आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • In The Four Months From June To September, 269 Farmers Committed Suicide; Farmers Are Fed Up With Natural Calamities, Wrong Government Policy, Market Chain

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी लक्षवेधी:जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 269 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; नैसर्गिक संकटे, सरकारचे चुकीचे धोरण, बाजारातील साखळीमुळे शेतकरी बेजार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुबार पेरणीच्या विवंचनेत शेतकऱ्यांनी केली आत्महत्या, आता अतिवृष्टीमुळे होत असलेल्या पीक नुकसानीमुळे बळीराजाचा धीर सुटत चालल्याने होत आहेत आत्महत्या

मराठवाड्यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान २७४ दिवसांत ५४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाने घेतली आहे. त्यापैकी १४३ आत्महत्या अपात्र ठरवल्या आहेत. तर ७८ प्रकरणे प्रलंबित असल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंब शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. यंदा अतिपाऊस पडत असल्याने हातची पीक अतिवृष्टीमुळे कायमची गेली आहेत. सरकारचे पंचनामेच सुरू आहेत. तातडीची मदत मिळालेली नाही. विमा संरक्षण कधी मिळणार याचा भरवसा नाही. जे काही हाती आले त्याला बाजारात हमी भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना शेतमाला शिवाय दुसरा उत्पन्नाचा पर्याय नाहीत. आर्थिक कोंडीत सापडलेले शेतकरी, शेतमजूर, शेतकरी महिला, मुले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असून सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. लोकप्रतिनिधीही गप्प बसले आहेत.

यंदा शेतकऱ्यांवर तीन गंभीर संकटे कोसळली आहेत. पहिले संकट कोरोना माहामारीचे व दुसरे सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान तर तिसरे केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या शेती धोरणाचा शेती व शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. केंद्र सरकारने तीन कायदे केले, पण त्यातही अनेक त्रूटी राहून गेल्या आहेत. बाजार समितीत कायद्याचे पालन करणे अनिवार्य असतानाही केंद्र सरकारची आधारभूत किंमत शेतमालाला मिळत नाही. बाहेर शेतमाल विक्रीचे जे स्वातंत्र्य दिले तेथे कायद्याचे पालन कसे होणार? एकूणच या तीन संकटांमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.

तीन महिन्यांत आत्महत्या वाढल्या

उस्मानाबाद जिल्ह्यात ४६ तर औरंगाबाद जिल्ह्यात ४२ शेतकऱ्यांनी जून ते सप्टेंबरमध्ये आत्महत्या केल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात या तीन महिन्यांत ३० शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. बीड जिल्ह्यात ३२, परभणी १२, हिंगोली ९, नांदेड १४, लातूर ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर नऊ महिन्यांत ५४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

परभणी : अडीच महिन्यात ९ जणांनी संपवले अमूल्य जीवन

सप्टेंबरपर्यंत ३७ तर चालू महिन्यात ३ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. त्यातील १८ शेतकरी मदतीस पात्र तर १८ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरवल्या गेल्या. चार प्रकरणे चौकशीवर आहेत. मागील अडीच महिन्यांच्या कालावधीत अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके गेली आहेत. जिल्ह्यात जानेवारी-फेब्रुवारीत प्रत्येकी ५ तर मार्चमध्ये ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जुलैमध्ये ६, ऑगस्टमध्ये ५ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. हे सत्र सुरूच आहे.

हिंगाेली : दहा महिन्यांत ३७ जणांनी मृत्यूला कवटाळले

जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये वसमत तालुक्यात १३, कळमनुरी तालुक्यात ८, हिंगोली ७, सेनगाव ६ तर औंढा नागनाथ तालुक्यातील ३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी २७ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये वसमत तालुक्यातील ११, हिंगोली, सेनगाव प्रत्येकी चार, कळमनुरी ७ तर औंढा तालुक्यातील १ शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली. ७ प्रकरणे प्रलंबित आहेत.

नांदेड जिल्ह्यात अडीच महिन्यांत १२ शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

सप्टेबर महिन्यात अतिवृष्टी आणि महापुराने थैमान घातले. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्या गेला. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसला. जवळपास ४२ टक्के पीक हातचे गेले. आता पुन्हा परतीच्या पावसाने फटका दिला. आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जानेवारीपासून आजपर्यंत जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

जालना : जिल्ह्यात चालू महिन्यात चार आत्महत्या

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पिके मातीत गेली. उरल्यासुरल्या पिकांचेही परतीचा पाऊस नुकसान करीत आहे. अशा नैसर्गिक चक्रव्युहात अडकलेले शेतकरी आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलत आहेत. जालना जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ६२ तर चालू महिन्यात ४ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.

उस्मानाबाद : अडीच महिन्यांत २५ शेतकऱ्यांनी पत्करला मृत्यू

कायम दुष्काळी जिल्हा असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत २५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. परतीच्या पावसाने हाता-तोंडाशी आलेले पीक पाण्यात गेले. यामुळे हतबल अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे. जानेवारी २०२० ते आतापर्यंत ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी २५ शेतकऱ्यांनी गेल्या अडीच महिन्यात आत्महत्या केल्या. ऑगस्टमध्ये १३, सप्टेंबरमध्ये १० व नंतरच्या काळात २ आत्महत्या झालेल्या आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser