आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत 'INS विक्रांत'हून 45% मोठी युद्धनौका बांधणार:65 हजार टनी 'INS विशाल'वर एकाचवेळी तैनात राहणार 55 फायटर प्लेन

अभिषेक पांडेएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

INS विक्रांतचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाल्यानंतर आता भारताच्या INS विशाल या तिसऱ्या युद्धनौकेची चर्चा सुरू झाली आहे. स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतचे 2 सप्टेबर रोजी देशार्पण झाले. पण सध्या हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या कुरापती वाढल्या आहेत. त्यामुळे या कुरापतींचा निपटारा करण्यासाठी भारताला तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची नितांत गरज भासत आहे.

त्यामुळे आजच्या एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेऊया की, देशातील तिसरी विमानवाहू युद्धनौका INS विशालचा प्रकल्प काय आहे? तो कधी पूर्ण होणार? व त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? याची सविस्तर माहिती...

काय आहे INS विशाल?

INS विशाल भारताची तिसरी विमानवाहू युद्धनौका असेल. विशाल या शब्दाचा अर्थ भव्य असा होतो. ही INS विक्रांतनंतरची भारताची दुसरी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका असेल. तिची ती विक्रांतसारखीच भारतीय नौदलाच्या कोची शिपयार्ड लिमिटेडमध्ये बांधणी केली जाईल.

INS विशाल 65 हजार टन वजनी असण्याची शक्यता आहे. म्हणजे ही विमानवाहू युद्धनौका भारताची सर्वात मोठी युद्धनौका असेल. आयएनएस विक्रमादित्य व विक्रांतचे वजन 45 हजार टनांच्या आसपास आहे. आयएनएस विशालवर 55 फायटर प्लेन तैनात असतील, असे सांगण्यात येते. याऊलट आयएनएस विक्रांतवर 30 च्या आसपास फायटर प्लेन तैनात राहण्याची शक्यता आहे.

सध्या भारताकडे आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विक्रांत या दोन युद्धनौका आहेत. 2 सप्टेबरला नौदलात सहभागी झालेली INS विक्रांत देशाची पहिली स्वदेशी व सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आहे.

विक्रांतपूर्वी भारताकडे आयएनएस विक्रमादित्यच्या रुपात एकमेव विमानवाहू युद्धनौका होती. विक्रमादित्यची बांधणी रशियन प्लॅटफॉर्मवर करण्यात आली होती.

काय आहे INS विशाल प्रोजेक्ट?

