आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरूचा जुना एअरपोर्ट रोड. परिसर- मारतल्ली. हे ते गुप्त ठिकाण आहे जिथे गगनयान मोहिमेसाठी 4 भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यांना खोल पाण्यात तासन्तास प्रशिक्षण दिले जात आहे, जेणेकरून ते शून्य गुरुत्वाकर्षणात जगायला शिकू शकतील.
विशेष प्रकारच्या सिम्युलेटरमध्ये (डमी कॅप्सूल) वेगाने फिरवले जात आहे, जेणेकरून त्यांना अंतराळ यानामध्ये त्रास होऊ नये. दररोज 4 ते 6 तास अत्यंत कठीण व्यायाम करवून घेतला जात आहेत, ज्यामुळे अंतराळात शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहावा. प्रशिक्षण घेणारे चारही टेस्ट पायलट भारतीय हवाई दलातील आहेत.
या मोहिमेशी संबंधित वरिष्ठ शास्त्रज्ञाने आम्हाला प्रशिक्षणाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या, परंतु स्वतःचे नाव न सांगण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांची अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली कारण ते अशा प्रशिक्षणाविषयी आधीच परिचित असतात.
प्रशिक्षणाचे तास निश्चित नसतात, ते दररोजच्या गरजेनुसार बदलतात. रशियात वर्षभर प्रशिक्षण घेतल्यानंतर गेल्या सुमारे 5 महिन्यांपासून बंगळुरूमध्ये प्रशिक्षण सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अंतराळवीरांची नावे उघड करण्यात आलेली नाही.
गेल्या एका आठवड्यात आम्ही गगनयान मोहिमेची सर्व माहिती गोळा केली. बंगळुरूच्या त्या भागात गेलो जिथे अंतराळवीरांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्यासाठी अभ्यासक्रम तयार करणाऱ्या तज्ज्ञांशी आणि इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांशी बोललो. बंगळुरूचा हा खास ग्राउंड रिपोर्ट वाचा आणि पाहा...
4 जणांना प्रशिक्षण दिले जात आहे, मात्र किती जणांना अवकाशात पाठवले जाणार हे अद्याप ठरलेले नाही. सध्या संपूर्ण अभियान विकासाच्या टप्प्यात आहे. कदाचित दोन अंतराळवीर जातील किंवा तीन. ते तिथे किती दिवस मुक्काम करतील याचा निर्णय झालेला नाही, कारण अजून अनेक चाचण्या करायच्या आहेत. या निकालांवरून अंतराळवीर किती दिवस मुक्काम करतील हे ठरेल. ही वेळ 12 तासांपासून 72 तासांपर्यंत असू शकते. अंतराळवीर गगनयानच्या बाहेर जाणार नाही, ते फक्त यानाच्या आतच विविध कामे करतील.
भारताच्या स्वप्नातील गगनयान, मोहीम यशस्वी झाल्यास चौथा देश होऊ
आतापर्यंत केवळ रशिया, अमेरिका आणि चीनलाच अवकाशात मानव पाठवण्यात यश आले आहे. सोव्हिएत रशियाने 12 एप्रिल 1961 रोजी पहिल्यांदा युरी गागरिन यांना अवकाशात पाठवून हा पराक्रम केला. पुढच्याच महिन्यात 5 मे 1961 रोजी अॅलन शेफर्ड अंतराळात जाणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर ठरले. चीनला हे यश 2003 मध्ये मिळाले. गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास मानवाला अवकाशात पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने ही संपूर्ण मोहीम गुप्त ठेवली आहे. अंतराळवीरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखणाऱ्या तज्ञांनाही त्यांच्याशी बोलण्याची परवानगी नव्हती.
70 पैकी 4 लोक निवडले गेले, सर्व चार 40 वर्षांखालील
अंतराळवीर प्रशिक्षणासाठी इस्रोला 70 अर्ज मिळाले होते. इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन (IAM), बंगळुरू येथे वैद्यकीय तपासणी आणि शारीरिक चाचणीनंतर 4 सर्वोत्तम अर्जदारांची निवड करण्यात आली. टेस्ट पायलट असल्याने त्यांना सर्वाधिक जोखमीत विमान उडवण्याचा अनुभव आहे.
13 महिने रशियात प्रशिक्षण, तिथून मूलभूत गोष्टी शिकले
चारही टेस्ट वैमानिकांना फेब्रुवारी 2020 मध्ये प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवण्यात आले होते. कारण रशियाला अंतराळात मानव पाठवण्याचा सर्वात मोठा आणि यशस्वी अनुभव आहे आणि तो आपला मित्रही आहे.
