आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातारीख होती 16 डिसेंबर 1971. आजपासून बरोबर 51 वर्षांपूर्वी. पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या कार्यालयात एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देत होत्या. त्यांचा फोन वाजला. इकडून इंदिरा गांधी म्हणाल्या- होय.. होय... ठीक आहे... धन्यवाद. त्यांनी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीची माफी मागितली आणि संसदेच्या दिशेने निघाल्या. संसदेत घोषणा केली, 'पूर्व पाकिस्तानी लष्कराने बांगलादेशसमोर बिनशर्त आत्मसमर्पण केले आहे. यापुढे ढाका ही स्वतंत्र देशाची स्वतंत्र राजधानी आहे.'
ज्या व्यक्तीने इंदिरा गांधींना फोन केला होता, ते होते भारतीय सैन्याची कमान सांभाळणारे जनरल सॅम माणेकशॉ. तेच माणेकशॉ, ज्यांनी इंदिरा गांधींना म्हटले होते की, 'अमेरिकेने अण्वस्त्र हल्ला केला तरच मी काहीही करू शकणार नाही, अन्यथा युद्ध तर आपणच जिंकू.' या युद्धात भारताच्या मदतीने एक नवी लोकशाही उदयास आली आणि जगाच्या नकाशावर एक नवा देश निर्माण झाला - बांगलादेश.
आज या घटनेला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या 90 हजार सैनिकांच्या आत्मसमर्पणाची रंजक कहाणी सांगत आहोत.
चला अगदी सुरुवातीपासून पाहूया. 1947 मध्ये भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. आता परिस्थिती अशी होती की पश्चिम पाकिस्तान संसाधने आणि सरकारच्या बाबतीत खूपच समृद्ध होता. दोन्ही भागांची भाषाही वेगळी होती. राजकीय नेतृत्वाच्या दृष्टीकोनातूनही पूर्व पाकिस्तानला वेगळे पडल्यासारखेच वाटायचे. हळूहळू पूर्व पाकिस्तानमध्ये ही नाराजी वाढत गेली आणि नंतर शेख मुजीब-उर-रहमान यांनी अवामी लीग नावाचा पक्ष स्थापन केला आणि पूर्व पाकिस्तानमध्ये स्वायत्ततेची मागणी केली.
1970 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाने पूर्व भागात मोठा विजय मिळवला. त्यांच्या पक्षाचे संसदेत बहुमत होते पण त्यांना पंतप्रधान बनवण्याऐवजी पाकिस्तानच्या विद्यमान सरकारने त्यांना तुरुंगात टाकले. या घटनेमुळे आणि अनेक वर्षांच्या असंतोषामुळे गृहयुद्ध सुरू झाले. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांनी जनरल टिक्का सिंग यांना तिथे पाठवले पण त्यांच्या नेतृत्वात हे प्रकरण आणखीनच चिघळले. मार्च 1971 मध्ये भयंकर नरसंहार झाला. लष्कराच्या अत्याचारामुळे स्थानिक लोक संतप्त झाले आणि त्यांनी बांगलादेश मुक्ती वाहिनी नावाची स्वतःची सेना स्थापन केली. पाकिस्तानात गृहयुद्ध सुरू झाले. इथे पाकिस्तानने आणखी एक चूक केली. आपल्या घरातील या लढाईत पाकिस्तानने भारतावरही हल्ला चढवला.
3 डिसेंबरची संध्याकाळ होती. पाकिस्तानने अचानक भारतातील अर्धा डझनहून अधिक विमानतळांवर बॉम्बहल्ला सुरू केला. मग काय, भारतीय लष्करानेही एकाच वेळी दोन्ही बाजूंनी हल्ला केला. प्रथम कराचीचा नौदलाचा तळ उडवला आणि बांगलादेशात प्रवेश केला.
युद्ध झाले आणि पाकिस्तानने याची कल्पनाही केली नव्हती की, भारतीय सैनिक 15 डिसेंबरपर्यंत म्हणजे केवळ 13 दिवसांतच बांगलादेशची राजधानी ढाका गाठतील. तथापि, भारतीय सैनिकांची तुकडी ढाक्याजवळ पोहोचली तेव्हा त्यात फक्त 3 हजार सैनिक होते. त्याचवेळी ढाक्याभोवती उभ्या असलेल्या पाकिस्तानी सैनिकांची संख्या 26 हजार 400 होती. व्यावहारिकदृष्ट्या पाहता परिस्थिती थोडी चिंताजनक होती, परंतु लष्कराच्या हुशारीमुळे विजय शक्य झाला. त्याचं झालं असं की, दिल्लीतून प्रसिद्ध झालेल्या पॅराड्रॉपच्या एका फोटोने सारा खेळच पलटला.
