आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:'कर्णन' - बहिष्कृतांचे महाभारत...!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दलित साहित्य ही संकल्पना मराठीत ठळकपणे वापरली जाऊ लागली त्याला ६० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अस्वस्थ आणि उत्कट अनुभवांना ह्या साहित्याने वाट मोकळी करून दिलीये. भारतीय सिनेमाने अंशाअंशाने का असेना सामाजिकता जोपासण्याचा प्रयत्न कायम केलाय. मात्र "दलित सिनेमा' हे विशेषण वापरताना अजूनही अडखळायला होतं. दलित सिनेमाचा प्रवाह भारतीय चित्रपटसृष्टीच्या गर्भातच पडून राहिला. त्याला चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. "कर्णन'च्या निमित्ताने समाजक्रांतीच्या नव्या जाणीवा घेऊन आलेल्या अर्भकाला जन्म मिळाला आहे. निश्चितच भारतीय चित्रपटसृष्टिसाठी ही क्रांतिकारक घटना आहे.

हातातल्या कोरड्याने स्वतःच्या शरीरावर रट्टे ओढणाऱ्या पोतराजला बघून दार लावून घेण्याची अनेकांना सवय असते. हरकत नाही. दार चालू-बंद ठेवण्याच्या निवडीचे स्वातंत्र्य आपल्याकडे असते. तुम्ही जर हे दार लावून घेणाऱ्यांपैकी एक असाल तर "कर्णन' बघण्याचा निर्णय काळजीपूर्वक घ्या. कारण भाबड्या आशावादावर तुमचा पिंड पोसला असेल तर "कर्णन' पाहताना पोतराजचा पट्टा स्वत:वर ओढून घेऊन आत्मक्लेश करून घेण्याइतपत वेदना तुम्हाला होऊ शकते. सिनेमा पुढे जातो तसे हे कोरडे वाढत जातात अन जीवघेणी बोचणी तीक्ष्ण होत जाते. हो, एक मात्र नक्की होईल - तुमच्यामध्ये खोल तळाला जाऊन बसलेल्या संवेदनशीलतेची कवाडं किलकिली होतील. दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्याच्या भावना जाणून घेण्याची कुवत आणि नियत बळावेल. जाणत्या मनाला अस्वस्थ करत असतानाच थंड पाणी ओतून ताळ्यावर देखील तोच आणून ठेवेल. खरं तर अशा निकोप आणि प्युअर कलाकृतीसाठी "आवडला' शब्द थिटा आहे. काही ऋण असे असतात की अगदी मरणाच्या शय्येवर पडलो तरी ते चुकवू शकलो नाही, याचा कृतज्ञतापूर्वक अभिमान असतो. "कर्णन' तिथे जाऊन पोचलाय. मी "कर्णन' प्रदर्शित होण्याला भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्वाची घटना म्हणून बघतोय. या सिनेमात असे काय आहे जे असंख्य लोकाना भिडतेय, याची उकल करणे क्रमप्राप्त आहे.

दलित साहित्य ही संकल्पना मराठीत ठळकपणे वापरली जाऊ लागली त्याला ६० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अस्वस्थ आणि उत्कट अनुभवांना ह्या साहित्याने वाट मोकळी करून दिलीये. भारतीय सिनेमाने अंशाअंशाने का असेना सामाजिकता जोपासण्याचा प्रयत्न कायम केलाय. मात्र "दलित सिनेमा' हे विशेषण वापरताना अजूनही अडखळायला होतं. सिनेमाच्या बाबतीत प्यूरिस्ट (purist) असण्याचा आग्रह आजतायगत मूळ धरून आहे. साहित्यात कवीने निखळ कवीच असावे आणि सिनेनिर्मितीत सिनेमाकडे फक्त सिनेमा म्हणून पहावे हा हट्ट धरून ठेवणारे आजही आहेत. कलेच्या दृष्टीने त्याची समीक्षा, रसग्रहण, परीक्षण अभ्यासक करत राहतील. एखाद्या घटनेच्या, दृश्याच्या, अनुभूतीच्या आणि atrocities चे फिल्ममेकर वर झालेले परिणाम समोर आले तेव्हा त्यात एक बुजरेपणा अन् संभ्रम होता. त्यामुळे दलित सिनेमाचा प्रवाह भारतीय चित्रपटसृष्टीच्या गर्भातच पडून राहिला. त्याला चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. "कर्णन'च्या निमित्ताने समाजक्रांतीच्या नव्या जाणीवा घेऊन आलेल्या अर्भकाला जन्म मिळाला आहे. निश्चितच भारतीय चित्रपटसृष्टिसाठी ही क्रांतिकारक घटना आहे.

गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य विशेषतः तमिळ सिनेमात दलित प्रवाह प्रबळ होतोय. पारंपरिक सौन्दर्यसृष्टीने वर्षानुवर्षे तोच कित्ता गिरवून तयार केलेली संरचनात्मक चौकट भेदण्याच काम तमिळ सिनेमा बेधडकपणे करतोय. सिनेमात दलित पात्र दाखवणे, त्यांचे जीवन रंगवणे, त्यांचे समाजवास्तव दाखवणे एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीये. त्यांच्या वेदनेला आणि विद्रोहाला धीटपणे कलात्मक दृश्यरूप देण्याचं काम हा सिनेमा करतोय. त्याचे विचार रोखठोक अन् कधी नव्हे ते इतके व्होकल झाले आहे. दिग्दर्शक मारी सेलवराज यांनी "परीयेरम पेरूमल' ह्या पहिल्याच सिनेमात जातीय अत्याचार आणि भेदभाव यांचं अस्वस्थ करणारं, तरीही आशादायी चित्र दाखवलं होतं. विद्रोहाची जुनी हत्यारं निकामी ठरत असणाऱ्या समकालीन भारतात मारी सेलवराजचा दुसराच सिनेमा विषमतेची मढवलेली वस्त्र टराटरा फाडतोय. हे करताना नीती-अनीतीच्या पारंपरिक सीमा अस्पष्ट होत जातात. हे अनुभवविश्व भारतीय सिनेमासाठी तरी नवीन आहे. पा. रंजीत ने "काला' प्रदर्शित केला तेव्हा समाजशास्त्रीय दृष्टिकोणाचा अभाव असलेल्या मराठी-हिंदी समीक्षकांनी त्यास मोडीत काढले. मारी सेलवराज दिग्दर्शित "कर्णन' ह्या बाबतीत सगळ्यांना पुरून उरणार आहे. ह्या सिनेमात फक्त जीवनमूल्ये नसून भारतीय चित्रपटसृष्टीने आधी कधीही न पाहिलेली कलात्मक मूल्ये आहेत. प्रचार आणि प्रचारकी यांच्यातल्या सीमारेषा हा सिनेमा अचूक ओळखतो. "कर्णन'च जग बेरकी, रांगडं असलं तरी ओबडधोबड नाहीये. हत्तीचे बळ असलेला अतिकुशल पाथरवट अजिंठा, वेरूळ, ताजमहल कोरून काढतो, अगदी त्याचं कौशल्याने मारीने "कर्णन'चे अंत:स्तर सूक्ष्म डिटेलिंग सह कोरून काढले आहेत. हातोडीचे घाव सोसून टणक झालेल्या हातांशिवाय हे काम अशक्य आहे. त्यासाठी निवडलेले अवजार दृश्यकलेची आणि प्रतीकं, प्रतिमा अन मिथकांची पुनर्मांडणीच आहे. ही कलाकुसर करत असताना उडत असलेल्या तीक्ष्ण ठिकऱ्या मात्र प्रेक्षक म्हणून आपल्या डोळ्यात थेट रुततात. त्यामुळे "कर्णन' पहिल्यानंतर सुद्धा कुणी कोरड्या मनाने बाहेर पडत असेल तर त्याला आपल्या अनुकंपेची परिमाणे तपासून पहावी लागतील.

"कर्णन' सिनेमा सुरू होण्याआधी काळ्या स्कीनवर तमिळमध्ये लिहून ज्याचा शब्दशः अर्थ असा - It was a time when ordinary people began to fight for their basic needs and human rights.