तेथे सुमारे 13 महिने प्रशिक्षण चालले. हे प्रशिक्षण रशियन अंतराळयानानुसार होते, तर यावेळी आपण स्वदेशी अंतराळयान अंतराळात पाठवणार आहोत. म्हणूनच त्यांना रशियात फक्त सामान्य गोष्टींशी परिचित करण्यात आले. उदाहरणार्थ, अंतराळात गुरुत्वाकर्षण शक्ती नाही. यामुळे माणूस सतत हवेत उडत राहतो. गुरुत्वाकर्षण शक्ती नसताना कसे जगायचे हे अंतराळवीरांना शिकवले गेले. त्यासाठी त्यांना पाण्यात आठ ते दहा फूट खोलीवर नेऊन प्रशिक्षण देण्यात आले.
हृदयाची गती वाढवण्याचे आणि कमी करण्याचेही प्रशिक्षण
अंतराळवीर बनणे किती कठीण असते आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते, हे आम्ही स्पेस ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि अध्यक्ष सचिन भांबा यांच्याकडून जाणून घेतले. भांबा म्हणतो- 'अंतराळवीर होण्यासाठी चांगली फिटनेस खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण झोक्यावर बसतो आणि झोका गोल गोल फिरू लागतो तेव्हा आपल्याला मळमळ किंवा उलट्या झाल्यासारखे वाटू लागते.
त्याचप्रमाणे अंतराळात गेल्यावर गुरुत्वाकर्षण जाणवत नाही आणि शरीर फिरत राहते. यासाठी मेंदूला अशा स्थितीसाठी तयार करावे लागते. मेंदूला शिकवले जाते की अंतराळात गेल्यावर पोटाला गुरुत्वाकर्षण शक्ती जाणवत नसल्याचे सिग्नल देऊ नये, जेणेकरून उलटी, मळमळ होणार नाही. यासाठी अंतराळवीरांना अनेक तास मशीनमध्ये फिरवले जाते. हे प्रशिक्षणाच्या सर्वात महत्वाच्या भागांपैकी एक आहे.
महत्वाच्या अवयवांचा भरपूर व्यायाम केला जातो, कारण अंतराळात मदतीसाठी कोणीही नसेल. मदत दूरस्थपणे केली जाऊ शकते. शरीराच्या अंतर्गत अवयवांचा व्यायाम केला जातो. हृदयाचे ठोके वाढवणे आणि कमी करायला शिकवले जाते.
गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर काम करते. आपण उभे नसलो तरीही आपल्या हाडांवर दबाव राहतो. अंतराळात जाताच शरीराला असे वाटते की कोणत्याही पेशीवर दबाव नाही. हाडे कॅल्शियम कमी करू लागतात. प्रशिक्षणात, अशा परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यास शिकवले जाते.
अंतराळात आपल्याला कृत्रिम ऑक्सिजन मिळतो. त्याची पातळीही पृथ्वीपेक्षा कमी असते. म्हणूनच असे व्यायाम करवून घेतले जातात, जेणेकरून आपले हृदय अशा स्थितीत शरीराच्या सर्व पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी तयार होते.
अंतराळात छोटी कामे करणेही खूप आव्हानात्मक असते. उदाहरणार्थ, आपण पृथ्वीवर स्क्रू सहजपणे टाईट करू शकतो, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती कार्यरत असते. पण जर आपण अवकाशात स्क्रू टाईट केला तर तुम्हाला कळणार नाही, की तुम्ही फिरताय की स्क्रू फिरतोय.
चारही अंतराळवीरांसाठी रशियाकडून सानुकूलित स्पेस सूट देखील खरेदी करण्यात आले आहेत. ते अवकाशाच्या गरजेनुसार तयार करण्यात आले आहेत. याशिवाय स्पेस मेडिसिन, लॉन्च व्हेईकल, स्पेसक्राफ्ट सिस्टीम आणि ग्राउंड सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
बंगळुरूमध्ये गगनयान सिम्युलेटरचे प्रशिक्षण सुरू आहे
भारतातील अंतराळवीरांना गगनयान मोहिमेसाठी विशिष्ट प्रशिक्षण दिले जात आहे. इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सिम्युलेटरच्या माध्यमातून अंतराळाचा थेट अनुभव दिला जात आहे. ते कोणते काम करण्यात अडकतात, कोणते काम ते सहज करू शकतात हे पाहिले जात आहे.