काय आहे नकली पॅराशूटची कहाणी
भारतीय सैन्य गाव-खेड्यांमधून ढाक्याकडे जात होते. 7 डिसेंबर रोजी बांगलादेशातील जेसोर आणि सियालहाट हे दोन भाग पाकिस्तानी सैन्यापासून मुक्त करण्यात आले. त्यावेळी भारताच्या सैनिकांची संख्या पाकिस्तानच्या तुलनेत कमी होती. लष्कर पुढे सरकल्यावर पाकिस्तानी लष्कराने ढाक्यातून मोर्चा उघडण्याची तयारी सुरू केली. याच दरम्यान, एका जुन्या फोटोच्या चुकीच्या वापरामुळे भारतासाठी मदतीचा मार्ग खुला झाला.
वास्तविक त्यावेळी भारताच्या मदतीसाठी कोलकाता येथून काही सैनिकांना पॅराड्रॉप करण्यात आले होते. पॅराड्रॉप म्हणजे पॅराशूटच्या साहाय्याने लष्कराचे जवान आणि युद्ध साहित्य उतरवणे. त्यामुळे भारतीय सैनिक आणि शस्त्रे बांगलादेशात उतरत होती. दरम्यान, गोंधळ निर्माण करण्यासाठी डमी पॅराशूटही उतरवण्यात आले. युद्धात अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या लक्षात येणे निश्चितच होते. जगभरातील माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्या की, भारताने ढाक्यावर ताबा मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने सैनिक पॅराड्रॉप केले.
वास्तव हे होते की, पॅराड्रॉप दरम्यानचा कोणताही फोटोच नव्हता. प्रकाशित केलेला फोटो भारतीय हवाई दलाच्या प्रेसची जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीने जारी केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा फोटो एका वर्षापूर्वी झालेल्या कोणत्या तरी सरावादरम्यान काढण्यात आला होता. भारताने सैन्य उतरवल्याची भीती पाकिस्तानच्या हायकमांडच्या मनात बसली. या फोटोचा उल्लेख पाकिस्तानच्या जनरल नियाझींनी युद्धानंतरही केला होता.
भारतासमोर पाकिस्तानच्या 90 हजार सैनिकांच्या आत्मसमर्पणाचा दिवस...
16 डिसेंबर 1971. सकाळचे 9.15. जनरल जेकब यांना दिल्लीहून जनरल माणेकशॉ यांचा संदेश मिळाला. शरणागतीची तयारी करण्यासाठी ढाका येथे जाण्याचा हा संदेश होता. 16 च्या दुपारपर्यंत मेजर जनरल जेकब आत्मसमर्पण कराराचा मसुदा घेऊन ढाकाला पोहोचले. विमानतळावर संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जेकब पुढे गेले.
पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल नियाझी यांच्यासमोर जेकब पोहोचले तेव्हा नियाझी काही अधिकाऱ्यांसोबत सोफ्यावर बसले होता आणि अश्लील विनोदांवर तिथे हशा पिकला होता. जनरल जेकब यांनी दाखल होताच वातावरण त्यांच्या बाजूने केले. तिथे बसलेले आणखी एक भारतीय मेजर जनरल नागरांना निर्देश देत ते म्हणाले की, त्यांनी आणखी एक टेबल आणि दोन खुर्च्यांची व्यवस्था करावी.आता आत्मसमर्पण करण्याची वेळ आली आहे. जनरल जेकब यांनी नियाझींसमोर आत्मसमर्पण कराराचे वाचन केले.
हे ऐकून जनरल नियाझी म्हणाले, 'मी शरणागती पत्करत आहे, असे कोण म्हणाले? तुम्ही फक्त युद्धविराम आणि सैन्य माघारीच्या अटींबद्दल बोलण्यासाठी इथे आला आहात.'
यानंतर जनरल जेकब नियाझींना बाजूला घेऊन गेले आणि समजावले की, 'तुम्ही आत्मसमर्पण केले नाही, तर तुमच्या कुटुंबीयांच्या रक्षणाची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. फक्त शस्त्र टाकल्यानंतरच मी खात्री देऊ शकेन की त्यांना कसलेही नुकसान होणार नाही. मी 30 मिनिटांचा वेळ देत आहे. जर तुम्ही सहमत नसाल तर मी ढाक्यावर बॉम्बहल्ल्याचा आदेश देईन.'
मनात तणाव, पण चेहऱ्यावर साधे भाव
'अॅन ओडिसी इन वॉर अँड पीस' या आत्मचरित्रात जनरल जेकब यांनी लिहिले आहे की, नियाझींशी बोलल्यानंतर ते बाहेर आले आणि सिगार ओढू लागले. ते म्हणतात, 'मी तणावात होतो, मात्र पाकिस्तानच्या हुमुदुर्रहमान आयोगाने आपल्या अहवालात लिहिले की, जनरल जेकब पाइप ओढत चालत होते.'
30 मिनिटे बाहेर घालवल्यानंतर जनरल जेकब खोलीत आले तेव्हा कागदपत्र टेबलावर पडलेले होते. त्यांनी नियाझींना विचारले की ते हे स्वीकारतात का? सलग तीन वेळा विचारल्यानंतर जेकब यांनी कागद हवेत फिरवला आणि म्हणाले की, 'तुमचे मौन म्हणजेच तुमचा याला होकार असल्याचे मी गृहित धरत आहे.' यानंतर नियाझींच्या डोळ्यांत अश्रू आले.
