आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुली, औक्षवंत हो!’:‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकात पु. ल. देशपांडे यांनी लतादीदींवर लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सुखी या साधूमुळे’नंतरच्या ‘शूरा’मधल्या ‘रा’ या अक्षरावर सभागृहातून विजेच्या वेगाने आणि विजेच्याच लखलखाटाने एखादा तीर सूं-सूं करीत जावा तशी त्या चिमुकल्या गळ्यातून तान गेली आणि सभेचा लक्ष्यवेध झाला. त्या नऊ-दहा वर्षांच्या चिमण्या जीवाला आपण काय केले याची कल्पना तरी होती की नाही, देव जाणे! सगळ्या पॅलेस थिएटरचे भान त्या सुरांबरोबर हरपले. एक एवढीशी हडकुळी, पण अंतर्बाह्य आत्मविश्वासाने फुललेली मुलगी रंगभूमीवर येते काय आणि फार फार तर ‘घेऊनि ये पंखा’ म्हणायच्या वयात एकदम ‘शूरा मी वंदिलें।’ सुरू करते काय! बाबालाल तबलजी एखाद्या अनुभवी गायकाबरोबर धरावा तसला जबऱ्या दिमाखाचा ठेका काय धरतात आणि पदाची अस्ताई संपवून पहिल्या समेला येताना ही पोरगी पुरे सप्तक भेदून लयीचा तो बिकट बोजा संभाळून समेवर येते काय! कोल्हापूरच्या त्या पॅलेस थिएटरात संगीतातल्या दिग्गजांनी ज्या रंगमंचावरून सुरांच्या बरसातीचे साक्षात्कार घडविले आहेत, त्याच स्थानावरून एका परकऱ्या पोरीने हे नवल वर्तवले होते.

आश्चर्य, आनंद आणि त्या पोरीच्या कर्तबगार पित्याची आठवण असल्या नानाविध भावनांनी त्या रंगमंदिरातल्या श्रोत्यांच्या अंगावर रोमांच फुलले. कडकडून टाळी झाली नुसती पहिल्या समेला. मी-मी म्हणणाऱ्यांनी स्वतःला चिमटा घेऊन पाहिले असेल की आपण हे ऐकतो आहो ते खरेच आहे की हे स्वप्न आहे? त्या तानेचा दाणादाणा स्वच्छ होता, त्या सुरात भिजलेला होता. लयीच्या कणाकणाचा अंदाज बिनचूक होता. समेवरची झडप तर अशी घारीसारखी होती की, समोरचे ते एवढेसे परकर-पोलक्यातले दर्शन नसते तर एखाद्याला वाटले असते की कुणी तपातपाची मेहनत झालेली बुजुर्ग बाई केवळ चूष म्हणून बालआवाजीत पलटा घेऊन गेली.

यापूर्वी फक्त कुमार गंधर्वांनी वयाच्या नवव्या वर्षी मुंबईच्या जिना हॉलमध्ये असला धक्का दिला होता. बालगंधर्वांनी आणखी काही वर्षांपूर्वी अशाच बालवयात रंगभूमीवर येऊन असंख्य अंतःकरणे आपल्या स्वरांनी झेलली होती. आणि आता हा एक नवा चमत्कार घडत होता. बालगंधर्व, कुमार गंधर्व आणि लता मंगेशकर-तिघांनी संगीतातल्या तीन निरनिराळ्या वाटा धरल्या आणि असामान्यत्वाने उजळून ठेवल्या. सुरांच्या वर्तुळातला मध्यबिंदू पकडणारा आणि लयकारीत वाहत्या काळातला निमिषा-निमिषातला लक्षांश पकडणारा असा हा लताचा गळा आहे. आणि म्हणनच तिच्या गीतातले शब्दच नव्हे, तर व्यंजनमुक्त स्वरही किती आशयगर्भ वाटतात. लता “धीरे से आ जा” म्हणून लोरी गाते, पण ‘आ जा’नंतरचा तो स्वरांचा हलकासा शिडकावा लयीच्या अशा जागेवरून उठतो की, त्याने कसल्या तरी परतत्त्वाचा स्पर्श केल्यासारखा वाटतो. या साऱ्या आठवणी कमालीच्या मुश्कील आहेत. केवळ स्वरांच्या करामतीमुळे नव्हे; उठावासाठी पकडलेल्या, साध्या नजरेला न दिसणाऱ्या स्थानांमुळे. लताच्या गाण्यातले असामान्यत्व मला तरी भासते ते इथे.

झोप उडवणाऱ्या त्या अंगाईगीतातल्या स्वरांच्या शिडकाव्यासारखे किती तरी शिडकावे आज तिने गायलेल्या शेकडो तबकड्यांच्या रंध्रारंध्रातून लपलेले आहेत. तबकडीच्या त्या रंध्रात शिरून तिला गाती करणाऱ्या त्या सुईचे अग्र अधिक सूक्ष्म की त्या रंध्रातून उमटणारा लताचा सूर अधिक सूक्ष्म, हे सांगणे कठीण आहे. लताच्या सुरांनी जिंकलेले हे केवढे मोठे साम्राज्य आहे! या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही. सकाळ उजाडते. घरोघरीचे रेडिओ लागतात. एखाद्या रेडिओवरून बातम्या ऐकू येत असतात; युद्धाच्या, दंगलीच्या, जाळपोळीच्या, सत्तेच्या उलथापालथीच्या, मन विषण्ण करणाऱ्या, जगणे म्हणजे हेच का हो, अशा प्रश्न उभा करणाऱ्या आणि अंधारातून प्रकाशरेखा जावी, तसा एकदम तीरासारखा घुसतो आणि मनाची काळोखी नष्ट करतो. काही नसले ऐकायला तरी जगले पाहिजे, असे वाटायला लागते. अतिपरिचयानेदेखील अवज्ञा झाली नाही, अशी एकच गोष्ट म्हणजे लताचे सूर !

ते सूर कानी पडले की, मनावर शिल्पासारखा कोरलेला तो प्रसंग डोळ्यांपुढे राहतो. “शूरा मी वंदिले” म्हणणारे परकर-पोलक्यातले लताचे चिमुकले ध्यान दिसायला लागते. मनात म्हणतो, या मुलीला कल्पनाही नसेल की ते “शूरा मी वंदिले” ऐकताना त्या पॅलेस थिएटरातल्या अनेकांनी मनात म्हटले असेल की, या असल्या अलौकिक ‘सूरा मी वंदिले’. आज इतकी वर्षे अनेक ध्वनिमुद्रिका ऐकलेल्यांच्या असंख्य अंतःकरणांतून “बस्स! ह्या सुरांना सलाम आहे,” अशी दाद घेण्याचे भाग्य लताला लाभले आहे. याहीपेक्षा ती दाद देण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. सुरांची चैतन्यफुले फुलविणाऱ्या लतेला, वयापेक्षा कुठलीही वडिलकी नसणाऱ्या माझ्यासारख्याने अंतःकरणापासून एकच आशीर्वाद द्यायचा की, “मुली, अशी ही दाद तुला अखंड मिळो-औक्षवंत हो!”

पु. ल. देशपांडे

बातम्या आणखी आहेत...