साक्षीदार, एक फुलपाखरू... सिनेमात एका अत्याचाराच्या घटनेचे साक्षीदार असलेल्या फुलपाखराचे अन् असंख्य प्राण्यांचे संदर्भ दिसत जातात तसं लक्षात येतं की दिग्दर्शक मानवी मूल्यांची आणि मानवी अधिकाराची भाषा बोलतोय जी फक्त तमिळ भाषिकांपुरती मर्यादित नसून वैश्विक आहे. "कर्णन' सिनेमाची कथा १९९७ साली तमिळनाडूमधल्या पोडियंकुलम गावात घडते. (प्रत्यक्ष ज्या घटनेवर सिनेमा काही अंशी बेतलेला ती घटना १९९५ साली तामिळनाडूच्या कोडियंकुलम गावात घडलीये. संपूर्ण दलित वस्ती असलेल्या ह्या गावात ६०० पोलिसानी हल्ला चढवून नासधूस केली होती.) अत्याचार घडतो,कधी घडवला जातो, त्याची बातमी बनते. अर्थात बातमीमागची बातमी दरवेळेस समोर येतेच असं नाही. त्यामुळे अशा कित्येक कहाण्यांनी आजवर मूकपणे जीव सोडलाय याची गणती नाही. प्रत्येकाची तीव्रता कमीअधिक प्रमाणात असली तरी त्यामागील दाह सारखाच आहे. "कर्णन' ह्या सर्व कहाण्यांचे प्रतिनिधित्व करतो. इथे राहणारी आदिवासी, मागासवर्गीय लोकं रूढार्थाने गावकुसाबाहेरची नसली तरी शेजारील सवर्ण मेलूरगाव सत्तेच्या जोरावर कायम त्यांना कमीपणा दाखवण्यात पुढे असतो. येथील समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था पोडियंकुलमच्या जनतेला सतत वाकवण्यात मोठपणा मिरवते. सुरुवातीच्या एका दृश्यात पोलिस आपल्या सहकाऱ्याला म्हणतो, कधीतरी आपल्याला हे "Nobody' लोक खूप घाबरायचे, आता आपल्यासमोर हत्तीसोबत नाचत आहेत, सण साजरा करत आहेत, मेलूर गावच्या लोकांना राग येणं तर स्वाभाविक आहे.पोडियंकुलम गांव मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर मध्ये आहे. पण त्या रस्त्यावर सुद्धा त्यांच्यासाठी साधा बसस्टॉप नाहीये.

सामाजिक कारावासाचे स्वरूप असे की एकही बस त्यांच्यासाठी थांबत नाही. तिथली दमनयंत्रणा अशी आहे की मेलूर गावचे लोक त्यांना आपला बसस्टॉप वापरू देत नाही. जंगलवासीयांना बसची गरजच काय हे बस ड्रायव्हरचं गावाबद्दल मत आहे. आणि सवर्ण पोलिसांना याचा राग आहे की ज्यांना बस मिळत नाही ते हत्तीवर बसूच कसे शकतात. शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलींना मेलूर गावाच्या बस स्टॉपवरून गाडी पकडावी लागते तेव्हा सवर्णनी केलेली छेडछाड नेहमीची आहे. मेलूर गावचा सवर्ण मुखिया त्याच्या माणसांना कुत्सितपणे सांगतोय की, ती लोकं साध्या बसस्टॉपसाठी सुद्धा आपल्या दयेवर अवलंबून असल्याने हात जोडून उभी राहतात. त्यांच्याशी भांडण करण्यापेक्षा आपण कायम त्याची लज्जत घ्यायला हवी.गावात एक घटना घडते अन समाजातला हक्कदार वर्ग आणि वंचित वर्ग यांच्यातील संघर्ष उग्ररूप धरण करतो. वंचित असणे एकट्यादुकट्याचे नसून संपूर्ण समाजाचे, समूहाचे, गावाचे असते. त्यामुळे ह्या लढाईचं नेतृत्व जरी कर्णन (धनुष) करत असला तरी तो एकटा सिनेमाचा नायक नाही. मारी सेलवराजने ह्या युद्धाची मांडणी वंचितांच्या जाणिवेने लिहीलेलं महाभारत अशी केलीये. अर्थात हा प्रस्थापितांना धक्के देण्यासाठी निर्मिलेला केवळ काव्यात्म न्याय नाहीये. कलेच प्रयोजन काय, तिचं साध्य काय ह्या प्रश्नांना सिनेमाच्या माध्यमातून मारीने स्वतंत्र वैचारिक अधिष्ठान मिळवून दिलं आहे. आंबेडकरी विचारांची कृतीशीलता त्यामागे आहे.

