आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळुरु बाहेरील सूरतकलमध्ये गुरुवारी सायंकाळी 8 च्या सुमारास मोहम्मद फाजिलची हत्या झाली. त्यानंतर संपूर्ण भागात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांना अटक केली. तसेच अप्रिय घटना टाळण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंत कलम 144 अर्थात संचारबंदी लागू केली. या हत्याकांडानंतर आता राजकारण सुरू झाले आहे.
SDPI ने यामागे संघ परिवार व भाजपशी संबंधित नेत्यांची प्रक्षोभक विधाने व जातीय कलह जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, काली मठाचे साधू ऋषी कुमार स्वामी यांनी माध्यमांपुढे फाजिल पहिला बळी आहे, पुढे 9 मुंडके अजून बाकी आहेत असा इशारा दिला आहे.
शुक्रवारी दिवसभर चाललेल्या या घटनाक्रमात दैनिक दिव्य मराठीने फाजिलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची बाजू जाणून घेतली. मुलाच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला लव्ह अफेअरचे वळण देण्यात येत असल्यामुळे ते नाराज झालेत.
फाजिलचे काका निसार अहमद म्हणाले -आमच्या मुलाची काल हत्या झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माध्यमे त्याच्या हत्येचा संबंध प्रेम प्रकरणाशी जोडत आहेत. या प्रकरणी एकाच दिवशी निर्णय द्यायचा असेल, तर पोलिस व न्यायालयाची काहीच गरज नाही. सर्व बंद करून केवळ मीडियाला जबाबदारी द्या. ज्या प्रकारे फाजिलची भर बाजारात हत्या झाली. त्यामुळे कुटुंबातील सदस्य व मित्र परिवार घाबरला आहे.
मित्र म्हणाला -पुढील क्रमांक आमचा असू शकतो
मोहम्मद फाजिलच्या जवळच्या मित्राचे नावही फाजिलच आहे. ते आपले नाव फाजिल इस्लाम असे लिहितात. ते म्हणाले -अर्ध्या शहरात पोलिस आहेत. पण जिथे फाजिल मारला गेला, तिथे एकही पोलिस नव्हता. मुस्लिम असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भर रस्त्यात हत्या होत असेल, तर आम्ही एका कोपऱ्यात राहतो. तिथे कुणीही येऊन आम्हाला ठार मारेल. ज्या प्रकारे माझ्या मित्राचा खून करण्यात आला, आम्हालाही भीती वाटत आहे. पुढील नंबर माझा किवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा असू शकतो.
‘बोम्मई केवळ हिंदुंचे CM आहेत का?’
पोलिसांनी या प्रकरणी अनेक आरोपींना ताब्यात घेण्याचा दावा केला असला तरी कुटुंबाने सरकार व पोलिसांच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. निसार अहमद म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे, पण भरवसा नाही. मुख्यमंत्री येथेच होते. ते हिंदू बांधवांच्या घरी गेले. पण आमच्याकडे आले नाही. ते केवळ हिंदुंचे मुख्यमंत्री आहेत काय.’ ते पुढे म्हणाले -आठवड्यात 3 हत्या झाल्या, हाच या सरकारचा विकास आहे. हत्या करा व त्याचे राजकारण करा हीच त्यांच्या राजकारणाची पद्धत आहे.
‘मुलाचे कुणाशी अफेअर होते हे कुणीच सांगत नाही’
आपला मुलगा गमावणाऱ्या उमर फारुख यांना आम्हाला पाहताच रडू कोसळले. ते मुलाच्या कथित शत्रुविषयी बोलताना म्हणाले, 'तो घरी बसणारा माणूस होता. तो क्रिकेट खेळण्यासाठीही बाहेर जात नव्हता. गुरुवारी साडेसात वाजता आमच्यासोबत होता. त्यानंतर आज ही घटना घडली.'
ते म्हणाले - 'टीव्हीवरील बातम्यांत काहीही येत आहे. कुणी त्याच्या वाढदिवसाची पार्टी होती असा दावा करत आहे. तर कुणी त्याचे प्रेम प्रकरण होते असे म्हणत आहे. पण त्याचे कुणाशी प्रेम संबंध होते हे कुणीच सांगत नाही. कुणीही खोटे बोलू नये.'