जेकब यांनी नियाझींना पुन्हा बाजूला नेत म्हटले की, आत्मसमर्पण सोहळा रेसकोर्सवर सामान्य लोकांसमोर होईल. यासाठीही ते असहमत होते आणि नंतर तयार झाले. यानंतर तिथे लंच करून सायंकाळी 4 वाजता नियाझींसह जेकब, जनरल अरोरांना रिसीव्ह करण्यासाठी ढाका विमानतळावर पोहोचले.
93 हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले
रेसकोर्सच्या मैदानात अरोरा यांनी प्रथम गार्ड ऑफ ऑनर घेतला. त्यानंतर अरोरा आणि नियाझी टेबलावर बसले आणि आत्मसमर्पण कागदपत्रांच्या 5 प्रतींवर स्वाक्षऱ्या केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नियाजींकडे पेनही नव्हता. एका भारतीय अधिकाऱ्याने त्यांना आपला पेन दिला. नियाझी यांनी स्वाक्षरी केली. गणवेशावरील बिल्ला काढून आपले रिव्हॉल्व्हर काढून जनरल अरोरा यांच्याकडे दिले.
15 मिनिटांत हा सोहळा संपला. यासह पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली. त्यावेळी घड्याळात 4:55 वाजले होते. यानंतर जनरल अरोरा यांनी माहिती पाठवली आणि माणेकशॉ यांनी देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माहिती दिली. हा त्याच 'विजय दिना'चा संदेश होता जो इंदिरा गांधींना मुलाखतीच्या मध्येच मिळाला होता, ज्याचा उल्लेख आपण कथेच्या सुरुवातीलाच केला होता.
युद्ध सुरू असताना पाकिस्तानचे राष्ट्रपती दारूच्या नशेत असायचे
पाकिस्तानच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे देशातील स्वतःची राजकीय परिस्थिती. पंतप्रधानांचे राष्ट्रपतींसोबत पटत नव्हते. तर राष्ट्रपतींचे युद्धात गेलेल्या जनरल्सशी पटत नव्हते. राष्ट्रपती याह्या खान यांची अवस्था अशी होती की ते रात्री 8 नंतर दारूच्या नशेत असायचे. ते इतके बदनाम होते की, सैनिक कमांडर्सना हे निर्देश होते की रात्री 10 वाजल्यानंतर त्यांच्या कोणत्याही तोंडी आदेशाचे पालन केले जाऊ नये.
दरम्यान, पाकिस्तानने युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की तो विजयासाठी चीन आणि अमेरिकेवर अवलंबून झाला. जेव्हा चीननेही साथ सोडली तेव्हा राष्ट्रपती याह्या खान यांनी प्लॅन दिला की, 'पूर्वेचे संरक्षण पश्चिम करेल'. काय झालं?
13 डिसेंबर रोजी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा राष्ट्रपती याह्या खान यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना फोन केला. निक्सन मीटिंगमध्ये असल्याने बोलू शकले नाही. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या युद्धाबद्दलच्या चिंतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की निक्सन यांनी पहाटे 2 वाजता परत कॉल केला तेव्हा याह्या खान गाढ झोपेत होते. जेव्हा त्यांना उठवण्यात आले तेव्हा गाढ झोपेत असल्याने त्यांनी आपले एडीसी अर्शद सामी खान यांनाही लाईनवर राहण्यास सांगितले.
निक्सन म्हणाले की त्यांना पाकिस्तानची चिंता आहे आणि ते बंगालच्या उपसागरात सातवी फ्लीट पाठवत आहेत. अर्शद सामी खानने आपल्या एका पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'याह्यांनी मला जनरल हमीद यांना फोन करायला सांगितले. हमीद यांच्याशी बोलताना याह्या ओरडतच म्हणाले, 'आपण करून दाखवले आहे, अमेरिकेचे सैन्य येत आहे.'
पाकिस्तानला पराभव पचवता आला नाही
अमेरिकेतून येणारे सैनिक आणि सातवा ताफा निघाला, मात्र ढाका विजयाच्या दिवसापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळेच पाकिस्तानला आपला पराभव पचवता येत नव्हता. पाकिस्तानच्या हायकमांडने ही गोष्ट आपल्या लोकांपासून शेवटच्या क्षणापर्यंत लपवून ठेवली की ते युद्ध हरले आहेत. जेव्हा राष्ट्रपती याह्या खान पराभवाची माहिती देण्यासाठी रेडिओवर आले तेव्हा ते म्हणाले, "या क्षणी या मोठ्या युद्धात माघार घेतल्याचा अर्थ असा नाही की लढाई संपली आहे, भारताशी लढाई सुरूच राहील आणि अंतिम विजय आमचाच असेल."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.