"कर्णन'ने प्रस्थापित महाभारताची चौकट मोडली, पण ही चौकट मोडण्यासाठी हा सिनेमा लिहिला गेला नाहीये. मारी सेलवराज कवी, कथाकार आहे. त्याचा प्रवास साहित्यातून सिनेमाकडे झालाय. आपल्या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मारी सांगतोय की ज्या कहाण्या ऐकून बघून तो मोठा झाला त्या राजा-राणी-राक्षसांच्या नसून सभोवतालच्या माणसांच्या होत्या. मौखिक कथाकथन, लोककला, लोकसंगीत याचा समृद्ध परंपरेत तो वाढलाय. पण ही परंपरा निव्वळ रूढ नियमांना अनुकरण करणारी नव्हती. मिथकांची पुनर्रचना अन् दुर्लक्षितांची बाजू ही दोन सूत्र त्याच्या साहित्यात सुद्धा दिसून येतात. मारीच्या एका कवितेतील नायक म्हणतो, मला सुळावर चढवले म्हणून मी येशू आहे असे नाही. येशूला क्रूसावर चढवले त्याच वेळी त्यांच्या दोन्ही बाजूला दोन गुन्हेगार चोरांना वधस्तंभावर खिळण्यात आले. मी त्यांच्यापैकी एक असेल ज्यांच्यासाठी कुणीही प्रार्थना केली नाही की अश्रु ढाळले नाही! मिथकांच हेच विखंडन "कर्णन' मध्ये पसरत गेलय. मराठीत बाबा आमटे यांनी पहिल्यांदा ह्या मिथकीय अंगाने प्रतिमांची चिकित्सा केली. ज्वाला आणि फुले(१९६४) कवितासंग्रहात रामायण, एकलव्य, विश्वामित्र, पोप, प्रॉमिथियस, सॉक्रेटिस, कोपर्णीकस, डार्विन, ज्ञानेश्वर, तुकाराम यांची प्रतीकं एवढ्या बेधडकपणे पहिल्यांदा वापरली गेली असेल. क्रांतीची पावले मध्ये बाबा आमटे लिहितात,

क्रांती ही सीतेसारखी आहे तिची पावले वनवासी रामाची साथ करीत असतात पण तो मर्यादित पुरुषोत्तम जेव्हा राज्यारूढ होतो तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गडप होते!

मारीची कविता, त्याने मिथकाना दिलेली तत्कालीन प्रतीके इथे नाते सांगू पाहतात. दया पवार यांनी कोंडवाडा(१९७४) मध्ये कवितेच्या माध्यमातून प्रतीकात्मक अंगाने मिथकांची मीमांसा केली होती. असं म्हणतात की क्रौंच पक्ष्याची हत्या पाहून वाल्मिकी कळवळले आणि त्यांनी रामायण ह्या महाकाव्याची निर्मिती केली. विद्रोही शंबुकाची रामाकडून हत्या केल्याचे रामायणात उल्लेख आहेत. स्वतः उपेक्षितांच्या जन्माला येऊन सुद्धा वाल्मिकींनी त्या दुसऱ्या बाजुबद्दल कधी लिहिले नाही. "हे महाकवी' या कवितेत दया पवार महाकवीला प्रश्न विचारतात, -

तुझ्याच रक्ताचा एखादा शंबूक तटतटून संतापाने पेटून उठला रामराज्याची स्तुती गाणाऱ्या हे महाकवी.... तिथेही अमानुषतेचा हिमकडा कोसळला तुला महाकवी तरी कसे म्हणावे! हा अन्याय‚ अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असतास... ...तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते.

