आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ज्या वर्धेत ‘चले जाव’ आंदाेलन सुरू झाले होतेे, तेथे आता वृक्षताेडीविराेधात नवी क्रांती; झाडांची कत्तल थांबवण्यासाठी नागरिक, निसर्गप्रेमी आक्रमक

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गांधीजींच्या नावाने होणारी वृक्षतोड थांबवा, हीच क्रांती!

ज्या वर्धेत ‘चले जाव’ आंदाेलन सुरू झाले, होते तेथे आता वृक्षताेड करणाऱ्या सरकारच्या विराेधात नवी क्रांती सुरू आहे. गांधीजींच्या नावाने होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी जागरूक वर्धेकर पुढे आले आहेत. वय वर्ष शंभरीपेक्षा जास्त असलेल्या झाडांची कत्तल थांबवण्यासाठी नागरिक, निसर्गप्रेमी आक्रमक झाले आहेत.

राज्य शासनाकडून सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला. त्याअंतर्गत महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त शहरासह सेवाग्राम आश्रम परिसराचा कायापालट करण्यासाठी १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षांची तोड होत आहे. ही वृक्षतोड थांबवण्यासाठी अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन जागे झाले नाही. त्यामुळे गांधीजींच्या नावाने होणारी वृक्षतोड प्रशासनाने थांबवल्यास गांधीप्रेमींकरिता हीच खरी क्रांती असणार आहे. सेवाग्राम आश्रमाचा व शहराचा विकास व्हावा, याकरिता विकास आराखडा तयार केला होता. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित करीत या कामाचा शुभारंभ केला होता. जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडून सेवाग्राम विकास आराखड्याबाबत तातडीच्या बैठका घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांना सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. वर्धा ते सेवाग्राम रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे कंत्राट देण्यात आले असता, कंत्राटदाराने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सेवाग्राम ग्रामपंचायतीला ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायतीने रीतसर ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने वन विभागाकडूनसुद्धा बांधकाम विभागाला वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सेवाग्राम आश्रम परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर शंभर वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षांची तोड होत असल्याचे निदर्शनास येताच वर्धेतील वृक्षप्रेमीनी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांना जिल्ह्यात होत असलेल्या वृक्षतोंडी संदर्भात इमेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले. पालकमंत्री सुनील केदार शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्यांना घेराव घालून निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता, ते वृक्षप्रेमींसमोर येऊ शकले नसल्याचे सांगितले जात आहे. वृक्षप्रेमी करुणा फुटाणे, ग्रामसेवा मंडळ गोपुरी, संजय इंगळे तिगावकर, डॉ. सचिन पावडे, मुरलीधर बेलखोडे, विभा गुप्ता यांच्यासह अनेकांनी पालकमंत्री केदार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते भेटू शकले नाहीत. वृक्षतोड न थांबल्यास गांधीजींच्या विचारांच्या पाठबळावर आंदोलन करणार आहे, असा इशारा वृक्षप्रेमींकडून देण्यात आला.

झाडं तर ताेडली जाणारच

वर्धा जिल्ह्यात बापूंचा आश्रम असून, त्यांचे जिल्ह्यात वास्तव्य होते. गांधीजींची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याकरिता जगाच्या नजरा आपल्याला वेधून घ्यायच्या असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेले वृक्ष तोडले जाणार. तोडण्यात येणाऱ्या वृक्षाच्या जागी दुसरे वृक्ष लावण्यात येणार आहेत. सुनील केदार, पालकमंत्री, वर्धा.

गांधीजींच्या नावावर वृक्षतोड

बापूराव सूतगिरणी ते सेवाग्राम आश्रम परिसरात १५० मोठे वृक्ष आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी कंत्राटदाराने गांधीजींच्या काळातील झाडे तोडली. मात्र पवनार ते वर्धा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वृक्ष न तोडता रुंदीकरण केले. मग शहर ते सेवाग्राम रस्त्याचे काम वृक्षतोड न करता का होत नाही, असा प्रश्न केला असता, प्रशासन बोलत नाही. वृक्षतोड न थांबवल्यास आंदोलन करणार आहोत. - ओजस सु. वि., अध्यक्ष, ग्रामसेवा मंडळ गोपुरी, वर्धा.

बातम्या आणखी आहेत...