‘निर्दोष व्यक्तींना नव्हे गुन्हेगारांना पकडा’
फारुख पुढे म्हणाले,’तो माझ्यासाठी मित्रासारखा होता. त्याला कुणी त्रास देत आहे, हे त्याने केव्हाच सांगितले नाही. माझ्या मुलासोबत झाले, तसे कुणासोबतही होऊ नये. सरकारकडून आम्हाला कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही. त्यांनी केवळ गुन्हेगारांना अटक करावी. आमची केवळ हीच इच्छा आहे.'
वडील स्थानिक नेत्यांवर नाराज
फाजिलचे वडील पुढे म्हणाले, ’काल (गुरुवार) मुख्यमंत्री येथेच होते. कालच हत्या झाली. मुस्लिमांना विचारणारा कुणीच नाही. केवळ एक पोलिस अधिकारी वगळता येथील कोणताही खासदार, आमदार किंवा नगरसेवक इकडे फिरकला नाही.’
‘न्याय मिळेल याविषयी शंका’
फाजिल पुढे म्हणाला, ’कर्नाटकात आमच्यासाठी कोणताही मुख्यमंत्री नाही. 5 किमी दूर हिंदू मुलाची हत्या होते. तिथे मुख्यमंत्री येतात. पण आमच्याकडे कुणीही येत नाही. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याविषयी संशय आहे. मंगळुरुला जाणारी प्रत्येक गाडी सूरतकलवरून जाते. तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे आहे. हे कॅमेरे विना हेल्मेट जाणाऱ्यांना कैद करतात. पण हत्या करून जाणाऱ्यांना पकडत नाहीत.'
ज्यांच्या मनात अढी, त्यांना आमचा त्रास
फाजिलने पुढे सांगितले, ’हे प्रकरण प्रवीणशी संबंधित आहे किंवा नाही हे आम्ही सांगू शकत नाही. चौकशी अजून सुरू आहे. आम्हाला सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. त्यांनी केवळ सुरक्षा पुरवावी. भविष्यात आमच्या एकाही तरुणाची हत्या होणार नाही याची सरकार हमी देईल काय. ज्यांच्या मनात अढी आहे, त्यांनाच आमचा त्रास होत आहे,’
आरोपींचा शोध सुरू -ADG
या हत्याकांडाविषयी ADGP आलोक कुमार म्हणाले, ‘आम्ही कलम 144 लागू झाल्यानंतर कृष्णापूर, कुलाई, सूरतकलमध्ये संशयितपणे फिरणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले आहे. मंगळुरु शहराचे पोलिस आयुक्त एन.शशीकुमार यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे. याकामी सीसीटीव्हीचीही मदत घेतली जात आहे. शुक्रवारी फाजिलवर शांततेत अंत्यसंस्कार करण्यात आले.'
आरोपींना अटक न करता काहीही बोलणे घाई -पोलिस
या प्रकरणी आयुक्त शशीकुमार म्हणाले, 'सोशल मीडियामध्ये हे प्रेम प्रकरण किंवा जातीय असल्याचा दावा करत विविध अफवा पसरवल्या जात आहेत. मुख्य आरोपींना अद्याप अटक झाली नाही. त्यामुळे त्यांच्या चौकशीपर्यंत त्यांच्या हेतूबद्दल भाष्य करणे योग्य नाही.'
फाजिलच्या हत्येवर वादग्रस्त विधान
कालीमठाचे प्रमुख ऋषी कुमार स्वामी म्हणाले, 'फाजिलची हत्या आमच्या लोकांनी केली असेल तर त्याचा मला आनंद आहे. आणखी 9 जण बाकी आहेत. एका शिराच्या मोबदल्यात आम्हाला 10 शिर हवेत. पोलिसाना प्रवीणचे एन्काउंटर करता येत नसेल, तर त्यांनी आम्हाला बंदूक द्यावी. ते कसे करावे हे आम्ही तुम्हाला सांगू.'
SDPI ने संघ व BJP वर केला आरोप
सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (SDPI) राज्य समितीचे सदस्य आठवुल्ला जोकट्टे यांनी फाजिलच्या हत्येमागे आरएसएस व भाजप सरकारच्या लोकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. 'भाजप नेत्यांची प्रक्षोभक विधाने व कानडी माध्यमांतील विखारी प्रचार याला कारणीभूत आहे,' असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.