दिग्दर्शक मारी सेल्वराज यांनी "कर्णन'मध्ये बहिष्कृतांचे महाभारत तर दिग्दर्शक पा. रणजीत यांनी "काला'मध्ये बहिष्कृतांचे रामायण मांडले आहे. दुसऱ्या बाजूच्या ह्या संघर्षाला चिवटपणा, जिद्दीपणा असला तरी आडमुठेपणा नाही. जे भोगलं त्यातून आलेल्या अपरिहार्य अभिव्यक्तीचा तो अविष्कार आहे. एखाद्या किटकाच्या, प्राण्यांच्या सोबतीने गोष्ट दाखवली जाते तसं कळतं की भाषा, प्रदेश, धर्म कुठलाही असला, त्यातले बंड करून उठण्याची, विद्रोहाची आशयसूत्रे वेगवेगळी असली तरी दलितांच्या जगण्यातली वेदना समान आहे. प्रादेशिक सिनेमात जे प्रवाह पुढे येतात ते त्या सीमेपुरते मर्यादित राहतात. दलित साहित्य आणि नुकतचं बाळसं धरू पाहत असलेला दलित सिनेमाच्या बाबतीत असे नाहीये. भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात निपजणाऱ्या दोन दलित कलाकृतीमधल्या जाणिवांचे विशुद्ध सजगपण एकसमान आहे. परिवर्तनवादी संवेदनशीलतेशी नाते सांगणारे सामूहिक भान समग्र दलित साहित्य आणि सिनेमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने, लढ्यामुळे मिळाले आहे. त्यामुळे श्याम बेनेगलं यांच्या अंकुर(१९७४) मध्ये लहान मुलाने वर्चस्ववादावर मारलेला दगड... नागराज मंजुळेने फॅन्ड्री (२०१३) मध्ये विषमतेवर मारलेला दगड... आणि कर्णनमध्ये १९९७ साली लहान मुलाने अत्याचार, दडपशाहीविरुद्ध बसच्या काचेवर मारलेला दगड सारखा असतो.

"कर्णन'चे भारतीय सिनेमातील सांस्कृतिक स्थान आणि सामाजिक परिणाम येणारा काळ यथावकाश दाखवेलच परंतु त्यातील सौन्दर्यशास्त्रीय स्थळ टिपणे हा देखील समृद्ध करणारा अनुभव आहे. क्रौंच पक्ष्याची हत्या बघून वाल्मिकींच्या मनात करुणा उत्पन्न झाली आणि त्यांनी रामराज्याची स्तुती गाणारे महाकाव्य लिहिले. "कर्णन'मध्ये मात्र पुढचे दोन्ही पाय दोरीने बांधलेल्या गाढवाला मुक्त करण्यासाठीची तळमळ आहे जे माझ्यासाठी कुठल्याही महाकाव्याहून कमी नाही. मूळ महाभारतात जातीने कनिष्ठ असल्याने कर्णाला स्वयंवरात भाग घेऊ दिला जात नाही. मारी सेल्वराजच्या महाभारतातला कर्ण मत्स्यभेद करतोय अन द्रौपदी त्याच्या प्रेमात आहे. इथली लढाई धर्मासाठी, सत्तेसाठी नसून; अत्याचाराला वाचा फुटण्याआधीच हुंकार दाबले गेलेल्यांच्या मुलभूत मानवी अधिकारासाठी आहे. इथल्या कर्णाने जिंकलेल्या तलवारीवर फक्त त्याची मक्तेदारी नाहीये. खरं तर पूर्ण सिनेमाभर ती तलवार वेगवेगळ्या हातात फिरत असते. मारीचा कर्णन युद्धात अनवधानाने, फसवणुक केल्याने मरणार नाहीये. उलट इथे क्रूरकर्मा कन्नबिरनचा वध आहे.

"कर्णन'मध्ये गावाचं आणि त्याला लागून येणारं रचनाशास्त्र अतिशय ऑरगॅनिक अन् त्याच वेळी प्रतीकात्मक आहे. मारी सेल्वराजने लिहिलेल्या साहित्य-सिनेमात निरागस सौंदर्य आणि पाशवी क्रौर्य यांना एकत्र स्थान आहे. त्यामुळे "पेरीयेरम पेरूमल'सारखा "कर्णन' देखील मृत्यूने सुरु होतो. जीव सोडणाऱ्या लहान मुलीला थंडपणे बघणारे कावळे इथे आहेत तशी कोंबड्याना पळवून नेणारी गिधाडे सुद्धा... डुक्कर, पाय बांधलेल गाढव, कोंबड्या, बकऱ्या, कुत्री, पावसाळी भिंगं, फुलपाखरू, गांडूळ, मासे हे सगळे त्या इकोसिस्टीमचा भाग आहेत. संपूर्ण सिनेमात गावातल्या लोकांच्या भेगाळलेल्या पायांची अन चपलांची अनेक दृश्य आहेत. मारीच्या दोन्ही सिनेमात सामाजिक रचना आहे तशीच स्वीकारणारी पात्रे जशी आहेत, तसेच शाश्वत वर्चस्ववाद नाकारण्याचा त्यांचा प्रवास देखील. गाढवाचे पाय सोडण्याचा अधिकार फक्त त्याच्या मालकाला आहे किंवा घोड्याला वाढवून करायचे काय? घोड्याचं मटन थोडीच खाता येते हे यमन बोलतो तेव्हा त्याची कीव न येता स्वतःचा आणि आपल्या समाजरचनेचा राग येतो. पाय मोकळे सोडलेला गाढव घोड्याहून कमी नसतो अन् चालवायचा कसा हे माहित नसेल तर घोडा देखील गाढवच. हा फरक कित्येक वर्ष येमेन पर्यंत आपण पोचू दिलेला नाहीये. (त्या घोड्याला वाढवून योग्य वेळी बाहेर काढणाऱ्या लहान मुलाचं दृश्य हे भारतीय सिनेमाच्या आयकॉनिक फ्रेम पैकी एक आहे.) ज्याची कोंबडी रोज पळवून नेली जाते, तिचं लोक पिल्लं पळवून नेणाऱ्या गिधाडाच्या विनवण्या करतात. याला काहीएक अर्थ नाहीये हे विभाजनप्रिय वृत्तीने कधीही तिथपर्यंत पोचवलं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे, 'अस्पृश्यतेचे मूळ कारण म्हणजे सांस्कृतिक आणि वांशिक फरकातील तिरस्कार तसेच त्याचबरोबर असलेला द्वेष. ह्या द्वेषाला नैतिक पातळीवर समर्थन मिळत राहील तोवर समतेची लढाई यशस्वी होणार नाही. गावात कर्णन काही तरुणांना घेऊन हा वर्चस्ववाद नाकारतो, तसं कळत जातं की हा कुठेही गेला तरी याचा संघर्ष अटळ आहे. सिनेमात किंवा सिनेमाबाहेर त्याचं अस्तित्व, त्याचं बळ नाकारण्याचा सामूहिक कट कदाचित वर्षानुवर्षे चालू राहणार आहे.

कर्णनमध्ये एका दृश्यात पोडियंकुलमच्या काही गावकऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं जातं. स्वतच्या पैशाने चहा मागितला म्हणून, बसायला बेंच मागितला म्हणून, डोक्यावर पगडी ठेवली म्हणून त्यांना ढोरासारखं मारणारी वृत्ती इथे दिसते. पोलीस अधिकारी कन्नबिरन हा त्या वृत्तीचं प्रतिनिधत्व करणारा चेहरा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमची नाव बदलणार आणि एका रात्रीत सम्राट होणार? तुमची नाव बदलली म्हणून आम्ही तुम्हाला घाबरायचं?असं म्हणत कन्नबिरन त्या म्हाताऱ्यांना झोडपून काढतो तेव्हा त्याचे धागेदोरे थेट वर्तमानात पोचलेले असतात. मागासवर्गियांनी स्वतःची, आपल्या मुलांची नावं देखील उच्चवर्णीयांसारखी ठेवू नये; ही वृत्ती सिनेमापुरती मर्यादित असेल अशा भ्रमात असाल तर डोळ्यावरची झापडं काढण्याची नितांत गरज आहे. समोरच्याच्या मोबाईलमध्ये रिंगटोन आपल्याला नको असलेली वाजला म्हणून, मागासवर्गीयाने मिशी वाढवली म्हणून, लग्नात घोड्यावर बसलाच कसा; म्हणून मुडदे पडल्याच्या घटना तुमच्या कानावर पडत नाही ते किती बरयं. एका प्रसंगात कर्णन इथल्या कृष्णाला हतबल होऊन विचारतो, माझ्या गरजा, माझ्या अडचणी तुमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. मी तुमच्यासमोर उभं कसं राहतोय, तुम्हाला हाक कशी मारतोय, हे महत्वाचे आहे?

