आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:हवाई हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टीन समोरासमोर, ताज्या वादाचे कारण काय? जेरूसलेममध्ये का होतोय 100 वर्षांपासून संघर्ष? जाणून घ्या याबद्दल सविस्तर

आबिद खानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा संपूर्ण वाद काय आहे आणि सध्या हे प्रकरण का चर्चेत आहे, ते जाणून घेऊयात..

इस्रायल आणि पॅलेस्टीनमधील तणाव वाढला असून येथे युद्ध सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूने सातत्याने रॉकेट हल्ले सुरू आहेत. इस्रायलने मंगळवारी गाझा पट्टीवर हवाई हल्ला करत दोन इमारती उद्धवस्त केल्या. या इमारतींमध्ये अतिरेकी लपले असल्याची शंका इस्रायलला होती. तर, इस्रायलने केलेल्या कारवाईला उत्तर देत पॅलेस्टीनमधील हमास आणि अन्य सशस्त्र गटाने केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलयमध्ये असलेल्या एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

गाझा पट्टीतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या हल्ल्यात 10 लहान मुले आणि एका महिलेसह 28 पॅलेस्टीनी ठार झाले. यातील बहुतेकजण हे हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. तर, जवळपास 16 अतिरेकी ठार झाले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यातील हा संघर्ष बराच जुना आहे. 1948 मध्ये इस्रायलला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अरब देश आणि इस्त्रायल अनेक वेळा समोरासमोर आले आहेत. जेरूसलेम व त्याच्या आसपासच्या भागात पॅलेस्टीन निदर्शक आणि इस्रायली पोलिस यांच्यात कायम चकमक सुरू असते.

हा संपूर्ण वाद काय आहे आणि सध्या हे प्रकरण का चर्चेत आहे, ते जाणून घेऊयात..

ताज्या वादाचे कारण काय?
या वादाचे ताजे कारण म्हणजे इस्राइलच्या सेंट्रल कोर्टाने पूर्ण जेरुसलेममध्ये राहणा-या पॅलेस्टीनी कुटुंबाना शेख जर्रा परिसरातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. कोर्टाने उजव्या विचारसणींच्या इस्रायलींना या सर्व ठिकाणी स्थायिक होण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायली सुप्रीम कोर्ट गुरुवारी या प्रकरणी निर्णय देणार होता. मात्र हिंसक संघर्ष सुरु झाल्याने सुनावणी 10 मे पर्यंत टाळण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने जर इस्रायली जनतेच्या बाजूने निर्णय दिला तर पॅलेस्टीनी लोकांना आपली घरे सोडावी लागतील. याचा पॅलेस्टीनी लोक विरोध करीत आहेत.

मागील शुक्रवार हा रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार होता. यानिमित्ताने जेरुसलेम येथील अल अक्सा मशिदीत मोठ्या संख्येने मुस्लिम नमाजसाठी एकत्र आले होते. नमाजनंतर या लोकांनी शेख जर्राहमधून बेदखल केल्याच्या विरोधात येथे निदर्शने केली. तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली पोलिसांनी बॅरियर लावले. पॅलेस्टीनींनी इस्रायली पोलिसांच्या या कृतीवर आक्षेप घेत त्यांच्या अधिकारांवर गदा आणली गेली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी बॅरियर काढून टाकले, मात्र परिस्थिती चिघळण्यमागेच हे एक प्रमुख कारण ठरले आहे.

वादाचे आणखी एक कारण जेरुसलेम-दिवस हेदेखील असल्याचे सांगितले जाते. खरं तर 'जेरूसलेम दिवस' हा 1967 मध्ये पूर्व जेरुसलेमवर इस्रायलने ताबा मिळवला होता, त्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यावर्षी 10 मे रोजी जेरुसलेम दिवस साजरा करण्यात आला.

जेरुसलेम इतका वादग्रस्त का आहे?
जेरुसलेम हे मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू लोकांचे श्रद्धास्थान आहे. येथे अल-अक्सा मशीद आहे. मुस्लिमांचा असा विश्वास आहे की, पैगंबर मोहम्मद मक्का येथूनच आले होते. या मशिदीजवळ 'डोम ऑफ रॉक' देखील आहे. मुस्लिमांच्या मते, पैगंबर मोहम्मद यांनी येथूनच स्वर्गाची यात्रा केली होता. मुस्लिम बांधव मक्का आणि मदीना नंतर याला तिसरे सर्वात पवित्र स्थान मानतात.

जेरुसलेममध्ये ख्रिश्चनांचे पवित्र 'द चर्च ऑफ द होली सेपल्कर' देखील आहे. जगभरातील ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की, या ठिकाणी येशूला वधस्तंभावर खिळे ठोकून चढवण्यात आले आणि हेच ते ठिकाण आहे, जेथे येशू पुन्हा जिवंत झाले.

जेरुसलेममध्ये एक वेस्टर्न वॉल आहे. ज्यू लोकांच्या मते, येथे एकेकाळी त्यांचे पवित्र मंदिर होते आणि ही भिंत त्याची निशाणी आहे. येथेच त्यांचे पवित्र स्थान म्हणजे 'होली ऑफ होलीज' आहे. ज्यूंचा असा विश्वास आहे की येथेच इब्राहिमने आपला मुलगा इसाकचा बळी दिला होता. येथूनच विश्वाची निर्मिती झाली, असे हे लोक मानतात.

तीन धर्मांच्या पवित्र स्थळांसह जेरुसलेममध्ये वादाची अनेक कारणे आहेत. 1967 च्या युद्धामध्ये विजयानंतर इस्रायलने पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतला. तेव्हापासून इस्रायल या संपूर्ण जागेला आपली राजधानी मानत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाचा इस्रायलवर विश्वास नाही. तर पॅलेस्टीनी लोकांचे म्हणणे आहे की, पॅलेस्टीन स्वतंत्र राष्ट्र बनल्यानंतर हे ठिकाण त्यांची राजधानी असेल.

पॅलेस्टीनची मागणी काय आहे?

पॅलेस्टीन म्हणतो की, इस्रायलने 1967 पूर्वी आंतरराष्ट्रीय सीमेवर परत जावे आणि वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टीन राष्ट्राची स्थापना व्हावी. त्याचबरोबर इस्त्रायलने पूर्व जेरुसलेमकडून आपला दावा सोडावा, कारण पॅलेस्टीनला स्वातंत्र्यानंतर या ठिकाणाला राजधानी बनवायची आहे.

इस्रायलचे काय म्हणणे आहे?
इस्रायलला पॅलेस्टीनच्या मागण्या मान्य नाहीत.. इस्रायल जेरूसलेममधून आपला दावा सोडण्यास तयार नाही. ते म्हणतात की, जेरुसलेम ही त्यांची राजधानी आहे आणि ती इस्रायलचा अविभाज्य भाग आहे.

दोघांमधील वादाची क्षेत्रे कोणती?

  • वेस्ट बँक: वेस्ट बँक इस्रायल आणि जॉर्डन दरम्यान आहे. 1967 च्या युद्धा नंतर इस्रायलने त्यावर कब्जा केला होता. इस्रायल आणि पॅलेस्टीन दोघेही या भागावर आपले वर्चस्व असल्याचे सांगतात.
  • गाझा पट्टी: गाझा पट्टी इस्रायल आणि इजिप्त दरम्यान आहे. सध्या हा भाग हमासने व्यापला आहे. हा एक इस्रायल विरोधी गट आहे. सप्टेंबर 2005 मध्ये, इस्रायलने आपले सैन्य गाझा पट्टीपासून मागे घेतले होते. 2007 मध्ये इस्रायलने या भागावर अनेक निर्बंध लादले.
  • गोलन हाइट्सः राजकीय व रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा प्रदेश सिरियातील पठार आहे. हे 1967 पासून इस्रायलच्या ताब्यात आहे. या भागातील व्यापार्‍याच्या मुद्यावर शांतता चर्चेसाठी अनेक प्रयत्न झाले आहेत, पण त्यात यश आले नाही.

पूर्व जेरुसलेममधील नागरिकत्वाबाबतच्या दुहेरी धोरणामुळेही वाद निर्माण झाला
1967 मध्ये पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतल्यापासून, इस्रायल येथे जन्मलेल्या ज्यू लोकांना इस्रायली नागरिक मानतात, परंतु त्याच भागात जन्मलेल्या पॅलेस्टीनी लोकांना बर्‍याच अटींनी येथे राहण्याची परवानगी आहे. यामध्ये एक अट अशी देखील आहे की, जर ते विशिष्ट कालावधीपेक्षा जास्त काळ जेरुसलेमबाहेर राहिले तर हा अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यात येईल. इस्रायलच्या या धोरणाला बरेच ह्युमन राइट्स ग्रुप भेदभाव धोरण म्हणतात, परंतु इस्रायलने हे आरोप नेहमीच नाकारले आहेत.

तरीही, हा संघर्ष किती जुना आहे?
हा संघर्ष किमान शंभर वर्षांपासून चालू आहे. आताच्या इस्रायलमध्ये एकेकाळी तुर्क साम्राज्य होते, ज्याला ओटोमान साम्राज्य म्हटले जायचे. पहिले महायुद्ध 1914 मध्ये सुरू झाले. या महायुद्धात तुर्कीने मित्र राष्ट्रांविरोधातील देशांना पाठिंबा दिला. मित्र देशांमध्ये ब्रिटनचाही समावेश होता. त्यामुळे तुर्की आणि ब्रिटन समोरासमोर आले. त्यावेळी ब्रिटनने युद्ध जिंकले आणि तुर्क साम्राज्य ब्रिटनच्या ताब्यात आले.

याकाळात जियोनिज्म ही भावना शिगेला आली होती. ही एक राजकीय विचारसरणी होती. ज्याचा उद्देश एक वेगळे आणि स्वतंत्र ज्यू राज्य स्थापन करणे हा होता. यामुळे जगभरातील ज्यू लोक पॅलेस्टीनमध्ये येऊ लागले. 1917 मध्ये ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स बेलफोर यांनी घोषणा केली होती की, ब्रिटन पॅलेस्टीनला ज्युंची जन्मभूमी बनवण्यास कटिबद्ध आहे.

दुसरे महायुद्ध 1945 मध्ये संपले. या युद्धामध्ये ब्रिटनला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आणि तो पुर्वीइतका बळकट देश राहिला नव्हता. दुसरीकडे ज्युंनी पॅलेस्टीनमध्ये येणे सुरु ठेवले होते. आणि इतर देशांनी ज्युंच्या पुनर्वसनासाठी ब्रिटनवर दबाव आणण्यास सुरुवात केली. अखेरीस ब्रिटनने या प्रकरणातून माघार घेतली आणि हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेला, जे 1945 मध्ये स्थापन झाले होते.

29 नोव्हेंबर 1947 रोजी संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टीनचे दोन भाग केले. एक अरब राज्य बनले आणि दुसरा भाग इस्रायल बनला. जेरुसलेमला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय सरकारकडे ठेवले. संयुक्त राष्ट्र संघाचा निर्णय स्वीकारण्यास अरब देशांनी नकार दिला. ते म्हणाले की त्यांना लोकसंख्येनुसार जमीन कमी मिळाली. फाळणीनंतर पॅलेस्टीनला निम्म्याहून कमी जमीन मिळाली तर फाळणीच्या आधी सुमारे 90 % जमीन अरबच्या ताब्यात होती.

यानंतर पुढच्याच वर्षी, इस्रायलने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. अमेरिकेने तातडीने इस्रायलला एक देश म्हणून मान्यता दिली. त्यानंतर अरब देश आणि इस्रायलमध्ये अनेक युद्धे झाली. इस्रायलने प्रत्येक युद्धात अरब देशांचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...