आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • BRS In Maharashtra Politics; K Chandrashekhar Rao Announcement In Maharashtra Politics | MIM | Congress | Nanded

दिव्य मराठी विशेष2013 मध्ये MIM तर 2023 मध्ये BRS?:महाराष्ट्रातील राजकारणात शेजारील राज्यांतील पक्ष प्रवेशाचा फायदा BJP लाच; काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान

नीलेश भगवानराव जोशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील राजकारणात 2013 मध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने प्रवेश केला होता. ज्या नांदेड जिल्ह्यातून राज्यातील राजकारणात एमआयएमने प्रवेश केला, त्याच नांदेड जिल्ह्यात दहा वर्षानंतर आता तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षाने राज्यातील राजकारणात प्रवेशाची घोषणा केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी 5 फेब्रुवारी रोजी नांदेड मध्ये संवाद मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांत बीआरएसची वाहने फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व वाहनांची सुरुवात शिवनेरी गडापासून केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

एमआयएमच्या राज्यातील प्रवेशाला विरोध

आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक पक्ष असलेल्या एमआयएमने 2012 या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत यश मिळविले होते. त्यांचे तब्बल अकरा नगरसेवक निवडून आले होते. या पक्षाने नांदेडमध्ये मारलेली मुसंडी ही आश्चर्यकारक मानली गेली. एमआयएम या पक्षावर राज्यात बंदी घालण्यात आली होती, अशी माहिती राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिली होती. त्यानंतर पक्षाला न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. 2013 मध्ये एमआयएमच्या राज्यातील राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धडकी भरली होती. आणि भविष्यात त्यांची भीती खरी देखील ठरली. एमआयएमचा सर्वाधिक फटका याच दोन पक्षांना बसला तर फायदा शिवसेना-भाजप युतीला झाला होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एमआयएमला भाजपची ‘बी’ टीम म्हणत होते.

एमआयएमने 2013 मध्ये दिलेल्या घोषणा गाजल्या

  • शिवसेना- भाजपचे नाव घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले मुस्लिम समाजाला धमकावतात, असा आरोप ओवेसी यांनी केला होता.
  • त्यावेळी खासदार ओवेस यांनी ‘डरो मत, अब मै आया हूँ,’ अशी भावनिक सादही घातली होती.
  • ‘रिझर्वेशन नही तो व्होट नही’, ‘उठो हक के लिए लढो’ अशा वल्गनाही त्यांनी केल्या होत्या.

भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रातील शेतकरी आणि महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रात 2013 मध्ये प्रवेश करणाऱ्या एमआयएम पक्षाने राज्यातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. तर बीआरएसच्या वतीने शेतकरी आणि महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशात गरजेपेक्षा अधिक पाणी उपलब्ध आहे. 1 लाख 40 हजार टीएमसी पाऊस होतो. सरकारची इच्छा असेल तर देशातील शेतात पाणी पुरवठा होऊ शकतो. राज्यांमध्ये पाण्यासाठी युद्ध करण्याची गरज नाही. देशाला 100 वर्षे पाणी टंचाई नाही. प्रकल्प बनवा, पाणी टंचाई व पुरापासून वाचू शकतो, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. 2024 मध्ये सत्तेल आल्यानंतर महिलांची प्रगती करण्यासह त्यांना लोकसभा, विधानसभेत 33 टक्के जागा वाढवून संधी देऊ असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

बीआरएसच्या 2023 मध्ये दिलेल्या घोषणा गाजणार?

  • भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. त्यातील 54 वर्षे काँग्रेसचे, तर 16 वर्षे भाजपचे राज्य होते. देशातील आजच्या स्थितीला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत.
  • फक्त ‘मन की बात’ करून किंवा ‘मेक इन इंडिया’ अशा घोषणा देऊन जनतेला फायदा होत नाही. मेक इन इंडिया म्हणताना देशातील सर्व गल्लीबोळात चायना बाजार सुरू असल्याची टीका.
  • महाराष्ट्रात सत्ता आल्यास आपण प्रत्येक दलित कुटुंबाला दरवर्षी 10 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केसीआर यांनी केली.
  • लोकसभा, विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण
  • शेतात पाणी पुरवठा

एमआयएमला शिवसेना तर बीआरएसला मनसेचा विरोध

  • 2013 मध्ये एमआयएमच्या नेत्यांना राज्यात प्रवेश देण्यावरुन शिवसेना नेते आक्रमक झाले होते.
  • तत्कालिन शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी ओवेसींविरोधात आंदोलन केले होते आणि या पक्षावर बंदी घालावी, असे निवेदनही दिले होते.
  • ओवेसी यांच्या औरंगाबाद प्रवेशाला हिरवा कंदिला का दाखवला, अशी विचारणा शिवसेनेने पोलिस आयुक्तांकडे केली होती.

आता मनसेचा विरोध

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केसीआर यांची सभा उधळून लावणार असल्याची घोषणा मनसे नेते राज ठाकरे यांनी केली होती.
  • नांदेड जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना केसीआर यांच्या सभेकडे जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

इतिहासाची पुनरावृत्ती

2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने प्रवेश केला होता. एमआयएम प्रवेशाचा फायदा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला झाला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे नुकसान सहन करावे लागले होते. अशीच परिस्थिती 2019 मध्ये सुद्धा दिसून आली. आता बीआरएसच्या राज्यातील प्रवेशाचा फायदा हा पुन्हा भाजपला होईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. तसे झाल्यास पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे नुकसान सहन करावे लागेल.

औवेसी यांच्या पावलावर केसीआर यांचे पाऊल - ज्येष्ठ पत्रकार, कमलाकर जोशी

'यापूर्वी ए.आय.एम आय.एम.चे नेते असुदोद्दीन औवैसी यांनी नांदेड येथून महाराष्ट्रातील राजकारणाला सुरुवात केली होती. 'केसीआर' सुध्दा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत. तेलंगणात निवडणुकीत भाजप नव्हे तर तेलगू देशम, काँग्रेस व इतर पक्ष 'केसीआर'च्या विरोधात दंड थोपटणार आहेत,अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समिती पक्षाची बहुमतासाठी कसोटी लागणार आहे.आपल्या पक्षाने कोणाशी मैत्री करावी का? स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी किंवा नाही, या व्दिधा मन: स्थितीत ते आहेत. यातून भाजपला शह देण्यासाठी महाराष्ट्रातील तेलगू भाषिक मतदार भारत राष्ट्र समितीला जोडले गेले तर हिंदु मताची विभागणी होईल, यात भाजपाला फटका बसेल,असे त्यांना वाटते.'

भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना विरोध

'27 जानेवारी 2023 रोजी तेलंगणात केसीआर, केजरीवाल आणि अखिलेश एकत्रित आले होते. त्यांनी केंद्रातील भाजपला घालण्यासाठी तिसरी आघाडीचा निर्णय घेतला. त्यांचा भाजपबरोबरच काँग्रेसला देखील विरोध आहे. या आघाडीपासून शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस इतर पक्षाच्या नेत्यांनी अंतर ठेवले आहे. त्यात केसीआर यांचा महाराष्ट्रात जास्त प्रभाप पडेल असे दिसत नाही.' असे मत नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांनी दिव्य मराठीशी बोलतांना व्यक्त केले आहे.

या संबंधित आणखी बातम्या वाचा...

अब की बार किसान सरकार!:नांदेडमध्ये CM केसीआर यांची घोषणा, म्हणाले- 'मेक इन इंडिया' ऐवजी 'जोक इन इंडिया' झाला

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने 54 वर्षे, तर भाजपने 16 वर्षे सत्ता भोगली. देशातील बजबजपुरीला काँग्रेस - भाजप जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मेक इन इंडिया' बनवणार होते पण 'जोक इन इंडिया' झाला. कुठे गेला 'मेक इन इंडिया' देशातील प्रत्येक शहरात चायना बाजार भरला. दीपावलीचे दिवे, गणेशमूर्ती, राष्ट्रीय ध्वज, फटाके, होळीचे रंगही चीनमधून येतात असे टीकास्त्र सोडत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अबकी बार किसान सरकार असा नारा दिला. बीआरएस पक्षाची सभा आज नांदेडमध्ये झाली. या सभेला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सीआर बोलत होते. पूर्ण बातमी वाचा....

‘बीआरएस’चा नांदेडमधून राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश; गाठीभेटींवर भर, नेत्यांचे वाढले दौरे

तेलंगणातील बीआरएस पार्टी (भारत राष्‍ट्र समिती) नांदेडमधून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. त्या अनुषंगाने पक्षवाढीसाठी बीआरएस नेत्यांनी नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यात लक्ष केंद्रित केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येत्या ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये संवाद मेळावा घेणार आहेत. तेलंगणबाहेर त्यांचा हा पहिलाच मेळावा असेल. याची जय्यत तयारी सुरू आहे. बीआरएसच्या नेत्यांनी नांदेडमध्ये आजी, माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले जात आहे. काही सीमावर्ती तालुक्यात बैठकाही सुरू आहेत. या माध्यमातून वातावरणनिर्मिती केली जात आहे. तसेच मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी तळ ठोकून आहेत. याशिवाय मंत्र्यांचे दौरेही वाढले आहेत. पूर्ण बातमी वाचा...

बातम्या आणखी आहेत...