प्रशिक्षण स्थळ इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन (IAM) आणि इस्रो सॅटेलाइट इंटिग्रेशन अँड टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंटच्या (ISITE) जवळ आहे. मिशनशी निगडित लोकांव्यतिरिक्त येथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. चारही अंतराळवीरांना त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी आहे, परंतु कुटुंबांना या मोहिमेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
राकेश शर्मा आणि त्यांचे सहकारी रवीश मल्होत्रा यांनी अभ्यासक्रम तयार केला
या मोहिमेसाठी दोन सदस्यीय समितीने अभ्यासक्रम तयार केला आहे. यामध्ये रशियाच्या मिशनवर पहिल्यांदा भारतातून अंतराळात गेलेले राकेश शर्मा आणि त्यांचे सहकारी रवीश मल्होत्रा यांचा समावेश आहे.
रवीश सांगतात- अंतराळात पाठवण्यासाठी तयार केलेल्या कॅप्सूलमध्ये एकावेळी तीन लोकांना वाहून नेण्याची क्षमता आहे. परंतु असे होऊ शकते की सुरुवातीला केवळ दोन प्रवासी अवकाशात पाठवले जातील. जो एक शिल्लक राहील त्याला दुसऱ्या फेरीत पाठवले जाईल.
एकदा का आम्ही आमच्या लोकांना अंतराळातून सुखरूप परत आणले की मग तिथे जाणे आपल्यासाठी आव्हानात्मक राहणार नाही. इस्रो अनेक दिवसांपासून अंतराळ स्थानक बांधण्याचा विचार करत आहे. सध्या जपान-अमेरिकेची स्वतःची स्पेस स्टेशन्स आहेत. तर आपल्यावर अनेक बंधनेही आहेत. जर इस्रोने स्वतःचे स्पेस स्टेशन तयार केले तर या बंधनांतून मुक्ती मिळेल.
मल्होत्रा सांगतात, आम्ही एकूण 3 सत्रातील अभ्यासक्रम तयार केला आहे. आता दुसरे सत्र सुरू आहे. रशियामध्ये, या लोकांना केवळ प्राथमिक प्रक्रियेची ओळख करून देण्यात आली आहे. त्यांना सध्या ज्या सिम्युलेटरवर प्रशिक्षण दिले जात आहे ते भारतीय मानकांचे आहेत. आपली उपकरणे आहेत. त्यांच्याशी पूर्णपणे परिचित असणे आवश्यक आहे.
अंतराळवीर जेव्हा अंतराळात असतील, तेव्हा इस्रोचे शास्त्रज्ञ त्यांच्याशी टीव्ही स्क्रीनद्वारे जोडले जातील. समस्या असल्यास, त्यांना मार्गदर्शन केले जाऊ शकते, परंतु शारीरिक मदत करण्यासाठी तेथे कोणीही नसेल. रशियात राहून आपले अंतराळवीर रशियन भाषाही शिकले आहेत, पण आपल्या संवादाची भाषा इंग्रजी असेल, इस्रोमध्ये काम करण्याची भाषा इंग्रजीच आहे.
मिशनमध्ये 500 हून अधिक उद्योगांचा सहभाग
गगनयान मिशनच्या प्रक्षेपणात 500 हून अधिक उद्योग सामील आहेत. याशिवाय, ISRO चे ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC), विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC), यु आर राव सॅटेलाइट सेंटर (URSC), ISRO सॅटेलाइट इंटिग्रेशन अँड टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट (ISITE), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सारख्या संस्था देखील याचा भाग आहेत.
टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रासाठी अवकाश आणि विज्ञानाचे वृत्तांकन करणारे वरिष्ठ सहायक संपादक चेतन कुमार सांगतात की, एक इंटर-एजन्सी टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. यामध्ये DRDO, ISRO, वायुदल तसेच सर्व अकादमीतील तज्ज्ञांचा समावेश आहे. ज्यांचे या कामात प्राविण्य आहे, ते याचे प्रशिक्षण देत आहे. DRDO अंतराळवीरांसाठी पॅकेज केलेले अन्न तयार करत आहे, जे रेडी टू ईट असेल.
सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणात कोणत्याही परदेशी तज्ज्ञांचा सहभाग नाही. अंतराळवीरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणारे वैद्यकीय पथक फ्रान्समध्ये प्रशिक्षण घेत आहे.
गगनयानसाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. जसे की, ह्युमन रेटेड लॉन्च व्हेईकल, ज्याद्वारे क्रूला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले जाईल. आधी क्रू सदस्य नसलेले फ्लाईट मिशन होईल. याचा उद्देश ह्यूमन रेटेड लॉन्च व्हेईलकल, मिशन मॅनेजमेन्, कम्युनिकेशन सिस्टिम आणि रिकव्हरी ऑपरेशनचा परफॉर्मन्स पाहणे हा आहे. अंतराळवीरांना घेऊन जाणारे ह्युमन रेटेड लॉन्च व्हेईकल GSLV-MK3 आणि LVM3 तयार झाले आहेत.
कुमार सांगतात, ह्युमन रेटिंगमध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेवली जाते. आपण हे अशा प्रकारे समजू शकता की जेव्हा रॉकेटमध्ये उपकरणे किंवा फुगे सोडले जातात, तेव्हा त्यापेक्षा कितीतरी पट अधिक सुरक्षितता मानवी रेटिंगमध्ये ठेवली जाईल, कारण क्रू मेंबर्सची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे.
भविष्यात महिला अंतराळवीरांना पाठवण्याची आणि स्पेसवॉक करण्याची योजना
इस्रोच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावेळी आमचे अंतराळवीर अंतराळयानातून बाहेर पडणार नाहीत. अंतराळात गेल्यानंतर हे यान पृथ्वीभोवती फिरणार आहे. मिशन किती दिवस चालेल हे पुढेच निश्चित केले जाईल, परंतु आम्ही त्यांना 12 ते 72 तास तेथे ठेवू शकतो.
पहिल्या वेळी आम्ही अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणण्यात यशस्वी ठरल्यावर दुसऱ्या वेळी आम्ही त्यांना स्पेसवॉक करायलाही लावू शकतो. अशाप्रकारे भविष्यातील मोहिमेत इस्रोच्या ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञांनाही अवकाशात पाठवले जाऊ शकते. त्या क्रूचा एक भाग असतील, परंतु ही एक टप्प्या-टप्प्यातील प्रक्रिया असेल. अमेरिका, रशिया आणि चीननेही अशाच प्रकारे आपले मिशन पुढे नेले आहे.
आमचे मिशन यशस्वी झाल्यानंतर ते इतर देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त असेल. आम्ही अंतराळवीरांसाठी प्रशिक्षण केंद्र बनवले आहे, ते तात्पुरते आहे. हे केवळ गगनयाननुसार बनवले गेले आहे, परंतु भविष्यात आम्ही बंगळुरूपासून 200 किमी अंतरावर कायमस्वरूपी केंद्र बनवू. सध्या संपूर्ण लक्ष गगनयानच्या यशाकडे आहे.
मोहिमेत रशियाशिवाय ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि रोमानियाचाही सहभाग
गगनयान मोहिमेसाठी भारत 6 हून अधिक देशांसोबत मिळून काम करत आहे. अंतराळवीरांना रशियामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. स्पेस मेडिसिनमध्ये फ्रान्सची मदत घेतली जात आहे. विंड टनेल चाचणीसाठी कॅनडा आणि रोमानियासोबत काम केले जात आहे. ग्राउंड स्टेशन सपोर्टसाठी ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन स्पेस एजन्सीसोबत काम सुरू आहे.
आधी दोन अनक्रू मोहिमा राबवल्या जातील
PM मोदींनी 2018 मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा केली, तेव्हा म्हटले होते की 'भारताचा कोणीतरी मुलगा किंवा मुलगी स्वदेशी गगनयानद्वारे अंतराळात पोहोचेल.' हे ठरले आहे की, भारताचा कोणीतरी मुलगाच स्वदेशी गगनयानातून 2024 च्या अखेरपर्यंत अंतराळात पाऊल ठेवेल. कारण गगनयान मोहिमेसाठी निवडलेले चारही टेस्ट पायलट पुरुष आहेत. इस्रोने 3 सदस्यांना 3 दिवस अंतराळात नेण्याबाबत म्हटले आहे.
2024 च्या शेवटच्या तिमाहीत प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या ह्युमन स्पेस फ्लाइट मिशन (H1) च्या पूर्वी दोन अनक्रू मिशन प्रक्षेपित केले जातील. यातील एक 2023 च्या शेवटच्या तिमाहीत आणि दुसरी 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.