा गोविंद मिशन असे ट्रस्टचे नाव असून बाबा त्या ट्रस्टचे सर्वेसर्वा आहेत. या आश्रमामुळे या भागात चांगल्या कार्याला सुरुवात होईल, शाळा-हॉस्पिटल सुरू होतील या भावनेतून काही स्थानिकांनी जमिनीही दान दिल्या. तसे आश्वासनही गावकऱ्यांना दिल्याचे काही लोक सांगतात. विशेष बाब म्हणजे देशातील विविध राज्यांत जाऊन भागवत कथा सांगणारे प्रियशरण महाराज शहरात व जिल्ह्यात अधिक लोकांना माहिती नाहीत.

माेबाइल लाेकेशनवरून चाैकशी

घटनेच्या वेळचे व त्याआधी आश्रमापासून जवळच्या भागात काेण काेण हाेते याचे माेबाइल लाेकेशन पाेलिसांनी तपासले. त्या प्रत्येकाची चाैकशी करण्यात आली. काहींना पाेलिसी खाक्याही दाखवण्यात आला. आश्रमाच्या शेजारी अनेकांची शेती आहे. काही शेतकरी रात्री शेतात असतात. त्यांचीही चाैकशी करण्यात आली. मात्र पाेलिसांच्या हाती सुगावा लागू शकला नाही. तांत्रिक तपासाच्या सर्व बाजू पडताळून पाहिल्या जात आहेत.

बड्या शिष्यांची आश्रमात ये-जा

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमाची तीनमजली इमारत आहे. त्यातच एका सभागृहात बालकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महोत्सव होतो. मात्र त्या महोत्सवातदेखील स्थानिक लोक मोठ्या संख्येने नसतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आलिशान गाड्यात कायम या ठिकाणी भक्त येतात. आश्रमात शेती केली जाते, मोठ्या संख्येने गिर गायीदेखील आहेत. त्याचे दूधदेखील विकले जाते. आश्रमाचा काही भाग विकसित केला असून काही भागावर बांधकाम सुरू आहे. सुरुवातीच्या काळात नांदेडचे अनंत रेणापूरकर सक्रिय सदस्य होते. आता या आश्रमात पाच ते सहा महिला व तीन ते चार पुरुष सेवेकरी आहेत.

पोलिसांवर दबाव

सहा महिन्यांपूर्वी पालघर येथे जमावाच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाला होता. या घटनेची देशभरात चर्चा झाली होती. त्यानंतर साधूवरील हल्ल्याचे हे दुसरे प्रकरण घडले. या घटनेनंतर अनेक राजकीय मंडळींनी प्रियशरण महाराजांची भेट घेतली. त्यामुळे पोलिसांवरचा दबाव वाढतच चालला आहे. राजकीय चर्चा होण्यापूर्वीच हा गुन्हा उघडकीस यावा यासाठी पोलिस अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना आणि पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील स्वत: या तपासाकडे लक्ष ठेवून आहेत.

या मुद्द्यांवर फिरताहेत तपासाची चक्रे:

महाराजांना नेमकी मारहाण का झाली असावी याची वेगवेगळी कारणे पाेलिस शाेधत आहेत. पाेलिसांनी चाैकशी केली तर महाराज म्हणतात, ‘हम तो ईश्वर कि सेवा करते हें, हमरा किसी से क्या बैर..’ त्यामुळे गूढ कायम आहे. हल्लेखाेर सात आठ तरुण होते. त्यांनी जॅकेट घातले असून तोंड रुमालाने बांधले होते. इतर कुठल्याही वस्तूला हात लावला नाही आणि ते मराठीत बोलत होते. एवढेच काय ते पोलिसांना माहिती आहे. पाेलिस आता खालील मुद्द्यांच्या आधारे तपास करत आहेत.

१ आश्रमात स्थानिकांना प्रवेश नाही. चुकून चरण्यासाठी गुरं गेली तरी वाद होतात. यापूर्वी हाणामारीपर्यंत प्रकरणे गेली. त्यामुळे स्थानिकांचा या आश्रमावर राग असावा.

२ महाराज मूळचे राजस्थान येथील फथेपूर शेखावती गावातील आहेत. त्या ठिकाणी त्यांचे काही जुने वाद आहेत का? यातून हा हल्ला झाला आहे का?

३ प्रियशरण महाराज हे कृपाळू महाराजांचे शिष्य होते, मात्र त्यांचे वाद झाले असून त्यानंतर प्रियशरण यांनी वेगळा आश्रम सुरू केला.

४ नागपूर येथे धनतोली पोलिस ठाण्यात १९९३ मध्ये एका प्रकरणात महाराज हे सहआरोपी होते. १९९७ मध्ये त्यांची त्यातून निर्दोष मुक्तता झाली. त्याचा याच्याशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser