आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबुल हल्ल्याचे गुन्हेगार:तालिबान नरमल्यानंतरच वाढली दहशतवादी संघटना ISIS-K ची ताकद; काबुल विमानतळावर हल्ला घडवून आणणारे नेमके कोण?

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबुल विमानतळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासन (ISIS-K) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या हल्ल्यात अमेरिकन सैनिकांसह शंभर पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला तसेच शेकडो जखमी आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रीय असलेल्या या दहशतवाद्यांचे लक्ष्य अमेरिकन सैनिक आहेत.

इस्लामिक स्टेट खुरासानने इराण, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या काही भागांना मिळवून होणाऱ्या एका अनौपचारिक प्रदेशावरून आपले नामकरण केले आहे. 2014 मध्ये अफगाणिस्तानातून या संघटनेने डोके वर काढले होते. अफगाणिस्तानात झालेल्या क्रूर हल्ले आणि यातनांसाठी ही संघटना कुप्रसिद्ध आहे.

सुरुवात कुठून झाली?

2014 मध्ये आयसिस आणि आयसिसचा म्होरक्या अबु बकर अल बगदादीने सीरिया तसेच इराकमध्ये धुमाकूळ घातला होता. तालिबानपासून वेगळे झालेल्या दहशतवाद्यांनी एकत्रित येऊन आयसिसचा झेंडा हाती घेऊन आघाडी जाहीर केली. सुरुवातीला आयसिस खुरासानचा म्होरक्या हाफिज सईद खान होता. त्यानेच तालिबानपासून वेगळे होऊन खुरासान दहशतवादी संघटनेत दहशतवाद्यांची भरती केली होती. यानंतर अनेक म्होरके एकानंतर एक मारले गेले. 2020 पासून यांचा म्होरक्या शहाब अल मुहाजिर आहे.

तज्ज्ञांच्या मते, आयसिस खुरासान ही संघटना प्रामुख्याने तालिबानींपासून वेगळ्या झालेल्या दहशतवाद्यांपासून बनलेली आहे. पाकिस्तानातील शेकडो तालिबान्यांनी एकत्रित येऊन वेगळ्या संघटना तयार करून हल्ल्यांना सुरुवात केली होती. या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून हकलण्यात आले तेव्हा अफगाणिस्तानात गेले. तालिबानने पाश्चात्य देशांसोबत चर्चा सुरू करून नरमाईची भूमिका घेतली तेव्हापासूनच तालिबानी दहशतवादी संघटना सोडून यात सामिल झाले. अशात आयसिस खुरासानची ताकद आणखी वाढत गेली.

अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ISIS-K मध्ये सीरिया आणि इतर देशांतून सुद्धा येणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या वाढत गेली. अमेरिकेच्या माहितीप्रमाणे, अफगाणिस्तानात या समूहाचे 10 ते 15 प्रमुख ठाण मांडून आहेत.

कुठे-कुठे सक्रीय आहे?
गेल्या काही वर्षांत या दहशतवादी संघटनेचे अस्तित्व प्रामुख्याने अफगाणिस्तानात दिसून आले. त्यातही प्रामुख्याने नंगरहार आणि कुणार प्रांत यांचे गढ मानले जातात. काबुलमध्ये सुद्धा खुरासानचे दहशतवादी स्लीपर सेल म्हणून सक्रीय आहेत. त्यांनीच 2016 मध्ये काबुल येथे मोठ्या प्रमाणात आत्मघातकी हल्ले घडवले होते. हे दहशतवादी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर सुद्धा सक्रीय आहेत.

आयसिसचा तालिबानला विरोध का?
आयसिस आणि तालिबान या दोन्ही संघटना सुन्नी समुदायाचे असल्याचा दावा करतात. तरीही या दोन्ही संघटना एकमेकांना तीव्र विरोध करतात. तालिबानचे दहशतवादी युद्ध आणि जिहाद सोडून दोहा आणि कतार येथील हॉटेलांमध्ये जाऊन बसले. याच ठिकाणी बसून ते शांतता करार करत आहेत असा आरोप आयसिसकडून होत आहे.

स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल सिक्यॉरिटी अँड को-ऑपरेशनच्या माहितीप्रमाणे, दोन्ही संघटनांमध्ये विचारसरणीचा फरक आहे. असोसिएटेड प्रेसनुसार, गेल्या काही वर्षांत तालिबान्यांनी अमेरिकेसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली होती. त्यावरच नाराज दहशतवादी तालिबान सोडून आयसिसमध्ये गेले.

हक्कानी नेटवर्कशी संबंध
तज्ज्ञांच्या मते, ISIS-K आणि हक्कानी नेटवर्क एकमेकांशी संबंधित आहेत. हक्कानी नेटवर्क तालिबानसोबत देखील आहे. आशिया प्रशांत महासहर फाउंडेशनचे डॉ. सज्जन गोहल यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीप्रमाणे, 2019 ते 2021 दरम्यान झालेल्या जवळपास सर्वच मोठ्या हल्ल्यांमध्ये ISIS-K, तालिबानचे हक्कानी नेटवर्क आणि पाकिस्तानच्या इतर दहशतवादी संघटनांनी मिळून काम केले आहे.

ISIS-K च्या निशाण्यावर कोण?
खुरासान दहशतवादी संघटनेने काबुलसह अनेक शहरांमध्ये प्रामुख्याने आत्मघातकी हल्ले आणि साखळी बॉम्बस्फोट घडवले आहेत. त्यांच्या निशाण्यावर सरकार आणि परदेशी लष्कर आहे. आपण किती क्रूर आणि हिंसक संघटना आहोत हे खुरासानचे सदस्य दाखवत असतात.

यासोबतच या दहशतवाद्यांनी गावातील वृद्धांना खुलेआम ठार मारणे, रेड क्रॉस संघटनेवर आत्मघातकी हल्ले करणे, शिया समुदायाला लक्ष्य करणे इत्यादी कारस्थान केले आहेत. आयसिस खुरासान दहशतवाद्यांनी शियांसह सूफींवर सुद्धा हल्ले केले.

बातम्या आणखी आहेत...