आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ दोन कृष्णधवल चित्रपट बनवणाऱ्या के. आसिफ यांच्या शृंगाररसाच्या प्रेमकथा खूपच रंगतदार आणि रसाळ होत्या. के. आसिफ (करीम आसिफ) यांची बहीण सिकंदर बेगमचे पती अभिनेता-दिग्दर्शक नजीर अहमद यांना जेव्हा कळले की आपला मेहुणा करीम आसिफ हा यास्मिन नावाच्या मुलीच्या प्रेमात वेडा होऊन देवदास होण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा त्यांनी पत्नीच्या विनंतीवरून त्याला मुंबईला बोलावून घेतले आणि आपल्या ‘हिंद पिक्चर्स’ या फिल्म कंपनीत कामावर ठेवून घेतले. या कंपनीचा पाया नजीर अहमद यांनी सितारादेवी यांच्यासोबत रचला होता आणि त्यांच्यासोबत १९३८ मध्ये पहिल्यांदा ‘बाग़बान’ चित्रपटात काम केले होते. आणि मग आग आणि तूप जवळ ठेवल्यावर काय होणार? हो. अगदी तसेच झाले. नजीर अहमद साहेबांनी सितारादेवींशी निकाह केला. के. आसिफ यांची बहीण सिकंदरा बेगमही त्यांच्या पत्नी राहिल्याच; पण आसिफ मुंबईत पोहोचल्यावर सितारादेवींकडे त्याचा कल वाढल्याचे पाहून नजीर यांनी त्याला फिल्म कंपनीतून काढून टेलरिंगचे दुकान उघडून दिले. हा वियोग तरुण प्रियकराला सहन झाला नाही. टेलरिंगच्या कामात खूप नुकसान झाले आणि के. आसिफ हे दुकान बंद करून पुन्हा चित्रपटाकडे परतले. इकडे नजीर आणि सितारा यांच्यात खूप तणाव, भांडणे झाली, त्यामुळे दोघांचा घटस्फोट झाला. त्यामुळं आता दोघे तरुण प्रेमी उरले, के. आसिफ आणि सितारादेवी. बुडत्याला काडीचा आधार. दोघांनी गुपचूप लग्न केले. वर्ष असेल १९४४. असे सांगितले जाते की, नजीर अहमद यांनी मत्सरापोटी, सारासार विचार न करता आसिफला बेदम मारहाणही केली होती.
दोघांची मने जुळली आणि मने जुळण्याच्या परिणामामुळे त्यांना आयुष्याचे ध्येय मिळाले. सितारादेवी त्या काळातील स्टार होत्या. एका चित्रपटात काम करण्याचे ३५ हजार रुपये मानधन घ्यायच्या आणि आसिफ यांना चित्रपट बनवायचा होता. त्यामुळे पत्नीचे कर्तव्य म्हणून त्यांनी पती आसिफ यांच्या ‘फूल’ चित्रपटाला फायनान्स केले. हा आसिफ यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. यात त्यांनी आपले नाव बदलून के. आसिफ असे केले.
त्या काळातील ‘फूल’ हा चित्रपट खूप मोठा मल्टिस्टारर आणि यशस्वी चित्रपट होता. या चित्रपटाच्या यशानंतर के. आसिफ यांची एक ओळख निर्माण झाली आणि पुढचा चित्रपट त्यांनी इम्तियाज अली ताज यांचे नाटक ‘अनारकली’वर नर्गिस आणि सप्रू यांना घेऊन सुरू केला. पण दुर्दैव असे, की काही रिळे तयार झाली असतानाच फायनान्सर सिराज सेठ यांचा मृत्यू झाल्यामुळे चित्रपट थांबवावा लागला. त्यानंतर आसिफ यांनी स्वत:च चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट होता ‘हलचल’. याचे दिग्दर्शक एस. के. ओझा होते. हा चित्रपट थोडाफार प्रसिद्ध इंग्रजी लेखिका एमिली ब्रोंटे यांची कादंबरी ‘Wuthering Heights’वर आधारित होता.
