आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:लॉकडाऊनमध्ये 20 दिवसांत महिलांनी 75 गावांत फुलवल्या 315 परसबागा

कृष्णा पाटील | रावेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
माझी पोषण परसबाग विकास मोहिमेंतर्गत रावेरमध्ये भाजीपाल्याने बहरलेली परसबाग. - Divya Marathi
माझी पोषण परसबाग विकास मोहिमेंतर्गत रावेरमध्ये भाजीपाल्याने बहरलेली परसबाग.
  • 1150 गटांच्या 11 हजार 800 महिलांचा सहभाग, धामोडीची परसबाग फुलली पिके आणि भाजीपाल्याने

ग्रामीण भागातील कुटुंबाच्या आरोग्य व पोषणाचा स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) माझी पोषण परसबाग विकास मोहीम रावेर तालुक्यात २५ जून ते १५ जुलै या काळात राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील महिला बचत गटाच्या माध्यमातून ३१५ परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. ११५० बचत गटांच्या ११ हजार ८०० महिला या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. भाजीपाला विक्रीतून महिला बचत गटांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.

उमेद अभियानाच्या कृती संगम विभागांतर्गत अन्न, आरोग्य, पोषण व स्वच्छता असे उपक्रम राबवण्यात येतात. याच उपक्रमांतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. ११ हजार ८०० महिला सदस्यांच्या माध्यमातून तालुक्यातील ७५ गावांत २० दिवसांच्या कालावधीत एकूण ३१५ परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्या आता बहरू लागल्या आहेत. या परसबागांमध्ये वैयक्तिक व सामूहिक परसबागांचा समावेश आहे.

४४ ग्रामसंघाच्या ३१५ परसबागा :

रावेर तालुक्यात ४४ ग्रामसंघ तयार करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील ११५ गावांपैकी ७५ गावांमध्ये उमेदतर्फे नियुक्त केलेल्या ५ कृती संगम सखी, ४ कृषी सखी व २४ पशू सखीच्या माध्यमातून या परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. महिला बचत गटांच्या मार्गदर्शनासाठी ८९ समुदाय संसाधन व्यक्ती तालुक्यात कार्यरत आहेत.

कुपोषण कमी होण्यास मदत

परसबागांमधून मिळणाऱ्या भाजीपाल्यामुळे महिला व बालकांमधील कुपोषण कमी होण्यास मदत होईल. गरोदर महिलांना ताजा व निरोगी भाजीपाला वेळेवर उपलब्ध होईल. योग्य पोषण होऊन रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल. अंकुश जोशी, व्यवस्थापक, उमेद अभियान, रावेर

आर्थिक उत्पन्न मिळणार

परसबागांमुळे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेता येणार. भाजीपाल्याची विक्री तून गटाला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. दीपाली गुलाने, अध्यक्ष, ओमसाई महिला बचत गट, निंभोरा

धामोडीची परसबाग फुलली पिके आणि भाजीपाल्याने

धामोडी येथील एकता महिला ग्रामसंघाच्या योगिता पाटील, देवकाबाई पाटील, हिरकणी पाटील व ग्राम संघाच्या सहकारी महिलांनी निर्माण केलेल्या परसबागेत औषधवर्गीय, पालेवर्गीय, फळेवर्गीय भाजीपाल्याची व इतर पिकांची लागवड केली आहे. ही बाग फुलण्यास सुरुवात झाली आहे.

परसबागेत सेंद्रिय खताचा वापर

महिलांनी निर्माण केलेल्या सर्व परसबागा तयार करताना सेंद्रिय खते, गांडूळ खते, कंपोस्ट खतांचा वापर करण्यात आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...