 • मे 2012 मध्ये नौदल प्रमुख अॅडमिरल निर्मल वर्मा म्हणाले होते की, देशात दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची बांधणी करण्यासंबंधी अभ्यास सुरू आहे.
 • 2012 मध्येच INS विशालच्या डिझाईन स्टेजचे काम नौदलाच्या नेव्हल डिझाईन ब्युरोने सुरू केले होते.
 • सुरुवातीला नौदलाची डिझाइनिंगसाठी कोणत्याही देशाची मदत घेण्याची योजना नव्हतीत. पण त्यानंतर यासाठी रशियन विमानांच्या डिझाइनची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • यासंबंधीच्या रिपोर्टनुसार, नौदलाने 2013 मध्ये INS विशालवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टम (EMALS) स्थापित करण्यासाठी यूएस सरकारशी संपर्क साधला.
 • अमेरिकेच्या तत्कालीन ओबामा सरकारने 2015 मध्ये भारताला EMALS व इतर तंत्रज्ञान विक्री करण्याची तयारी दर्शवली होती.
 • 2015 मध्येच नौदलाने INS विशालच्या डिझाइनसाठी ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व रशिया या देशांच्या संरक्षण कंपन्यांशी संपर्क साधला होता. नौदलाने या कंपन्यांकडून युद्धनौकांच्या तांत्रिक व खर्चाशी संबंधित माहिती मागवली होती.
 • ऑगस्ट 2015 साली भारत-अमेरिकेने INS विशालच्या डिझायनिंग व विकासासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना केली.
 • ऑक्टोबर 2017 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी INS विशालसाठी EMALS तंत्रज्ञान भारताला हस्तांतरित करण्याची मान्यता दिली.
 • नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी डिसेंबर 2018 मध्ये INS विशालची योजना पुढे सरकल्याची व पुढील 3 वर्षांत जहाजाची बांधणी सुरू होण्याची माहिती दिली होती.
 • नौदलाने एप्रिल 2021 मध्ये NS विक्रमादित्यच्या जागी INS विशालचा ताफ्यात सावेश करण्याची घोषणा केली.
 • नोव्हेंबर 2021 मध्ये नौदलाने INS विशालच्या डिझाइनमध्ये थोडासा बदल करण्याची चर्चा सुरू केली.
 • यात अनमॅन्ड व मॅन्ड अशा दोन्ही प्रकारच्या विमानांच्या लँडिंगसाठी आयएनएस विशालची रचना व सध्याचा आकार (65 हजार टन) किंचित कमी करण्याचा विचार करण्यात आला. आकार कमी केल्याने युद्धनौकेचे वजन, खर्च व वाहक तयार करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल.
 • एप्रिल 2022 मध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने INS विशालमधील इलेक्ट्रिक सिस्टम संबंधी जनरल इलेक्ट्रिकच्या मालकीची ब्रिटिश व फ्रेंच कंपनी GE पॉवरशी करार केला.
 • INS विशालसंबंधी संरक्षणविषयक स्थायी संसदीय समितीने गतवर्षी डिसेंबरमध्ये, भारतीय द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूंची लांबलचक किनारपट्टी व प्रतिकूल आव्हाने पाहता तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची तातडीने गरज व्यक्त केली होती.
 • या समितीने गत मार्च महिन्यात लोकसभेत मांडलेल्या आणखी एका अहवालात नौदलाच्या योजनांचे स्पष्टीकरण देताना 'स्वदेशी विमानवाहू युद्धनौका-2' चा उल्लेख केला होता. देशाकडे सदैव किमान 3 युद्धनौका असाव्यात. कारण एखाद्याला दुरुस्तीची गरज भासली, तर 2 युद्धनौका नेहमीच सेवेत असतील.

INS विशाल केव्हा तयार होणार?

INS विशालची चर्चा जवळपास एका दशकापूर्वी सुरू झाली होती. प्रारंभी ती 2020 पर्यंत नौदलात समाविष्ट होण्याची अपेक्षा होती. पण अनेक कारणांमुळे या महत्वकांक्षी प्रकल्पाला विलंब झाला.

2018 मध्ये नौदलाने या युद्धनौकेची 2021 प्रर्यंत बांधणी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आता ती 2030 पर्यंत नौदलाच्या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

भारताला का भासली INS विशालची गरज?

भारताली सागरी सुरक्षेसाठी एअरक्राफ्ट कॅरिअर्सची नितांत गरज आहे. गत काही वर्षांत भारतालगतच्या सागरी क्षेत्रात विशेषतः हिंदी महासागरात चीनचा वावर वाढला आहे. त्यामुळे भारतासाठी विमानावाहू युद्धनौकेचे महत्व फार वाढले आहे.

आतापर्यंत चीनकडे लिओनिंग व शेडोंग नामक 2 विमानवाहू युद्धनौका होत्या. पण गत जून महिन्यात चीनच्या ताफ्यात फुजिआन ही तिसरी विमानवाहू युद्धनौका समाविष्ट झाली. फुजिआन ही चीन निर्मित CATOBER तंत्रज्ञानाने सुसज्ज चीनची पहिली स्वदेशी युद्धनौका आहे.

INS विक्रांत व विक्रमादित्यहून वेगळी असेल विशाल?

आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विक्रांत या पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या 2 विमानवाहू युद्धनौकांच्या तुलनेत INS विशालवरील विमानांच्या लॉन्च पॅडमध्ये मोठा फरक असेल. विक्रमादित्य व विक्रांतचे डेक थोडेसे वर उठलेले आहेत. याऊलट INS विशालचा डेक सपाट असेल. आयएनएस विशालमध्ये प्लेनचे टेक ऑफ व लँडिंगसाठी CATOBER प्रक्षेपण प्रणाली वापरली जाईल. तर विक्रांत व विक्रमादित्यमध्ये विमानाच्या टेकऑफ - लँडिंगसाठी STOBAR लॉन्च प्रणाली वापरली जाते. कोणत्याही विमानवाहू युद्धनौकेचा रनवे सामान्य विमानतळाच्या धावपट्टीपेक्षा खूपच लहान असते. त्यामुळे युद्धनौकेतून विमानाच्या टेक-ऑफसाठी 2 प्रकारचे डेक तयार केले जातात:

एक स्की जंप व दोन कॅटापुल्ट

स्की जंप टेक-ऑफ: विक्रमादित्य असो की विक्रांत, या दोन्ही युद्धनौकांचा डेक पुढच्या दिशेने किंचित वर उठलेला आहे. तो जवळपास 12-14 डिग्री उठलेला आहे.

रनवेचा हा उठाव (लिफ्ट) लढाऊ विमानांना आखूड धावपट्टीवरून वरच्या दिशेने उड्डाण करण्यास धक्का देते. अशा छोट्या धावपट्टीवरून टेक ऑफला स्की-जंप टेक-ऑफ म्हणतात. या प्रणालीला STOBAR म्हणजेच 'शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी' प्रणाली व या टेक ऑफला शॉर्ट- टेक ऑफ म्हणतात.

या टेक्निकने विमान उड्डाण करू शकते. पण जास्त वजनदार व जड-शस्त्र विमानांना या पद्धतीने उड्डाण करता येत नाही. या प्रणालीमध्ये विमानांच्या उड्डाणाची वारंवारता कमी असते.

कॅटापुल्ट टेक-ऑफ: सपाट डेकवरील विमानांच्या टेक-ऑफला कॅटापुल्ट टेक-ऑफ म्हणतात. यात कॅटपुल्ट म्हणजेच जहाजातून टेक-ऑफ करण्यासाठी गुलेरासारख्या टेक्निकचा वापर करून पुश केले जाते.

या टेक्निद्वारे प्लेनला एखाद्या गुलेरासारख्या सिस्टमच्या माध्यमातून लॉन्चिंगसाठी आवश्यक ऊर्जा दिली जाते. याला CATOBER म्हणजे 'कॅटापुल्ट असिस्टेड टेक-ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी' सिस्टम म्हटले जाते.

कॅटापुल्ट टेक-ऑफ प्रणाली बहुतांश अमेरिकन युद्धनौकांमध्ये वापरली जाते. हीच यंत्रणा आयएनएस विशालमध्ये वापरण्यात येणार आहे.

युद्धनौकांवर कशी होते विमानांची लँडिंग?

विमानाच्या डेकवर उतरण्यासाठी एक विशेष तंत्र वापरले जाते. यात जहाजाच्या डेकला मजबूत तारा व हुक जोडलेले असतात.

लढाऊ विमानांना लँडिंगच्या वेळी त्यांचे हुक वायरमधील एका हुकमध्ये अडकवावे लागते. यामुळे तारा खेचल्या जातात व विमान थांबते. याला 'अॅरेस्टेड रिकव्हरी' प्रणाली म्हणतात.

भारतासह जगातील सर्व युद्धनौकांवर विमानाच्या लँडिंगसाठी हे तंत्र वापरले जाते.

INS विशालमध्ये इलेक्ट्रिक गुलेराने होईल प्लेनचे टेकऑफ

यापूर्वी आयएनएस विशालमध्ये कॅटोबार प्रणालीच्या वापरासाठी अणुऊर्जा वापरण्याची चर्चा होती. पण आता खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेट तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी भारताने अमेरिकेकडून एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम म्हणजेच EMALS तंत्रज्ञानाची खरेदी केली आहे.

ग्राफिक्समध्ये जाणून घेऊया आयएनएस विक्रांतची माहिती...

बातम्या आणखी आहेत...