आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हातावर पोट असलेल्या या महिलांच्या वाट्यालाही ८० दिवस उपासमारी आली होती. पण त्यांना खचून न जाता प्रशासनासोबत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांच्या संघर्षानंतर ८० दिवस बंद असलेले कारखाने १६ जूनला सुरू झाले. त्यानंतर आठवड्याची मजुरी घेऊन चंद्रकला नुकतीच माहेरी गेली. आईच्या कुशीत बाळाला देऊन तिने हुश्श केले. साेबत आणलेले पान-तंबाखू काढून चटाचट विड्या वळत २७ वर्षीय चंदू बाेलत हाेती. ‘बाप रे, काम नसल्याने जीव अक्षरश: गुदमरत हाेता. शास्त्रीनगर परिसरात दरराेज काेराेनाचे रुग्ण सापडत हाेते. एेकून एेकून कान किटले. परंतु मला त्याची भीती नव्हती. माझी झाेप उडाली ती फक्त पाेटाच्या विवंचनेने....’
विडी कामगार महिलांनी लाॅकडाऊनचे सर्वाधिक चटके सोसले. सोलापूर, अहमदनगर, पुण्यातील विडी कामगारांच्या दाटीच्या वस्त्या कोरोनाचं माहेरघर बनल्या. गल्ली - गल्ली सील झाली. सर्दी- खोकल्याच्या उपचारांसाठी गेलेले घरी परतेच नाहीच. अशा वातावरणात विडी कामगार महिलांची झोप उडाली होती. कारखाने बंद झालेले. हे आणखी किती दिवस चालणार याची कल्पना नाही. कोेराेना दूरच, उपाशी राहून मरू या भीतीनं त्यांना घेरलं. ७० दिवस सरले. मे महिन्याच्या अखेरीस लाॅकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला. जालना, सिन्नर, संगमनेर आणि पुणे येथे विडी कारखानेही सुरू झाले. परंतु सोलापुरातील कारखाने सुरू करण्यासाठी प्रशासनाने जाचक अटी घातल्या. पहिली अट हाेती, कारखाने न उघडता, कामगारांच्या घरी जाऊन काम द्या. ७० हजार कामगारांच्या घरी जायचे कसे? याचे उत्तर नसल्याने कारखानदारांनी त्याला प्रतिसाद दिला पहिला आदेश रद्द करून नाही. दुसरा निघाला, वयाची चाळिशी आेलांडलेल्या महिलांना काम मिळणार नाही. ताेही हास्यास्पद ठरला. त्यानंतर तिसरा आदेश आला. त्यात गराेदर मातांना वगळून काम द्यावे, असे म्हटले. ताे सर्वमान्य ठरला. परंतु त्यासाठी तीनवेळा आदेश काढण्याची वेळ आली, ती साेलापूरसाठी नवख्या असलेल्या अधिकाऱ्यामुळे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर नुकतेच साेलापूरला बदलून आले हाेते. त्यांनी वस्तुस्थिती जाणून न घेता, हे आदेश काढले. त्या रद्द करण्यासाठी कामगार संघटनांना मात्र झंुजावे लागले. अर्थातच राेजगारासाठी कामगारांना लढा द्यावा लागला.
‘काम सुरू झाले आता दाेन वेळचे जेवण सुखाने खाऊ.’
काेराेना संसर्गापासून बचावात्मक उपाय करत १६ जूनपासून विडी कारखाने पूर्ववत झाले. मास्क लावून कामगारांनी कारखान्यांच्या बाहेर रांगा लावल्या. त्यांच्या हाती सॅनिटायझरचे थेंब देऊन स्वागत करण्यात आले. त्यांचा ताप तपासण्यात आला. पल्स आॅक्सिमीटरने श्वसनक्रियाही तपासली गेली. त्यानंतरच त्यांच्या हाती काम मिळाले. पान-तंबाखू घेऊन बाहेर पडणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद जणू पाेटासाठी माेठी लढाई जिंकल्याचे सांगत हाेता. काही कारखान्यांमध्ये तर हार घालून स्वागत झाले, त्यानंतर प्रतिक्रिया देताना या महिला म्हणाल्या, ‘जीवात जीव आला.’ दुसरी म्हणाली, ‘आता दाेन वेळचे जेवण सुखाने खाऊ.’ तिसरी म्हणतेय, ‘आता काेराेना जाणार...’ कसे? याचे उत्तर देताना म्हणाल्या, ‘‘खा, बसा, झाेपा, उठा आणि चिंता करा, यामुळेच तब्येत बिघडलेली हाेती. हाती काम मिळाले की कसलं राेग अन् कसली काेराेना...?’’ हे बाेल मात्र मास्कमधूनच हाेते, हे विशेष.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.