आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:'काढा' हे औषध किंवा कोरोनावरची लस नाही, केवळ प्रतिकारशक्ती वाढवते; डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घ्या

अभिषेक पाण्डेयएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • वाचा सविस्तर...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा पिण्याचा ट्रेंड देशात झपाट्याने वाढला आहे. या महामारीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आयुष मंत्रालयापासून आरोग्य मंत्रालयापर्यंत काढ्याचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, परंतु या काढ्याच्या अति सेवनामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवल्या आहेत. म्हणजेच काढा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काढा घ्यायला हवा.

खरंच काढा कोरोनापासून बचाव करण्यास सक्षम आहे का? काढ्याच्या सेवनाने खरोखरच प्रतिकारशक्ती वाढते का? किती प्रमाणात काढा प्यायला हवा? काढ्याचे दुष्परिणाम काय आहेत?, याविषयी जाणून घेऊया...

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढ्याचा वापर केला जातो
भारतात शतकानुशतके काढ्याचा वापर केला जात असला तरी, कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाल्यापासून, विशेषत: गेल्या दोन वर्षांत लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढ्याचे सेवन करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उपायांचा भाग म्हणून काढ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, "तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ (कोरडे आले) आणि मनुका यापासून बनवलेला हर्बल चहा/काढा दिवसातून एक किंवा दोनदा प्या. आवश्यक असल्यास, चवीनुसार गूळ आणि ताज्या लिंबाचा रस घाला."

आयुष मंत्रालयाने देखील कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून दिवसातून एक किंवा दोनदा काढा पिण्याचा सल्ला दिला आहे.

काढा कसा बनवला जातो?

'काढा' (concoction) किंवा हर्बल मिश्रण हे औषधी वनस्पती आणि मसाल्यांचे मिश्रण आहे. आले, लिंबू, हळद, काळी मिरी, ओवा, गिलोय, लवंगा, वेलची, मध आणि चिमूटभर मीठ गरम पाण्यात उकळून त्याचा काढा बनवला जातो.

आरोग्य मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या काढ्यामध्ये तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ (कोरडे आले), मनुका, गूळ आणि ताज्या लिंबाचा रस वापरण्याची शिफारस केली आहे.

काढा किती प्रमाणात आणि किती प्यावा?
काढ्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, परंतु त्याच्या अति सेवनामुळे अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणजेच काढ्याचा वापर तेव्हाच फायदेशीर ठरतो जेव्हा तो योग्य आणि योग्य प्रमाणात घेतला जातो.

 • आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, निरोगी व्यक्तीने दिवसातून एकदा किंवा दोनदाच हा काढा प्यावा.
 • काढ्याचे प्रमाण किती असावे? याच्या उत्तरात तज्ज्ञ म्हणतात की, एका वेळी सुमारे 50 mL काढा प्यावा.
 • यासाठी, काढ्यामध्ये घालायचे पदार्थ 100 mL पाण्यात 50 mL होईपर्यंत उकळवावेत.
 • निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी दिवसातून एक किंवा दोन कप (सुमारे 50 ते 100 mL) काढा योग्य आहे.
 • आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी रिकाम्या पोटी काढ्याचे सेवन करणे टाळावे.
 • कफाचा त्रास असलेल्या लोकांसाठी काढ्याचा वापर अधिक फायदेशीर आहे, कारण अशा व्यक्तींमध्ये व्हायरल इन्फेक्शनचा धोकाही जास्त असतो.
 • दुसरीकडे, वात आणि पित्ताचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या काढ्यामध्ये काळी मिरी, दालचिनी आणि कोरडे आले घालणे टाळावे. अशा लोकांनी संध्याकाळी काढा पिणे चांगले मानले जाते.

काढा पिल्याने खरोखरच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते का?
आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने कोरोनापासून बचाव करण्याच्या उपायांचा भाग म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा वापरण्याचा सल्ला दिला आहे.

हर्बल चहा किंवा काढा हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी नैसर्गिक उपायांपैकी एक मानले जाते. काढ्याचा वापर सामान्य सर्दी, खोकला आणि इतर अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करतो.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) द्वारे 2015 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, काढ्यासारख्या हर्बल उपचारांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे शरीराला संसर्गजन्य विषाणूंशी लढण्यास मदत होते.

काढा पिण्याचे दुष्परिणाम आहेत का?
काढा सामान्यतः रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो, परंतु जर तो जास्त प्रमाणात घेतला किंवा जास्त वेळा वापरला तर त्याचे अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

एप्रिल-मे 2021 मध्ये देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काढा पिण्याची क्रेझ खूप वाढली होती. त्यामुळे जास्त प्रमाणात काढा प्यायल्याने अनेकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, दुस-या लाटेदरम्यान, जास्त प्रमाणात काढ्याचे सेवन केल्याने लोकांना अपचन, अतिसार आणि एनल फिशरचा त्रास झाल्याची शेकडो प्रकरणे नोंदवली गेली होती. कोविडची लागण झालेल्या आणि संसर्ग न झालेल्या दोन्ही प्रकारच्या लोकांमध्ये या समस्या दिसून आल्या.

 • आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काढ्याच्या जास्त वापरामुळे एखाद्या व्यक्तीच्या पोटात आणि आतड्यांमध्ये हायपर अॅसिडिटी, जळजळ आणि वेदना यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
 • यासोबतच जर तुम्ही काढ्याचा जास्त वापर करत असाल तर बद्धकोष्ठता आणि जुलाबाची समस्या देखील होऊ शकते.
 • अधिक प्रमाणात काढ्याचे सेवन केल्याने पोटात अल्सर किंवा तोंडात फोड येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
 • काढा बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सामग्रीमुळे शरीरात भरपूर उष्णता निर्माण होते.
 • काढ्या अति सेवनामुळे त्याचा पोट आणि आतड्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे अपचन, जुलाब आणि गॅसच्या समस्या उद्भवतात, ज्यामुळे हळूहळू एनल फिशर बनते.
 • एनल फिशर ही गुदद्वाराची एक समस्या असून यात गुदद्वाराच्या पातळ, नाजूक अस्तरामध्ये जखम तयार होते.

काढा पिण्याने नुकसान होत आहे हे कसे समजावे?

काढ्याच्या फायद्यांसाठी त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे, परंतु काढ्याच्या अतिसेवनामुळे तुमच्या शरीराचे नुकसान होत असेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम दिसू लागतात.

चला जाणून घेऊया, हे कसे कळेल की काढा फायद्याऐवजी नुकसान करत आहे?

 • नाकातुन रक्तस्त्राव येणे.
 • तोंडात फोड येणे.
 • खूप जास्त अ‍ॅसिडिटी होणे.
 • अपचन
 • लघवी करताना त्रास होणे.

काढा प्यायल्यामुळे तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या दिसली तर लगेचच काढा पिणे थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

बातम्या आणखी आहेत...