"कर्णन'ची सौंदर्यस्थळे नमूद करताना तिथल्या स्त्रियांबद्दल बोलणं गरजेचं वाटतं. कर्णनच्या घरात कमवणारी एकमेव स्त्री म्हणजे त्याची कर्तबगार मोठी बहिण पद्मिनी. दारू पिऊन भाऊ नाचतोय हे कळल्यावर सगळ्यांसमक्ष त्याच्या डोक्यावर पाण्याची बादली ओतायला ती मागेपुढे बघत नाही. बाहेर समाजाने नाकारलेला अधिकार तिला घरात आहे. समतेची लढाई लढण्यासाठी, व्यवस्थेविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी गावकऱ्यांना कर्णन आवाहन करतो, तेव्हा त्याच्यामागे येणारी पहिली व्यक्ती सुद्धा एक स्त्री असते. ह्या युद्धात आपल्या प्रियकरासोबत काहीही होऊ शकतं हे कळल्यावर त्याला धीर देत द्रौपदी म्हणते, काळजी करू नकोस, यात अजून ५-१० वर्ष गेली तरी माझी वाट बघण्याची तयारी आहे.कर्णणने उभारलेले बंड गावकऱ्यांना सुरुवातीला मान्य नसतो. तेव्हा, तुम्ही आमच्या मुलांसाठी उभे राहू शकत नसाल तर आम्ही त्यांचं रक्षण करू ही भूमिका गावातल्या सर्व स्त्रियांची आहे. हीच बाब येमेनच्या दिवंगत बायकोबद्दल सुद्धा. एका गाण्यात ३० वर्षांपूर्वी वारलेल्या पत्नी मंजानथीची आठवण काढताना येमेन सांगतो, 'माझ्या कमरेला बांधलेला पंचा तिने खांद्यावर अभिमानाने गुंडाळायला शिकवला.' (मारी सेलवराजच्या आजीचे नाव सुद्धा मंजानथी आहे हा योगायोग नाही.) आत्मसन्मानाच्या लढाईत आपण काय गमावले अन काय मिळवले हे बघताना कर्णनचे डोळे पानवतात. तेव्हा गावातली एक म्हातारीच त्याचा हात धरत सांगते, खूप रडून झालय आपलं, इथून पुढे नको, आता नाचूया आणि आनंद व्यक्त करूया.कर्णन बेफाम होऊन नाचतो.

"कर्णन' संपल्यानंतर अखंड घालमेल मागे उरते. अनेक प्रश्न आपला पिच्छा सोडत नाही. कर्णनचं हे बेफान होऊन नाचणं, मुक्तीचा सोहळा साजरा करणं आपल्या भोवताली अनेकांना सहन होत नाहीये, हे सतत दिसतय. एका प्रसंगात गावातील वयोवृद्ध दुर्योधन म्हणतो, की आम्ही तर भोगलं हे सगळं पण इथल्या तरुण पोरांनी तरी गांव सोडून दुसरीकडे कायमच निघून जायला हवं. 'उतराधिंग येप्पोव' गाण्यात हीच मुलं म्हणतात, आम्ही तर संपूर्ण जगभर उडायला तयार आहोत, पण आमची छाटलेली पंख तर त्यांना परत द्यायला सांगा. पोडियंकुलमचे तरुण उच्च शिक्षण घ्यायला शहरात गेले तरी त्यांचा संघर्ष संपणार नाहीये. मारी सेलवराजचा पहिला सिनेमा "पेरीयेरम पेरूमल' तिथूनच तर सुरू होतो. शिक्षण घेऊन कामाच्या ठिकाणी गेलं तरी तेच. सतत अविरत संघर्ष. कुठलाही एक सिनेमा हा चळवळ उभी करू शकत नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे. collective consciousness चा तो एक भाग आहे. दलितांच्या राजकीय, सामाजिक हक्कांची कैफियत मांडणाऱ्या पा. रंजीत, मारी सेलवराज यांचे सिनेमे ती चेतना विझू न देण्याचं काम करत आहेत. "कर्णन' केवळ छळवाद मांडणारी कहाणी नसून शोषणमुक्तीच्या ध्यासासाठी चिवटपणे लढणाऱ्यांचा अध्याय आहे. हा अध्याय टाळून कुणालाही पुढे जाणं शक्य नाहीये.

जितेंद्र घाटगे
jitendraghatge54@gmail.com

बातम्या आणखी आहेत...