आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिनबायकांचं जग:‘दशग्रंथांच्या’अध्ययनातही अनुपस्थिती...

जयश्री बोकील2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ व्या शतकात वावरणाऱ्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचे क्षेत्र घरापासून आकाशापर्यंत विस्तारलेय. मात्र आधुनिक काळात काही क्षेत्रांत स्त्रियांचे अस्तित्व तुरळक आढळते. गार्गी, मैत्रेयीसारख्या ब्रह्मवादिनी वैदिक स्त्रियांची परंपरा सांगणारे वेदपठण, अध्ययनाचे क्षेत्रही याला अपवाद नाही. पुण्याच्या वेदपाठशाळेतील अध्ययनाचे छायाचित्रही पुरेसे बोलके वाटते. त्यामागील कारणपरंपरेचा तिथे जाऊन घेतलेला मागोवा...

पुण्याकडून पौडच्या आणि नॅशनल डिफेन्स अकादमी (एनडीए) च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मुख्य चौकात डावीकडच्या बाजूला आकर्षक घुमट प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. हे कळस आहेत पुण्यातील प्रसिद्ध वेदपाठशाळेचे. ही वेदपाठशाळा आहे वेदमूर्ती घैसास गुरुजींची. त्यांची चौथी पिढी सध्या वेदपाठशाळेची धुरा सांभाळतेय. वेदपाठशाळेच्या वास्तूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. मात्र, इथे ऐकू येणारा घोष असतो, तो फक्त पुरुषकंठातून येणाऱ्या मंत्रांचा, ऋचांचा...धीरगंभीर स्वरांतले पठण श्रवणसुख देतेच, पण इथे घडणाऱ्या दशग्रंथी वैदिकांमध्ये एकही स्त्रीस्वर नाही हेही जाणवते.

वेदपाठशाळेचे प्रमुख, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजींशी बोलताना दशग्रंथांच्या अध्ययनाकडे महिलांचा ओढा नसल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रिया प्रामुख्याने याज्ञिकी शिकताना दिसतात. ज्याला सर्वसामान्यपणे पौरोहित्य करणे असे म्हटले जाते. मात्र दशग्रंथी वैदिक होणे आणि याज्ञिकी शिकणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. दशग्रंथी वैदिक ही संज्ञा प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या वेळेचा मुद्दा कळीचा आहे. पारंपरिक पद्धतीने किंवा शास्त्रोक्त रीतीने दशग्रंथांचे अध्ययन यासाठी साधारणपणे पंधरा वर्षांचा काळ लागतो. अगदीच तुलना करायची तर दहावीनंतर पाच वर्षांत आपल्या शिक्षण पद्धतीत पदवीधर तयार होतात. पण वेदाध्ययन आणि पठण प्रक्रिया दीर्घमुदतीची असते. शिवाय अध्ययनाचा सर्व काळ गुरुगृही राहणे अनिवार्य असते. आपल्या सामाजिक रचनेमध्ये मुलीला, स्त्रीला इतका दीर्घकाळ गुरुगृही अध्ययनासाठी निवासी पद्धतीने ठेवण्याची पद्धत आणि तयारी समाजमानसात नाही ही वस्तुस्थिती आहे. सलग पंधरा वर्षे अध्ययन आणि त्यानंतर नित्य स्वाध्याय या गोष्टींची दशग्रंथी वैदिक होण्यासाठीची अनिवार्यता आहे.

मुलींच्या बाबतीत लवकरात लवकर विवाह, मुलांचा जन्म, संगोपन, कौटुंबिक जबाबदाऱ्या हे चक्र सुरूच राहत असल्याने अडचणी वाढतात. वेदिक संशोधन मंडळाच्या (आदर्श संस्कृतशोध संस्था) संचालक डॉ. भाग्यलता पाटसकर यांनीही गुरुजींच्या म्हणण्याला दुजोरा दिला. सलग किमान पंधरा वर्षांचे अध्ययनसत्र, नित्य स्वाध्याय, बैठकीची स्थिरता, विवाहानंतर येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या, आई म्हणून गुंतवणूक, आधुनिक काळात नोकरीच्या वेळा, व्यावसायिक जबाबदाऱ्या...असे अनेक घटक असतात. त्यामुळे या क्षेत्रात स्त्रिया दिसत नाहीत. काही वेगळे प्रयोग या क्षेत्रात झाले आहेत. मात्र, उपरोक्त घटकांमुळे ते यशस्वी ठरूनही त्यात सातत्य राहू शकलेले नाही. इथे बंदी कुणावरच नाही, पण अध्ययनाचे नियम ठरलेले आहेत. त्यांचे पालन काटेकोर व्हावे ही रास्त अपेक्षा आहे. या पाठशाळेप्रमाणेच पुण्यात अन्य चार वेदपाठशाळाही आहेत. राज्यभरात साठ वेदपाठशाळा आहेत. जितक्या लहान वयात योग्य उच्चारांची सवय लागेल तितके पठण निर्दोष, स्वच्छ आणि स्वरानुकूल होते. मात्र सलग पंधरा वर्षे वेदाध्ययन आणि पठणासाठी देण्याची मुलींच्या संदर्भात पालकांची तयारी फारशी दिसत नाही.

स्त्रियांनी पौरोहित्याकडे वळावे
अध्ययनासाठी आवश्यक आणि अनिवार्य असणारा काळ स्त्रिया देऊ शकत नाहीत, मात्र मंत्रोच्चार अन् अर्थासह निर्दोष उच्चारण यांचा अधिकार सर्वांना आहे. यातला मधला मार्ग म्हणून अनेक स्त्रिया पौरोहित्याचे अध्ययन करतात. पुण्यात स्त्री पुरोहितांची संख्या लक्षणीय आहे. रुद्र, श्रीसूक्त, सप्तशती, रामरक्षा, गीता तसेच सत्यनारायणादी विधींचे उत्तम मार्गदर्शन अनेक स्त्रिया करतात. राज्यात इतर ठिकाणीही महिलांची या क्षेत्रातली संख्या वाढायला हवी.

जयश्री बोकील
संपर्क : ९८८१०९८०४८

बातम्या आणखी आहेत...