या चित्रपटासाठी सितारादेवींनी आपले दागिने विकून पती के. आसिफ यांना मदत केली. ‘हलचल’ खूप यशस्वी झाला. मग आसिफ यांची भेट फायनान्सर शापूरजी पालनजी यांच्याशी झाली. त्यांनी फायनान्स केल्याने ‘मुग़ल-ए-आज़म’ सुरू झाला. यामध्ये पृथ्वीराज कपूर, दिलीपकुमार, मधुबाला, दुर्गा खोटे, अजित आदी कलाकार होते. या चित्रपटात एक ‘बहार’ नावाचे पात्र होते. या भूमिकेसाठी निगार सुलताना या सुंदर तरुणीची निवड करण्यात आली. निगार यांनी आसिफसोबत काम करू नये, अशी निगार यांचे पती शेख मोहंमद युसूफ यांची इच्छा होती. यामुळे मोठा वितंडवाद झाला, भांडणं झाली, ती इतकी टोकाला गेली की, युसूफमियाँ आणि निगार यांचा घटस्फोट झाला. ५० च्या दशकाच्या अखेरीस युसूफमियाँ पाकिस्तानला गेले, निगार एकट्याच राहिल्या. निगार यांचा एकटेपणा पाहून आसिफ यांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली आणि या सहानुभूतीचे रूपांतर प्रेमात कधी झाले कळलेच नाही. पण, प्रेम लपत नसतं. सितारादेवींना हे प्रेमप्रकरण कळलं तेव्हा त्या ‘मुग़ल-ए-आज़म’चे चित्रीकरण सुरू असलेल्या जयपूरकडे निघाल्या. तिथे पोहोचल्यावर सितारादेवींनी आसिफ यांना रंगेहाथ पकडले. के. आसिफ म्हणाले, ‘पकडला तर गेलोच आहे, पण लक्षात ठेव, तू तू आहेस आणि ती ती आहे.’
पत्नी सितारादेवी यांचे काहीच चालले नाही आणि विश्वासघातकी पतीसोबतचे त्यांचे नाते तुटले. ज्या आसिफ यांची त्यांनी पावलापावलावर साथ दिली होती, त्यानेच दुधातून माशी काढावी, तसे पत्नीला काढून फेकले होते. सितारा यांच्यापासून विभक्त झाल्यावर आसिफ यांनी निगार सुलताना यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगी झाली, तिचे नाव हीना कौसर. कालांतराने सितारादेवींनी प्रताप बारोट यांच्याशी लग्न केले. इकडे मुग़ल-ए-आज़मदरम्यान के. आसिफ यांचे दिलीपकुमार यांच्या घरी जाणे-येणे वाढले आणि तिथे एकाच नजरेत आसिफ यांना दिलीपकुमार यांची लाडकी बहीण अख्तर आवडली. निगार सुलताना यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्याने आधाराच्या शोधात असलेल्या आसिफ यांना अख्तर भेटली.
मग आसिफ यांनी अख्तर यांच्याशी लग्न केले. आता हे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले, त्याबाबत अनेक किस्से आहेत, जेवढी तोंडे तेवढ्या चर्चा. सर्व सांगणे अशक्य होईल. पण, एक मात्र खरं की, ‘मुग़ल-ए-आज़म’च्या प्रीमियरला दिलीपकुमारांची अनुपस्थिती खूप काही सांगून गेली. ‘मुग़ल-ए-आज़म’च्या अभूतपूर्व यशानंतर आसिफ यांनी ‘सस्ता ख़ून महंगा पानी’ या नव्या चित्रपटाची सुरुवात केली. परंतु, तो बंद पडला. नंतर गुरुदत्त यांना घेऊन ‘लव्ह अँड गॉड’ हा चित्रपट सुरू केला. पण दुर्दैव! गुरुदत्त यांचा मृत्यू झाल्यामुळे हा चित्रपट बंद पडला. दोन जबरदस्त धक्के बसले होते. चांगल्या दिवसांच्या आठवणीत आसिफ यांच्या मनात सितारादेवींचे विचार येऊ लागले. तेव्हा अचानक सितारा यांचा भाचा गोपीकृष्ण यांच्याशी त्यांची भेट झाली. त्याने आठवण करून दिली की, आसिफमियाँ, तुमची ‘लकी चार्म’ तर माझी मावशी सितारादेवी होती. त्यांना नक्की भेटा, कदाचित चांगला काळ परत येईल. आसिफ यांना हे बोलणं आवडलं आणि त्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी दूर गेलेल्या ‘लकी चार्म’ सोबत १० मार्च १९७१ रोजी भेट ठरवली. या दिवसाची के. आसिफ अधीरतेने वाट बघत होते, पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते.
या भेटीच्या आदल्या दिवशी, ९ मार्च १९७१ ला संध्याकाळी सहा वाजता के. आसिफ हे जग सोडून गेले. आसिफ यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत फक्त दोनच चित्रपट दिग्दर्शित केले - ‘फूल’ आणि ‘मुग़ल-ए-आज़म’. त्यांनी ‘हलचल’ चित्रपटाची निर्मिती केली. हे तीनही प्रोजेक्ट खूप यशस्वी झाले. या तीनही प्रोजेक्टशी सितारादेवी जोडल्या गेल्या होत्या. त्या के. आसिफ यांच्या ‘लकी चार्म’ होत्या. आज हे दोन्हीही कलाकार या जगात नाहीत. कसलीही सरमिसळ वा समीक्षा न करता केवळ गोष्ट सांगायची, एवढाच माझा उद्देश होता. आजच्यासाठी इतकेच. नमस्कार! जय हिंद ! वंदे मातरम!
अन्नू कपूर सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि सूत्रसंचालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.