आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दोघांना सोबत घेऊन उद्योगाचे बीज पेरले, 40 वर्षांत उभारल्या पाच कंपन्या; शेती, शेतकरी स्वयंपूर्ण करण्यासाठी नाथ समूहाची स्थापना, आता देशभरात विस्तार

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘नाथ बायो-जीन्स’ कंपनीचा फोर्ब्ज यादीत समावेश

सत्तरीच्या उत्तरार्धात देशात अन्नधान्याची भीषण टंचाई होती. मुंबईत पीएल-४० चे जहाज धान्य घेऊन आले तरच लोकांच्या तोंडात अन्नाचा दाणा जात होता. भारतासारख्या विशाल देशासाठी ही परिस्थिती चांगली नव्हती. ती बदलण्यासाठी, शेती आणि शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात काही करावे, या उद्देशाने ४० वर्षांपूर्वी नाथ उद्योग समूहाचे बीज लावले आणि आज त्याचा खऱ्या अर्थाने वटवृक्ष झाला आहे. या समूहाच्या ५ कंपन्यांत आज २५०० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्या जोरावरच नाथ बायो-जीन्स कंपनीचा ‘फोर्ब्ज एशियाज २००- बेस्ट अंडर अ बिलियन २०२०’ च्या यादीत (सुमारे ७ हजार २०० कोटींची उलाढाल) समावेश झाला आहे. कवी ज्ञानेश्वर शिंदे यांच्या ‘अंकुरता रे बियाणे ... मनी आनंद दाटतो, साद घालतो स्वप्नाला … स्वप्न उद्याचे थाटतो’ ओळीप्रमाणे सुरू असलेला नाथ समूहाचे संस्थापक चेअरमन नंदकिशोर कागलीवाल यांचा प्रवास त्यांच्याच शब्दांत...

अमेरिकेत मॅनेजमेंटमध्ये एमएस केल्यावर आपल्या भागात काम करण्याची इच्छा होती. त्या काळातील परिस्थिती पाहून बी-बियाण्यांच्या क्षे़त्रात उतरण्याचा निर्णय घेतला. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. एकनाथ महाराजांनी समता, सहिष्णुता आणि एकात्मतेसाठी मोठे कार्य केले. आमच्या पेपरमिल आणि संशोधन केंद्राची सुरुवात पैठणमधील आहे. नाथ महाराज प्रेरणास्थान असून त्यांच्याबाबतचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावावरून १९७९ मध्ये नाथ समूहाची स्थापना केली.

या क्षेत्रात संशोधनासाठी पैठण आणि हैदराबादेत जागतिक पातळीवरील संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आहेत. पैठणमध्ये नाथ पेपर मील तर वापी येथे रामा पेपर मील आहे. उद्योग क्षेत्रासाठी लागणाऱ्या रसायनांच्या उत्पादनाचा वापी येथे प्रकल्प आहे. अलिकडेच पैठण येथे मेगाफुड पार्क सुरू करण्यात आला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवलेल्या नाथ व्हॅली शाळेचे संचालन आमचा समूह करतो.

मेळघाटसाठी सूचना मान्य :

राज्य नियोजन आयोगाच्या कृषि धोरण ठरवणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. मेळघाटातील कुपोषणाची समस्या मला कायम व्यथीत करते. ही समस्या सोडवण्यासाठी मी काही सूचना प्रकर्षाने मांडल्या. त्या समितीने मान्य केल्या. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या अध्यक्षपदावर असतांना राज्याचे व्हिजन स्टेटमेंट तयार केले. त्यात उद्योगांसाठीच्या शिफारसी राज्याने स्विकारल्या, याचे समाधान वाटते

सामाजिक कार्यात अग्रेसर :

उद्योग क्षेत्रासोबतच नाथ समूह सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही अग्रेसर आहे. समूहाचे शिक्षण, आरोग्य, ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य आहे. २०१४ पासून औरंगाबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलचे तसेच बी. रघुनाथ स्मृती संध्येचे आयोजन केले जाते.

अनेक नाथ समूह तयार व्हावेत :

मराठवाड्यात उद्योग क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. नवनवीन उद्योजक तयार होत आहेत. ही आता संतांच्या भूमीपेक्षा कल्पक, नाविण्याचा ध्यास घेतलेल्या उद्योजकांची भूमी ठरत आहे. आमच्या यशातून प्रेरणा घेत असे अनेक नाथ समूह तयार व्हावेत, हीच याप्रसंगी अपेक्षा वाटते.

त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो :

फोर्ब्सच्या यादीत समावेश होणे हे माझ्या एकट्याचे यश नाही. संपूर्ण नाथ समूह, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कागलीवाल, जागतिक पातळीवर नावाजलेले शास्त्रज्ञ आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या योगदानाचे हे यश आहे. त्यांचे कष्ट, निष्ठा यामुळेच मला इथपर्यंत पोहचता आले. मराठवाड्यातील एका कंपनीला हा बहुमान मिळालाय, हे अधिक महत्त्वाचे वाटते.

पुरस्कारासाठी अर्ज न करण्याचे समाधान :

उत्कृष्ट उत्पादने आणि दर्जासाठी नाथ समूहाला सलग तीन वर्षे केंद्र शासनाचे राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार मिळाले. कंपनी हा दर्जा कायम राखून आहे. चौथ्यांदा कंपनी यासाठी अर्ज करण्याच्या तयारीत असताना, आता अर्ज करू नका, असे आम्हाला विनम्रपणे सांगण्यात आले. हा नकार असला तरी आमच्या कामाची पावतीच होती. ती मान्य केली.

५ कंपन्या, २५०० कर्मचारी :

एका कंपनीपासून सुरू झालेला आमचा प्रवास आता ५ कंपन्यांवर पोहोचला आहे. नाथ सीड्स देशभरातील १० हजार बी-उत्पादक शेतकऱ्यांच्या २५ हजार एकरवर वेगवेगळ्या बियाण्यांची लागवड करते. ही बियाणे ५० लाख ऐकर शेतात पेरली जातात.

अंडर बिलीयनचे टप्पे

> १९७९ : नाथ सीड्स लिमीटेडची पार्टनरशीप फर्म म्हणून सुरूवात

> १९८० : प्रायव्हेट लिमिटेड कंपनी

> १९८७ : पब्लिक लिमिटेड कंपनी

> १९९५ : देशात पहिल्यांदा हायब्रीड तांदूळाचे उत्पादन

> १९९७ : आयएसओ ९००१ मानांकन मिळवणारी आशियातील पहिली बियाणे कंपनी

> १९९८ : हायब्रीड कापसाचे वाण काशीनाथची निर्मिती

> १९९९ : मुंबई, अहमदाबाद स्टॉक एक्चेंज आणि एनएसईमध्ये कंपनीची नोंद

> २०२० : फोर्ब्सच्या “अंडर अ बिलीयन’ यादीत समावेश

बातम्या आणखी आहेत...